वारे राजकीय सीमोल्लंघनाचे !

वारे राजकीय सीमोल्लंघनाचे !

राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते तेव्हा नांदेडला झालेल्या कार्यक्रमात राणे गेले नाही. त्यामुळे राज्यातील नेतृत्वासोबत केंद्रीय नेतृत्वाशीही राणेंचे फाटले आहे. त्यामुळे आता राणेंना स्वत:ची संघटना काढण्याशिवाय, स्वत:चा पक्ष काढण्याशिवाय गत्यंतर नाही हे स्पष्ट झालं आहे. म्हणूनच असेल की,आता सिंधुदुर्गामध्ये येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राणेंनी आपण आपल्या "समर्थ विकास पॅनल" या स्वतंत्र संघटनेतून लढण्याचं स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

जग, विज्ञान कितीही पुढे गेले तरी आमच्या देशात पितृपंधरवाड्यात कोणतेही महत्वपूर्ण काम करायचे नाही, असे आपले सर्व क्षेत्रातील लहानमोठे नेते मानतात. त्यामुळे त्यावर कितीही टीका झाली तरी नेतेमंडळींना काही फरक पडत नाहीत. असो, तर आता तो पितृ पंधरवडा संपत आलाय, नवरात्रोत्सवाची चाहूल लागली आहे. घटस्थापनेची सगळीकडे तयारी चालू आहे. परंतू घटस्थापनेच्याच दिवशी "राजकीय घटस्फोट" होणार का? याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसे पाहायला गेल्यास, दसरा हा सण  सीमोल्लंघनासाठी ओळखला जातो. पण नवरात्रीला अजून  सुरूवात सुद्धा झालेली नाही आणि आमच्याकडे राजकीय सीमोल्लंघनाचे वारे  वाहू लागले आहेत.

राजकीय हेतूंनी भरलेल्या या 'मतलबी' वाऱ्यांनी महाराष्ट्रातले राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. प्रत्यक्षात भलेही कोकणात मुसळधार पाऊस बरसतोय, बऱ्याच ठिकाणी  पाणी तुंबलंय पण महाराष्ट्रातील राजकीय हवा मात्र गरम झालेली दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर असलेले नारायण राणे काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, तर दुसरीकडे शिवसेना भाजपसोबत सत्तेत राहणार का हा प्रश्न चर्चेत आहे.

शिवसेनेत जी अंतर्गत धुसफूस, सुंदोपसुंदी सुरू आहे त्याचं नेमकं काय होणार? सेनेत फाटाफूट होणार का ? पक्ष फुटणार या भीतीने सेना नेतृत्व सत्तेला "जय महाराष्ट्र" करणार का, या आणि अशा प्रश्नमालिकेकडे सध्या लोकांचं लक्ष लागलंय. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नवरात्रीनंतर कोणत्या दिशेला सीमोल्लंघन करेल याचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे.

आजपासून बरोबर एका महिन्यापूर्वी जेव्हा राणे भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा होती. खासकरून जेव्हा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राणे यांना स्वत:चं मंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली  होती. त्यावेळेस जोवर नारायण राणे स्वतः पक्षप्रवेशाची घोषणा करत नाही तोपर्यंत कोणीही कितीही राजकीय संकेत दिले तरी राणेंचा पक्षप्रवेश होणार नाही, असे भाकीत आम्ही केले होते, त्याची आज एक महिन्यानंतर आठवण येते, आज एक महिन्यानंतरही राणे  कुठल्या पक्षात जातील याची शाश्वती नाही. मुळात त्यांच्या काँग्रेसमधील स्थानाबद्दलही कोणी काही सांगू शकत नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राणे त्यांना सेनेकडून ऑफर  सांगत आहेत. गेल्या महिन्यात आपल्याला भाजपकडून ऑफर आल्याचं त्यांनी आधीच सांगून झालेलं आहे, आता सेनेकडूनही ऑफर असल्याचा गौप्यस्फोट करून राणेंनी आपल्या राजकीय असहाय्यतेला जगजाहीर केले आहे. कारण राणेंचा लढाऊ स्वभाव पाहता अत्यंत अवघड स्थितीतही ते शांत बसतील असे वाटत नाही, पण राजकीय खेळीत प्रत्येक फासा आपल्याला लाभदायक ठरेलच असे नसते, खासकरून ज्यावेळी कोणतेही पर्याय हाती नसतात, तेंव्हा घेतलेला निर्णय 'जुगारच' असतो. जरा दोन महिन्यातील घटनाक्रम पाहूया,  अगदी नको असताना, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सोबतच्या बैठकीतील राणे परिवाराच्या भाजपप्रवेशाची झालेली 'जाहिरात'.

राणेंचा भाजप प्रवेश होऊ नये यासाठी काही बड्या भाजपनेत्यांनी केलेली कोंडी या सगळ्या प्रकाराने राणे अस्वस्थ होणे साहजिक होते, पण आज त्यांनी सेनेकडून ऑफर असल्याची 'बातमी' देऊन त्यांच्या हाती काहीच उरलेले नसल्याचे दाखवून दिलेले आहे.

