कोवळीपानगळ...आमच्या मुली आत्महत्या का करतात ?

कोवळीपानगळ...आमच्या मुली आत्महत्या का करतात ?

परभणी जिल्ह्यातल्या या सारिका नावाच्या मुलीने ज्या पद्धतीने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली ही खूप गंभीर घटना आहे. एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आपल्या भविष्याच्या चिंतेने उद्विग्न होते आणि स्वत:च जीवन संपवण्याचा निर्णय घेते हे किती भयानक वास्तव आहे.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

जेव्हा कोवळीपानगळ होऊ लागते तेव्हा निसर्गसुद्धा चिंतेत पडतो. पण माणसं मात्र कोवळ्यापानगळीने विचार करताना किंवा चिंतेत पडताना दिसत नाहीत. परभणी जिल्ह्यातल्या या सारिका नावाच्या मुलीने ज्या पद्धतीने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली ही खूप गंभीर घटना आहे. एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आपल्या भविष्याच्या चिंतेने उद्विग्न होते आणि स्वत:च जीवन संपवण्याचा निर्णय घेते हे किती भयानक वास्तव आहे.

विख्यात अमेरिका विचारवंत यांनी एका ठिकाणी म्हटलं होत की, संपूर्ण झाडाची अनुमती असल्याशिवाय झाडाचं एक पानही गऴून पडत नाही, पण आमच्याकडे मात्र ही कोवळीपानगळं दिवसाढवळ्या सुरू असते आणि व्यवस्थेला त्याबद्दल काहीही वाटत नाही. विचारवंतांना त्या विषयावर चिंतन करावसं वाटत नाही, जे निर्णय घेण्यासाठी बसलेले आहेत. सत्तास्थानी त्या शासन प्रशासनकर्त्यांना त्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही. ही कोवळीपानगळ कधी थांबणार?

सारिका ही पाथरी जवळच्या परभणी जिल्ह्यातल्या झुटे परिवारातील मुलगी. तिच्या काकांनी चंडीकादासांनी मागच्या आठवड्यात आत्महत्या केली, त्याचं कारण काय होत तर कर्ज आणि नापीकी. पाऊस नसल्यामुळे शेतीतून उत्पन्नाची हमी नाही आणि घेतलेलं कर्ज फेडायचं कसं याची चिंता, यामुळे चिंतीत असलेल्या चंडीकादासांनी आत्महत्या केली. आपल्या काकांसारखी वेळ आपल्या वडिलांवर येऊ नये म्हणून सारिकाने आत्महत्या केली. काय लिहिलयं तिने चिठ्ठीत ' प्रिय पप्पा, आपल्या भाऊंनी पाच सहा दिवसांपूर्वी शेतातील सर्व पिक जळून गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली, तसंच आपल्या घरावर कर्जाचं बोजा त्यात पाऊस पडत नसल्यामुळे तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल आणि घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचं गेल्या वर्षी लग्नं झालं. तेचं कर्ज अजून फेडलेलं नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही आपल्या भाऊंसारखं काही करु नये, यामुळे मी आपलं जीवन संपवते आहे." -तुमची सारिका.

'ज्या वयामध्ये तिचे खेळण्या बागडण्याचं वय आहे, ज्या वयामध्ये तिने पुढील जीवनातील स्वप्न रंगवावीत त्या छोट्या वयात एका छोट्या मुलीला आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागतो. हे सगळ्या व्यवस्थेच अपयश आहे, हे तुमचं आमचं प्रत्येकाचं अपयश आहे. परंतु दुर्दैवाने आम्ही या अपयशाकडे तितक्या गांर्भीयाने बघत नाही. आमची व्यवस्था बधीर झालेली आहे. या घटना रोजच्या झालेल्या आहेत, जसं आपण पाहिलं पंजाबमध्ये दहशतवाद होता त्यावेळेस दहशतवादांनी किती लोकांना मारलं याचे आकडे फक्त बदलायचे तसंच काश्मिर किंवा सीमेवर बळी जाणाऱ्या लोकांचे फक्त आकडे बघत असतो. तसंच आकडे आता आम्हाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पाहायची सवय झालीय. गेल्या 25 वर्षांत 58 हजारांहुन अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. महाराष्ट्रामध्ये, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण कुठलाही भाग याला अपवाद नाही, आणि आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातच्या मुली आत्महत्या करायला लागल्या.

