चीनच्या वाढत्या कुरापती...

जर तुमच्याकडे सामर्थ्य नसेल तर कोणीही येता जाता आपल्याला टपली मारून जातं पण, आता काळ बदलला आहे. आपली भारतीय सेना सामर्थ्यशाली आहे, भारतीय सैनिकांच मनोधैर्य उदंड आहे, प्रचंड आहे आणि विशेष म्हणजे भारतीय लोकांची मानसिकतासुद्धा 1962 पेक्षा वेगळी आहे. त्यामुळे युद्ध व्हावं असं आपण म्हणत नाही, पण चीनने जर 'आरे' केलं , तर भारताने 'कारे' करण्याची तयारी ठेवली पाहिजे अशीच तमाम भारतीयांची इच्छा आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2017 08:11 PM IST

चीनच्या वाढत्या कुरापती...

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

गेल्या महिन्या, दीड महिन्यापासून चीनने ज्यापद्धतीने डोकलाम परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण केलं आहे आणि सातत्याने भारताशी मुजोरीची भाषा सुरु ठेवली आहे या पवित्र्याने भारतीय जनमत प्रक्षुब्ध झालं आहे. चीनच्या आगखाऊ भाषेने भारतीय लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट  उसळलेली दिसते. परंतु तरीही चीनने भारताला धमकवण्याचा प्रयत्न थांबवलेला नाही. परवा  'चायना डेली'च्या अग्रलेखामध्ये भारताला धमकी दिली गेली. तुम्ही युद्धासाठी सज्ज रहा अशी आक्रमक भाषा वापरली गेली. हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरंच चीनला युद्ध करायचं आहे   की  फक्त  सीमेवर तणाव निर्माण करुन वातावरण गढूळ करायचं आहे.

आपण सगळे जाणतो की गेल्या तीन वर्षात  जागतिक राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले आहे. चीन , जपान आणि अमेरिका सारख्या आर्थिक महासत्ता वेगाने आपली परराष्ट्र नीती बदलत आहेत .  2012 मध्ये  जेव्हा शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष  झाले तेव्हापासून चीनचे परराष्ट्र धोरण हळूहळू बदलत गेले. 1962 मधल्या भारत - चीन युद्धाची आठवण सगळेच जण काढत असतात. परवाच  संसदेत ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्ताने सगळे चर्चा करत होते, त्यावेळेससुद्धा संरक्षण मंत्री अरूण जेटली जे म्हणाले ते वाक्य खुप महत्वाचं होत. ते म्हणाले, "आम्ही 62च्या युद्धातून धडा घेतलेला आहे आणि आता कोणतेही आव्हान आमच्या समोर आलं तर त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत". जेटली यांच्या आधीसुद्धा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या संदर्भात विधान केल होतं की भारत आणि चीन या दोन्ही देशांतर्गत तणाव निर्माण झाला आहे हा तणाव आपण चर्चा प्रक्रियेने सोडवू शकतो. एका अर्थाने स्वराज यांची बोलणी सुरु ठेवण्याची  ही गोष्ट खरी आहे. परंतु सध्याच्या युगात युद्ध शक्य आहे का? सध्याच्या युगात युद्ध परवडणार आहे का? ही वस्तूस्थिती फक्त आपणच  नाही तर चीनने सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे.

भारत आणि चीनच्या सीमेवर तणावाची परिस्थिती सुरु आहे ती पाहिल्यावर सातत्याने लक्षात येतं की चीन व भारताचे  संबंध सुधारण्याचा प्रयत्न याआधी यशस्वी झालेला आहे. 1962 नंतरच्या काळानंतर ज्यापद्धतीने आता डोकलाम परिसर तणावपूर्ण आहे तशीच तणावाची परिस्थिती 1967 आणि 1986 मध्ये झाली निर्माण झाली होती. 2013-14 मध्येसुद्धा सीमेवर अशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतू त्यामधून  चर्चा प्रक्रियेद्वारे मार्ग काढला गेला आणि त्यातूनच वाद निवळत गेलेला आपण पाहिला आहे. काही चिनी नेते आपल्याला सात्यत्याने 1962ची आठवण करुन देतात, त्यांच्या वृत्तपत्रांची भाषाही तशीच असते. पण त्याचवेळेस हे लोक एक वस्तुस्थिती लपवत असतात , ती म्हणजे  1988 पासुन ते 2014 पर्यंत भारत आणि चीन सीमेवर फार मोठ्या प्रमाणावर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली नव्हती या सगळ्याचं श्रेय जात आमच्या परराष्ट्र धोरणाची फळी चालवणाऱ्या धोरणकर्त्यांना . 1988 ते 2014 यादरम्याण भारत आणि चीन या दोन देशांमध्ये व्यापारसंदर्भात, पर्यटनसंदर्भात आणि नागरिकांच्या माध्यमातून  संवादाची एक मांडणी व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले आणि ते बऱ्यापैकी यशस्वी देखील झाले होते. आता 2014च्या काळानंतर काय झालं असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ शकतो. इकडे नरेंद्र मोदी यांच सरकार सत्तेत आल्यानंतरच्या काळामध्ये  चीनची भूमिका बदलली का?

प्रचंड बहुमताने विजयी होऊन नरेंद्र मोदी यांचे  सत्तेत येणं ही जशी  भारतीय राजकारणातील मोठी घडामोड होती . अगदी त्याच धर्तीवर चिनी राष्ट्राध्यक्ष   शी जिनपिंग यांच २ वर्ष आधी सत्तेत येणं ही  चीनच्या राजकारणाला, चीनच्या अंतर्गत व्यवहाराला  आणि परराष्ट्र धोरणाला कलाटणी देणारी गोष्ट होती याचा आपण विचार केला पाहिजे.  शी जिनपिंग हा नेता असा आहे कि त्या नेत्याने पहिल्या वर्षभरातच चिनी राजकारणावर  आपली पोलादी पकड मजबूत केली आहे.  आणि जेव्हा एखादा नेता आपल्या राजकारणावर  आणि आपल्या कारभारावर पोलादी पकड मजबूत करतो तेव्हा काय होत हे वेगळ सांगण्याची गरज नाही, अश्या व्यक्तिंना आक्रमक राष्ट्रवादाची मदत घेऊन आपली एकाधीकारशाही चांगल्या पद्धतीने रुजवण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. 

Loading...

 

शी जिनपिंग हे त्याच मार्गातले आहेत त्यांना राष्ट्रधर्माला जास्तीत जास्त खतपाणी देऊन राष्ट्रवादी भूमिका जास्त प्रमाणात मांडून  राष्ट्रप्रेमाचा जो अहंकार आणि अंगार  भडकवून  आपली चीनमधली सत्ता अधिक बळकट करायची आहे.  सध्या भारत सीमेवर जो तणाव आता निर्माण झाला आहे त्यामागचं  हेच प्रमुख कारण आहे. आमच्या परराष्ट्र धोरण तज्ज्ञांना हे ठाऊक नाही असे नाही. त्यासाठी  आम्ही या सगळ्याला प्रतिउत्तर देण्यासाठी शत्रू चा शत्रू तो आपला मित्र असं पारंपरिक उत्तर देण्याचा  करण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आत्तापर्यंत जवळपास 64 देशांना भेटी दिल्या आहेत.   पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आताच इस्राएल आणि अमेरिकेच्या दौऱ्यावरून आलेले आपण पाहिलं,  त्यांनी जपानला सुद्धा भेट दिली. या शेवटच्या तीन महत्वाच्या भेटी आहेत.

हे तीन देश इस्राएल, अमेरिका आणि जपान यांच चीनशी असलेलं  नातं  सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापार विषयक आणि परराष्ट्र धोरणाविषयक सर्वकाही अलबेल आहे, तीच गोष्ट इस्राएलची आहे, फक्त जपान बरोबर दक्षिण चीनी  सागरामध्ये वाढत्या कारभाराबाबत जपानला थोडी नाराजी आहे. त्याबाबतीत त्यांनी आक्रमक भूमिकासुद्धा घेतली तो तेवढा विषय वगळता या तीनही देशांची  आपल्याला  डोकलाममधील  तणाव  शांत करण्यासाठी अजिबात मदत होणार नाही ही सत्य स्थिती आहे. त्यामुळे जेव्हा भारतीय सीमेवर चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली आणि त्यासंदर्भात आपल्याला तात्काळ  काहीही माहिती मिळाली नसताना, एका आठवड्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणविषयक तज्ञांनी जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नाच्या माध्यमातून हा तणाव दूर झाला नाही. सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची शिष्टाई सुद्धा म्हणावी तेव्हढी यशस्वी झाली नाही.

आता तर  डोकलाम परिसरातील सगळ्या गावातील नागरिकांना दुसरीकडे स्थलांतर करण्यास सांगण्यात आले. याचा अर्थ काय होऊ शकतो तर चीन कधीही आगेकुच करू शकतो आणि आक्रमक होऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे. आज काश्मिर मधलं चीनचं  अस्तित्व ही आपली खरी डोकेदुखी आहे. चीनमध्ये काश्मिर आणि पाकिस्ताने ज्या कारवाया सुरु केल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला नजरेआड करता येणार नाही. काश्मिरमधला एकूण भूभाग जर आपण पाहिला तर 19 टक्के काश्मिर हा चीनकडे आहे आणि भारताकडे काश्मिर भूभाग हा निम्यापेक्षा कमी आहे. हे जेव्हा आपण लक्षात घेतो की चीनी ड्रॅगनंने आपला एक पंजा आपल्या भारत भूमीवर आधीच टाकला आहे.

मग या अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताने  चीनसोबतची स्थिती कश्यापद्धतीने  परिस्थिती हाताळली पाहिजे याबद्दल अनेक लोक आपली मत मांडत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनीसुद्धा लिहलेल्या लेखामध्ये त्यांनी चीनच्या पारंपरिक  कार्यपद्धतीच्या वेगळ परराष्ट्र धोरण शी जिनपिंग यांच्या काळात राबवलं गेलं असल्यामुळे भारतालासुद्धा आपलं धोरण वेगळ्या पद्धतीने राबवाव लागणार आहे, असा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे काल जेव्हा संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी संसदेत  स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही आव्हानाचा सामना करणायासाठी आम्ही सज्ज आहोत, तेंव्हा भारताची भूमिका उघड झाली आहे.

आपण सारे जाणतो की जर तुमच्याकडे सामर्थ्य नसेल तर कोणीही येता जाता आपल्याला टपली मारून जातं पण, आता काळ बदलला आहे.  आपली भारतीय सेना सामर्थ्यशाली आहे, भारतीय सैनिकांच मनोधैर्य उदंड आहे, प्रचंड  आहे आणि विशेष म्हणजे भारतीय लोकांची मानसिकतासुद्धा 1962 पेक्षा वेगळी आहे. त्यामुळे युद्ध व्हावं  असं आपण म्हणत नाही, पण  चीनने जर 'आरे' केलं , तर भारताने 'कारे' करण्याची तयारी ठेवली पाहिजे अशीच तमाम भारतीयांची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 08:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...