मध्यंतरी कोकणात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नारायण राणे यांच्या प्रयत्नाने ज्येष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी पक्ष चालवण्यासाठी सर्वप्रकारचे लोक हवे असतात, भाजपमध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो असे स्पष्ट शब्दात सांगून राणे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. तरीही नारायण राणेंचा भाजप प्रवेश झाला नाही. त्यानंतर नारायण राणे-अमित शहांची गुजरात भेट झाली होती. त्या भेटीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीसही उपस्थित होते. पण त्या भेटीचंही पुढे काही झालं नाही. त्या भेटीत काय चर्चा झाली? ती चर्चा का फिस्कटली या संदर्भात दोन्हीही पक्षांकडून काहीही सांगितलं गेलं नाही.

त्यामुळे आता नवरात्रीच्या तोंडावर नेमकं काय होणार ? राणे भाजपमध्ये जाणार की नाही? ते त्यांची राजकीय भूमिका जाहीर करतील का ? सध्यातरी राणे यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राणेंचा कोकणातील ज्या ज्या भागात प्रभाव आहे त्या त्या भागात संघटनात्मक पातळीवर काँग्रेसमध्ये जे जे बदल घडवून आणले आहेत, त्यामुळे राणे अस्वस्थ झाले आहेत. महिना-दीड महिना भाजपमध्ये हवी तशी ऑफर नसल्यामुळे जाऊ शकत नव्हते आणि त्यासाठीच त्यांनी एक हात काँग्रेसच्या "हातात"  ठेवलेला होता. तो हातसुद्धा आता बाजूला काढण्याचं काम हुसैन दलवाईंच्या माध्यमातून काँग्रेसने केलंय.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अशी काय चाल खेळली की, सिंधुदुर्ग काँग्रेस कमिटीमध्ये बसलेल्या सगळ्या राणे समर्थकांना पायउतार व्हावं लागलं होतं. त्यांच्या जागी काँग्रेसने राणे यांचे परंपरागत विरोधक बसवलेले आहेत. परिणामी काँग्रेसमध्ये त्यांचं स्थान तितकंसं बळकट राहिलेलं नाही. एकीकडे भाजपात प्रवेश नाही आणि दुसरीकडे काँग्रेसमध्ये महत्वाचे स्थान नाही, अशी परिस्थिती आहे. मागील आठवड्यात राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते तेव्हा नांदेडला झालेल्या कार्यक्रमात राणे गेले नाही. त्यामुळे राज्यातील नेतृत्वासोबत केंद्रीय नेतृत्वाशीही राणेंचे फाटले आहे. त्यामुळे आता राणेंना स्वत:ची संघटना काढण्याशिवाय, स्वत:चा पक्ष काढण्याशिवाय गत्यंतर नाही हे स्पष्ट झालं आहे. म्हणूनच असेल की,आता सिंधुदुर्गामध्ये येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राणेंनी आपण आपल्या "समर्थ विकास पॅनल" या स्वतंत्र संघटनेतून लढण्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यांचा आगामी राजकीय निर्णय त्यांना स्वत:च्या पक्ष स्थापनेच्या मार्ग निवडीकडे नेणारा असेल. त्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय उरलेला नाही.

याआधीच्या याच ब्लॉगवर आम्ही लिहिलं होतं की, राणे भाजपमध्ये गेले तर  भाजपला कोकणात खूप फायदा होईल, ज्या कोकणात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप रुजला नव्हता, तिथे तो राणेंच्या साथीने फुलू शकत होता. पण भाजपात जाऊन राणे परिवाराला तितका फायदा होणार नाही कारण भाजप त्यांच्या "संस्कृतीबाह्य" मंडळींना पक्षात महत्वच देत नाही, हे सूर्यप्रकाशाएव्हढे स्पष्ट सत्य आहे. याआधी जवळजवळ  12 वर्षांपूर्वी 10 आमदारांच्या पाठबळावर राणे जेव्हा काँग्रेसमध्ये गेले होते.

त्यातील राणे आणि कालिदास कोळमकर यांचं राजकीय अस्तित्व अजूनही टिकून आहे. उर्वरित सगळ्या राणे समर्थकांचं अस्तित्व संपलेलं दिसून येतं. शिवसेनेच्या कार्यपद्धतीत वाढलेल्या त्या १२-१३ धडाडीच्या राणे समर्थक शिलेदारांपैकी काहींनी पुन्हा सेनेचा मार्ग धरला, कुणी भाजप, राष्ट्रवादीचा आधार घेतला. पण तरीही त्यांचे राजकीय अस्तित्व संपले कारण राणेंनी काँग्रेसमध्ये गेल्यावर 'स्वयंकेंद्रित' राजकारणावर भर दिला. त्यामुळे राणे काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांना, त्यांच्या परिवाराला सगळे राजकीय लाभ मिळाले पण काँग्रेसला मात्र त्यांच्या प्रतिमेचा, त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाचा जितका फायदा व्हायला हवा होता तितका झालेला दिसला नाही.

कारण राणेंमधील 'रांगडा शिवसैनिक' काँग्रेस संस्कृतीत कधी रमलाच नाही. गांधी जयंती असो किंवा इंदिरा गांधींची पुण्यतिथी, त्यावेळी बोलायला उठणाऱ्या राणेंच्या चेहऱ्यावरील अगतिकता मिस्कीलपणाच्या बुरख्याखाली दडलेली असायची. पण तरीही अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या राणे यांची कार्यपद्धती हेच त्यांच्या सततच्या अस्वस्थतेमागील सगळ्यात महत्त्वाचं कारण असे. त्यामुळेच राणे यांनी सातत्याने पक्षनेतृत्वाला आव्हान दिलं. त्यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना मग विलासराव देशमुख असतील ,पृथ्वीराज चव्हाण असतील सगळ्यांना वेळोवेळी आव्हान दिलं.

आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर काँग्रेसमध्ये राणे एक वेगळं शक्तीस्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. जे त्यांना निर्माण करता आलं नाही. त्यामुळे त्यांची काँग्रेसमधील संपूर्ण राजकीय कारकिर्द स्वतःपुरती आणि स्वयंकेंद्रीत होती, ही वस्तूस्थिती  भाजप आणि शिवसेनेला माहीत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून ठरवून राणेंचा पक्षप्रवेश ज्याप्रकारे लांबवला जात आहे, असे मानायला जागा आहे. जाहीररीत्या, टोलवाटोलवी केल्यामुळे नारायण राणे स्वतःच पक्षप्रवेशाचा नाद सोडतील आणि त्यामुळे त्यांना स्वतंत्र संघटनेशिवाय पर्याय उरणार नाही अशी परीस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे भाजपाला जर पश्चातबुद्धी नाही झाली तर नजीकच्या काळात ते समर्थ अथवा स्वाभिमानी सारखे आवडते नाव घेऊन स्वतंत्र संघटनाच जाहीर करतील असं चित्र आतातरी दिसतं आहे.

एकीकडे हा राणेंचा 'दशावताराचा खेळ' सुरू असताना दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये जो 'शक्ती-तुरा' चा सामना रंगलाय, त्याला तोड नाही. मागील विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या मग त्यात  मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असेल, पनवेलची निवडणूक असेल या सगळया निवडणुकांमध्ये हे दोन्ही सत्तारूढ  पक्ष कट्टर वैऱ्यासारखे लढले. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहे. पण काल शिवसेनेची जी बैठक झाली त्यामध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद धुसफूस मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्याचं दिसतं आहे. त्यामध्ये महिला आमदार कशा रडल्या, कोण कुणाशी भांडले याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून  सगळीकडे पसरल्या आहेत. अंतर्गत कुरघोडीच्या या बातम्या जर थांबवायच्या असतील आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं असेल तर शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. असेही बोलले जाते आणि  त्यादृष्टीनेच ही हवा तापवली जात  आहे.  शिवसेना भाजपमध्ये सारं काही आलबेल राहिलेलं नाही हे जेवढं खरं आहे, तेवढंच  शिवसेनेतील अंतर्गत सत्तासंघर्ष शिगेला पोचला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

काही महत्वाकांक्षी शिलेदार मोठी स्वप्ने उराशी बाळगून आहेत.  त्यामुळे कुठल्याही क्षणी शिवसेनेतील २०-२५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. आणि या सगळ्या वस्तुस्थितीची जाण असल्यामुळे शिवसेना नेतृत्वाकडून या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न होणे सहाजिक आहे. मग प्रश्न उरतो शिवसेना आता काय करणार? बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर विशेषतः मोदीयुगाच्या सुरूवातीपासूनच भाजपच्या वाढत्या प्रभावासमोर शिवसेना पक्ष आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत आलेला आहे. आणि विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत शिवसेनेनं आपलं दुसऱ्या क्रमांकाचं राजकीय स्थान टिकवलेलं आहे. सत्तारूढ पक्षाला सळोकीपळो करण्याचं, विरोधी पक्षाचं काम जे काँग्रेस-राष्ट्रवादीने करायला पाहिजे होतं ते सत्तेत राहून शिवसेना त्यांच्याहून जास्त समर्थपणे करते आहे. अगदी दररोज, न चुकता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर,सरकारवर टीका होते असते.

या सगळ्या राजकीय सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर सध्या जी  राजकीय गरमागरमी सुरू आहे ती महाराष्ट्राला कुठे घेऊन जाईल, कधीकाळी सतत प्रगतीपथावर असणारा महाराष्ट्र अधोगतीला कसा जातोय याचे श्रीहरी अणे यांनी केलेले वर्णन आम्ही कधीतरी गांभीर्याने घेणार का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 08:15 PM IST

ताज्या बातम्या