गेल्या वर्षी लातूर जवळच्या भिसेवाघोली नावाचं गाव आहे. तिथल्या मुलीने आत्महत्या केलेली होती. शितल व्यंकट वायाळ या एकवीस वर्षांच्या तरुणीने आत्महत्या का केली होती, तर तिच्या हुंड्यासाठी वडिलांकडे पैसे नाहीत या एका कारणाने तिने आत्महत्या केली, तीने जिवचं संपवला. सारिकाने पत्रामध्ये जे लिहीलयं ते पाहिलं ते सुद्धा तसंच आहे की, लग्न-कर्ज, शेती-कर्ज म्हणजे सगळं जगणं उधारीवर घेऊन आम्ही कसं जगायचं असा प्रश्न ग्रामीण भागातील इतक्या मोठ्या लोकसंख्येला पडलेला असेल तर भारत कुठे प्रगती करणार? काय प्रगती करणार?. आज भारतातील स्त्रियांची स्थिती आपण सगळ्यांनी पाहिली तर काय आहे ती स्थिती. ज्या देशात स्त्रियांना माता म्हणून मानलं जातं, ज्या देशात स्त्रीला देवी म्हणून मानलं जात तिथे निम्याहून अधिक स्त्रिया अॅनेमिक तुम्हाला दिसतात.  होय हे वास्तव आहे. चांगल्या घरातील जरी असल्या तरी त्यांना माहीत नसतं की आपण शारीरिक दृष्ट्या विकल आहोत. आपल्या देशात दररोज 500 महिला गरोदरपणाच्या आजाराने मरतात. तीच गत स्त्रीभ्रृण हत्येची, आमच्याकडे स्त्री म्हणून जन्माला यायचा अधिकारचं नाहीये.

युनायटेड नेशनच्या चिल्ड्रेन फंडने मध्यंतरी एक आकडेवारी प्रसिद्ध केली होती ती आकडेवारी मन हेलावून टाकणारी होती. या आकडेवारीत भारतातील 5 कोटी मुली मिसिंग आहेत. मिसिंग म्हणजे त्या जन्माला आल्या बरोबर किंवा येण्याच्या आधी म्हणजे गर्भातचं किंवा जन्म झाल्यानंतर त्यांना मारून टाकलंय. म्हणजे आम्ही स्त्रियांच्या संदर्भात अजूनही बुरसटलेल्या विचारांचे आहोत. मुलींच्या विवाहाच्या संदर्भात, मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात आणि त्यांच्या एकूण स्वातंत्राच्या संदर्भात आम्ही किती मागासलेले आहोत हे वारंवार आम्ही दाखवून देतो. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणले होते की, पक्षाचे दोन्ही पंख जर प्रबळ असतील तरचं पक्षी उडू शकतो. तीच गत आहे जर स्त्री आणि पुरूष हे दोघ जण समर्थ असतील, प्रभावी असतील तरचं देश प्रगती करू शकतो. इकडे आम्ही मोठ्या महासत्ता होण्याच्या गप्पा मारतो, आम्ही खूप पुढे जाण्याच्या गोष्टी करतो, आम्ही महापराक्रमी व्हायच्या गोष्टी करतो परंतु, आम्ही लोकसंख्येच्या निम्मा हिस्सा असणाऱ्या स्त्रियांकडे गांर्भीयाने पाहणार नसू, त्यांना बरोबरीचं स्थान देणार नसू तर आम्ही प्रगती करणार नाही, आम्ही प्रगती करू शकणार नाही. ही वस्तुस्थिती तरी नियोजनकर्त्यांनी तरी लक्षात घेतली पाहिजे.

कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबईत मराठा समाजाचा मोठा मोर्चा निघाला होता. तर दुसरीकडे सारीकाने वडिलाने आत्महत्या करू नये म्हणून आत्महत्या केली. या सर्व गोष्टी मन अस्वस्थ करणाऱ्या आहेत. भारत स्वतंत्र्य झाला तेव्हा 7 टक्के स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण होतं आता ते वाढलं आहे. बाहेर निघणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. परंतु, हे वाढत प्रमाण समाजाने स्त्रियांचं वाढतं वर्चस्व योग्य पद्धतीने स्विकारताना दिसत नाही.

हरियाणामध्ये एका दिग्गज राजकारणाच्या मुलगा एक मुलगी एकटीच जात  होती म्हणून छेड काढतो. मुंबईतही अशा घटना घडतात हे सगळं कशाचं लक्षण आहे. त्यामुळे आपण मुलींच्या बरोबरीने उभं राहिलं पाहिजे. योग्य पद्धतीने त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. पण आजही ग्रामीण भागात हुंडाप्रथा कायम आहे. 1961 मध्ये हुंडाविरोधी कायदा झाला पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आजही हुंड्याला अनेक महिला बळी जातात. या भारतात स्त्रीला देवी म्हणारे गेले कुठे ?, किमान स्त्रीला आपल्याबरोबरीचा हक्क दिला पाहिजे. स्त्रीला समानतेचा मान दिला पाहिजे. ज्यांचा खेळण्या बागडण्याचे दिवस आहे. त्या कवळ्या मनावर तणाव निर्माण होत असेल तर हे कोणत्याही कल्याणकारी राज्यासाठी योग्य नाही.

मुलींनीही आता खंबीर होण्याची गरज आहे. रडत न बसता समोरच्या वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. समाजाने आपली जबाबादारी लक्षात घेऊन वेळीच या कोवळ्या मनाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं तर कोवळीपानगळ होणार नाहीत.

First published: August 12, 2017, 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading