एका विद्यापीठाने दुसऱ्या विद्यापीठाला सोडू नये !

एका विद्यापीठाने दुसऱ्या विद्यापीठाला सोडू नये !

तुमच्या, माझ्या जगण्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाला अभ्यासकाच्या चिकित्सक नजरेने तपासून, निष्कर्षाप्रत येणारे मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ.नीरज हातेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक,IBN लोकमत

मुंबईमधील पानवाल्यांपासून देशातील महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत, बदलत्या मध्यमवर्गीय मानसिकतेपासून राष्ट्रवाद आणि सामाजिक सुधारणांपर्यंत, तुमच्या, माझ्या जगण्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाला अभ्यासकाच्या चिकित्सक नजरेने तपासून, निष्कर्षाप्रत येणारे  मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ.नीरज हातेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.

एका समृद्ध "अभिव्यक्तिनिष्ठ" विद्यापीठाने अशी दुसऱ्या १६० वर्ष जुन्या "व्यवस्थाबद्ध"  विद्यापीठाशी फारकत घेणे फार वेदनादायी आहे. खासकरून जेंव्हा मुंबई विद्यापीठासारखे देशातील आद्य आधुनिक विद्यापीठ गेल्या तीनेक दशकांपासून केवळ शिक्षणबाह्य विषयांमुळे चर्चेत राहते, तेथे कुलगुरू या महत्वपूर्ण पदावर बसणारे लोक, मग ते शशिकांत कर्णिक असो, राजन वेळूकर असो किंवा सध्याचे संजय देशमुख असोत, ते त्यांच्या शिक्षणाव्यतिरिक्तच्या  ''कर्तबगारीं"मुळे ओळखले जातात. तरीही समाज जागा होत नाही, विद्यार्थी पेटून उठत नाहीत आणि मुख्य म्हणजे ज्यांच्या हाती उच्च शिक्षण खाते आहे, असे सुविद्य मंत्री, अनेक विषय चांगल्या पद्धतीने हाताळणारे मुख्यमंत्री आणि 'कुलपती'पद भूषविणारे राज्यपाल हा सगळा "शिक्षणाचा पोरखेळ" निमूटपणे पाहतात, त्याचे वाईट वाटते.

भारतीय विद्यापीठे आणि आमचे महाविद्यालयीन शिक्षण याचा विचार करता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, आमच्याकडे या अत्यंत महत्वाच्या विषयाकडे जसे लक्ष द्यायला हवे तसे दिले जात नाही. एकीकडे आम्ही महासत्ता होण्याचा विचार मांडतो, सुबत्तेची मोठी स्वप्ने पाहतो पण त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्मिती आणि विकासाकडे मात्र आम्ही गांभीर्याने पाहत नाही. आपण फक्त उच्च शिक्षणाचाच विचार केला तरी आजघडीला देशात ४२ केंद्रीय, २९० राज्य, १८० अभिमत आणि ११२ खासगी विद्यापीठे आहेत.

या जवळपास सव्वापाचशे विद्यापीठात जाणारे विद्यार्थी ‘ज्ञानार्थी’ नसतात तर ते ‘गुणार्थी’ असतात. कारण ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा नामक "कारखान्यात" त्यांची पैदास आणि वाढ झालेली असते, तिथे टक्केवारी हा एकच निकष घेऊन त्यांना शिक्षण 'दिले' जाते. वास्तविक पाहता education (एज्युकेशन) शब्दाचा शब्दश: अर्थ होतो,  विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण बाहेर काढणे,  पण आम्ही त्यांच्या मनावर आम्हाला पाहिजे ते शिक्षण लादतो, त्यामुळे त्यांच्यासाठी उच्चशिक्षण हे आत्मोन्नत्तीचे नव्हे तर उपजीविकेचे साधन असते. त्यामुळे कला, शास्त्र किंवा दार्शनिक चिंतनाऐवजी डॉक्टर वा इंजिनीयर होण्यासाठी लागणारी कौशल्ये हस्तगत करण्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा ओढा दिसतो. येथेच विद्यापीठाच्या मूळ संकल्पनेपासून आम्ही किती दूर गेलो आहोत ते स्पष्ट होते.

१८५४ मध्ये म्हणजे जेव्हा आपल्या देशात एकही विद्यापीठ स्थापन झाले नव्हते (आपल्याकडे १८५७ मध्ये मुंबई, कलकता व मद्रास या तीन विद्यापीठांची स्थापना झाली होती) त्या काळात जॉन हेन्री न्यूमन या तत्त्ववेत्याने ‘विद्यापीठ ही संकल्पना मोठय़ा विस्ताराने स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, ‘विद्यापीठांमध्ये ज्ञानासोबत दार्शनिक चिंतन, उदारमतवाद, सहिष्णुता, सुसंस्कार आणि मूल्याधिष्ठीत विचारही रुजवले पाहिजेत. उदारमतवादी शिक्षण हा विद्यापीठीय शिक्षणाचा कणा असावा. कारण त्याद्वारे व्यक्तीची जडण-घडण ‘माणूस’ म्हणून होईल. मग पुढे ती व्यक्ती डॉक्टर होवो, इंजिनियर वा उद्योगपती होवो, उदारमतवादी ज्ञानाचा प्रभाव त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर कायमचा राहील.’ न्यूमन यांचे हे मत आज दीडशे वर्षानंतरही आपल्या देशाला तंतोतंत लागू पडते.

नालंदा-तक्षशिला या प्राचीन आणि  प्रसिद्ध विद्यापिठांचा वारसा आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने सांगतो, पण आमच्याकडे नीती, धर्म, अध्यात्म, ज्ञान-विज्ञान या आणि अशा विविध ज्ञानशाखांचे शिक्षण आणि विविध कलांचे प्रशिक्षण देण्याची पारंपरिक व्यवस्था होती.

या दोन विद्यापीठांशिवाय विद्यार्थ्यांना शस्त्र ते शास्त्र अशा विविध विषयांमध्ये प्रवीण करण्यासाठी अनेक गुरुकुल, विद्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांची साखळी भारतात होती, हे फार थोड्या लोकांना माहिती आणि मान्य असलेले पाहायला मिळते. आज इथं ही गोष्ट सांगायला खेद होतोय, कि ज्या डॉ. नीरज हातेकर यांनी मुंबईमध्ये लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स च्या धर्तीवर मुंबई स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी सुरु करण्याचे स्वप्न पाहिले होते, ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले होते.

अशा अर्थशास्त्र "जगणाऱ्या" ज्ञानी माणसावर आम्ही स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा विचार करण्याची वेळ आणावी हे आपले आणि आपल्या व्यवस्थेचे अपयश आहे. याआधी तीन वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाने शिस्तभंगाची कारवाई करत अर्थशास्त्राचे प्राध्यापक नीरज हातेकर यांना निलंबित केले होते. हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही छेडले होते. त्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना राज्यपालांकडूनच कानपिचक्या मिळाल्यानंतर हे निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला होता.

आताही विद्यापीठाने प्राध्यापकांना पेपर तपासणीच्या नावाखाली छळवणूक करण्याचे तंत्र बदलावे आणि हातेकर सरांसारख्या चांगल्या प्राध्यापकाला त्यांचे काम करू द्यावे एव्हढीच अपेक्षा. आणि  हातेकर सरांनी सुद्धा वैताग त्यागून राष्ट्र-महाराष्ट्राचा विचार करावा आणि मुंबई स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीच्या कiमiला गती द्यावी... अवघा महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे आणि पुढेही राहील.

First published: July 31, 2017, 7:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading