बरं झाले, मुख्यमंत्री मनातलं बोलले !

फडणवीसांनी ज्या पद्धतीने मीडियाच्या "दुकानदारीचा" उल्लेख केला त्यावरून त्यांचा प्रसारमाध्यमांवरील विश्वास उडालेला दिसतोय. ज्या प्रसारमाध्यमांचा देवेंद्रजींच्या प्रतिमा संवर्धनासाठी उपयोग झाला तेच मुख्यमंत्री फडणवीस अवघ्या ३ वर्षात प्रसारमाध्यमांवर इतक्या शेलक्या शब्दात बोलत असतील, तर नक्कीच काही तरी झालं आहे,

  • Share this:
महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत माणसे सत्तेत गेली, मोठ्या पदांवर सुस्थापित झाली की बऱ्यापैकी बदलतात, 'व्यवहारी' होतात. सत्तेच्या स्पर्शाने त्यांच्या स्वभावात आणि चेहऱ्यावरसुद्धा बऱ्यापैकी गोडवा येतो. ते 'तोलून-मोलून' बोलू लागतात. मनातला राग हास्याच्या पडद्याआड दडवून ठेवतात. ते नम्रही होतात, एखाद्याला ओळखत नसतील तरी त्याचे विनाकारण आभार मानतात. आणि ज्याला 'ओळखून असतात' त्याच्या बाबतीत नको तेवढे उदारही होतात. सत्तेत बसणारे सर्वच जण असे असतात. येथे पक्ष, राजकीय विचारसरणी इत्यादी, इत्यादींचा काही संबंध नसतो. 'जशी मिटिंग, तसे भाषणाची सेटिंग' हा तर या सत्ताधाऱ्यांचा यशस्वी 'पॅटर्न' असतो. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा मनातलं बोलता येत नाही. लोकांना काय आवडेल याचाच जास्त विचार करावा लागतो, त्यासाठी वेळप्रसंगी तोंडदेखली वाक्ये टाकून वेळ मारुन न्यावी लागते, पण कधीतरी अशी वेळ येते आणि मनातली सगळी मळमळ, वैदर्भीय भाषेत ज्याला 'भडास' म्हणतात, ती बाहेर पडते. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी समोर भाषण करताना, प्रसारमाध्यमांच्या विरोधातील 'भडास' त्याच वैतागातून बाहेर काढली. याआधी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण अशा एकाहून अधिक दिग्गज नेत्यांनी प्रसारमाध्यमांवर तोफ डागलेली आपण पाहिलीय. पण फडणवीसांनी ज्या पद्धतीने मीडियाच्या "दुकानदारीचा" उल्लेख केला त्यावरून त्यांचा प्रसारमाध्यमांवरील विश्वास उडालेला दिसतोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना, विधिमंडळात काम करताना ज्या प्रसारमाध्यमांचा देवेंद्रजींच्या प्रतिमा संवर्धनासाठी उपयोग झाला तेच मुख्यमंत्री फडणवीस अवघ्या ३ वर्षात प्रसारमाध्यमांवर इतक्या शेलक्या शब्दात बोलत असतील, तर नक्कीच काही तरी झालं आहे, किंवा होतं आहे. प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा अनिल गोटेंनी उघडकीस आणलेला भ्रष्टाचार आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर होणारे आरोप याची दिल्लीत होणारी चर्चा त्यांच्या हितचिंतकांना अस्वस्थ करणारी आहे. पण तरीही प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री बदलाच्या अफवांना इतकं महत्त्व देण्याची गरज होती का, हा खरा यक्षप्रश्न आहे. वास्तविक पाहता फडणवीस सरकारची गाडी सध्या नाही तेवढ्या वेगात धावतेय. राज्यात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीच्या बातम्यांनी शासनाला दिलासा दिला होता. शिवाय दुर्बल, खरंतर हतबल विरोधी पक्षांमुळे राज्य सरकार भक्कम आणि स्थिर आहे. नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात अगदी सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन विरोधी पक्षांमध्ये 'शरद पवार' यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर एकमत व्हावं, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात असे आजवर कधी घडले नसेल. दोन तगडे विरोधी पक्ष शेतकरी, कष्टकरी लोकांचे जीवन-मरणाचे प्रश्न बाजुला ठेवतात आणि आपल्या नेत्यांचे गुणगाण कोण आधी करणार या भांडणात रमतात. त्या दोन्ही पक्षांना चार युक्तीच्या गोष्टी सांगून, इंदिरा गांधी आधी की शरद पवार या वादात मुख्यमंत्री 'तोडगा' काढतात. मग विधीमंडळ अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या मनासारखे होणार नाही का ? फक्त अधिवेशनाचे काय घेऊन बसलात. शेतकरी संप असो वा मराठा मोर्चा तेथेही कोणी मुख्यमंत्र्यांच्या मनाविरुद्ध वागत नाही. आरंभी बंडाचा झेंडा उभारणारे मंत्रिमंडळातील सारे सहकारी तर आता इतके 'सरळ' झाले आहेत की त्यांच्या मनातील, स्वप्नातील मुख्यमंत्री पदाची खुर्चीच त्यांच्या डोळ्यासमोरून गायब झाली आहे. इतकं सारं आलबेल किंवा 'ऑलवेल' असतांना पाऊस पडत नाही, तीन लाख हेक्टर शेतातील पिके डोळ्यासमोर करपतात. एकाच आठवड्यात मराठवाड्यातील 34 शेतकरी आत्महत्या करतात, कर्जमाफीच्या घोषणेचा उडालेला फज्जा शासन प्रशासनाला लज्जा रक्षणाचीही संधी देत नाही. सगळ्यात दुर्दैवी म्हणजे शेतकऱ्यांच्या घरातील कोवळ्या मुलीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात आणि विशेष म्हणजे या सगळ्या बातम्या 'शासकीय' आकडेवारीसह प्रशासकीय वर्तुळातून मीडियापर्यंत पोहोचतात, अगदी सत्ताधारी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमातून बातम्यांचा आगडोंब उसळतो. सत्तेत वाटेकरी असणारा 'सामना' सुद्धा मनाला येईल ती भाषा वापरून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडतो. मग मुख्यमंत्री गप्प कसे बसणार, ते मनातील भावना बोलून दाखवणारच. नाहीतरी परवा मुंबई मराठी पत्रकारी संघातील कार्यक्रमात त्यांना पत्रकारितेबद्दल, पत्रकारांबद्दल गुडी-गुडी म्हणजे गोडगोड बोलून वेळ मारून न्यावी लागली होती. पण कालच्या बैठकीत 'आपल्या' लोकांच्या मांदियाळीत मुख्यमंत्री आपल्या मनातील बोलून गेले. 'आपल्याबद्दल (भाजप आणि सरकारबद्दल) चांगलं सांगितलं तर प्रसारमाध्यमांची दुकानदारी चालत नाही, आपल्यात काही विसंवाद किंवा वाद असेल तरच त्यांचे दुकान चालते' असे फडणवीस म्हणाले. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांच्या विधानात पुरेपूर तथ्य आणि सत्य ठासून भरलेले आहे. गेल्या तीन वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारांनी जेवढ्या जाहिराची देशाविदेशातील, होय विदेशातील मीडियाला सुद्धा, जेवढ्या जाहिराती दिल्या आहेत. तेवढ्या आजवर कोणत्याच सरकारने दिल्या नाहीत. फक्त महाराष्ट्रातील भाजप सेना सरकारने केलेल्या जाहिरातीचा आकडा काही हजार कोटींवर जातो. त्याशिवाय पक्षपातळीवर भाजपने केलेली जाहिरातबाजी वेगळी. थोडक्यात सांगायचे तर भाजपाने त्यांचे सरकार सगळ्या प्रसार माध्यमांचे जाहिरातदार अर्थात ग्राहक म्हणजे मोठे 'गिऱ्हाईक' आहे. आणि प्रत्येक गिऱ्हाईकाला दुकानदाराला जाब विचारण्याचा अधिकार असतो. मग मुख्यमंत्री महोदयांनी तरी काय वेगळं केलं ? याच भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीचे आंदोलन पेटवणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलेच झोडपले. अगदी त्यांना 'देशद्रोही' संबोधले. शेतकरी आंदोलनाच्या 'सुकाणू' समिती सदस्यांना 'जिवाणू' म्हणून हिणवले, सगळ्यात महत्वाचे म्हणजे फडणवीस यांनी कर्जमाफीवरून राज्यात अराजक माजवले जात असल्याचा आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली. पण त्याचवेळी भाजपाचेच विदर्भातील खासदार नाना पटोले यांनी 'फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे' असे सांगून मुख्यमंत्र्याच्या कार्यपद्धतीचे पद्धतशीर वाभाडे काढले आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांकडे काय उत्तर आहे ? विरोधी पक्षातील सगळे बडे नेते, सिंचन, दारू, आदर्श, अविघ्न सारख्या घोटाळ्यात गुंडाळले गेलेले. प्रसारमाध्यमांना जाकिटाच्या भल्यामोठ्या पाकिटात भरलेले तरीही नाना पटोले सारखा स्वपक्षातील माणूस 'खरं' बोलतो. प्रशासनातील अधिकारीच राज्यातील वाईट स्थितीचे आकडे देऊन शासनाच्या सुंदर प्रतिमेला भग्न करतात मग 'सॉफ्ट टार्गेट' असणाऱ्या मीडियाविरोधात मुख्यमंत्री बोलणार नाहीत का ? जे आजवर काँग्रेस , राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले , अगदी त्याच न्यायाने मुख्यमंत्रीसुद्धा चांगले श्रोते मिळाल्यावर मीडिया विरोधात मनातील दाबलेली भडास काढणार नाहीत का ?
First published: