आषाढस्य प्रथम दिवसे...

आषाढस्य प्रथम दिवसे...

आषाढ महिन्याची अशी ही ओढ, मन व्याकुळ करणारी. जीवाला कासावीस करणारी, तसे पाहिले तर वरुणराजाने पर्जन्यवृष्टी केल्यानंतर येणारा दुसरा महिना असतो आषाढ, पण ओढ लावून फसवणारा पाऊस सालाबादप्रमाणे यंदाही दडी मारून बसलेला दिसतोय.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक,IBNलोकमत

मेघांच्या गर्दीत हरवले

मोरपीस देखणे..

आवेगात उसळले

आणि हिरवाईत मिसळले

मृगाचे हुंदडणे !

रानप्राण खंतावले..

हुंकारले, आता,

आषाढाच्या आशेवर जगणे !

आषाढ महिन्याची अशी ही ओढ, मन व्याकुळ करणारी. जीवाला कासावीस करणारी, तसे पाहिले तर वरुणराजाने पर्जन्यवृष्टी केल्यानंतर येणारा दुसरा महिना असतो आषाढ, पण ओढ लावून फसवणारा पाऊस सालाबादप्रमाणे यंदाही दडी मारून बसलेला दिसतोय. वेधशाळांनी अगदी दोन आठवड्यांपासून दिलेले सगळे 'अंदाज' दरवर्षीप्रमाणे फुकाचे ठरवत पाऊस बरसलाच नाही. कदाचित हा पावसाचा नेहमीचाच प्रकार असावा म्हणून आपल्याकडे ज्येष्ठ महिन्यापेक्षा लोकसाहित्याला आषाढाचेच भारी कौतुक. त्यामुळेच असेल कदाचित कविराज कालिदासाच्या कवितेत ‘आषाढस्य प्रथम दिवसे’च्या शब्दओळी कातर विरहलेणी खोदत जातात... प्रेम भावनेला भारतीय साहित्यात खरे अजरामर केले ते कालिदासाने. तसे पहिले तर, राधा-कृष्णाच्या उफ़ाळत्या प्रेमाने आपल्याकडे मधुरा भक्तीला उधाण आणले होते, पण कालिदासाच्या 'मेघदूत'ने आम्हाला प्रेमाची चिरंतन खोली दाखवली. विरहाने व्याकुळ होणे म्हणजे काय, हे आपल्याला कालिदास शिकवतो.

प्रेम कसे व्यक्त करावे, हे कालिदास सहज सोप्या संकेतांनी सुचवतो. आणि जीवनाकडे कसे पाहावे याचेही मेघाच्या सोबत आपल्याला 'मार्गदर्शन' करतो.  होय 'मेघदूत' या अजरामर काव्यामध्ये फक्त उपमा-उत्प्रेक्षांचा जलसा नाही, चमकदार शब्दांची दिमाखदार आतषबाजी नाही. तर त्यात मानवी मनाच्या विविध छटांचा रंगोत्सव पाहायला मिळतो . मला कालिदास त्यामुळेच आवडतो, अगदी संस्कृत येत नसली तरी. केवळ भाषांतराने देखील तो भावतो.  संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी, केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणारे सी. डी. देशमुख यांच्यासारख्या प्रज्ञावान राजकारणी-विद्वानाला तर कालिदास आणि मेघदूताने भूरळच घातली असावी. त्यांनी केलेले मेघदूतचे भाषांतर आजही अपूर्व आहे. कालिदास 'कविकुलगुरू' असल्यामुळे मराठीतील कुसुमाग्रज, वसंत बापट, बा. भ. बोरकर आदी कवींनाही त्याने भाषांतरासाठी प्रवृत्त केले नसते तरच नवल.  हॅरिस हेलमन विल्सन या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याने १८१३ मध्ये कोलकाता येथे ‘क्लाऊड मेसेंजर’ हा ‘मेघदूता’चा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला होता. गम्मत म्हणजे  ‘क्लाऊड' आणि  'मेसेंजर' हे आजही  संगणक विश्वातील सोशल मीडियात रंगलेल्या तुम्हा-आम्हाला जवळचे वाटणारे संदर्भ.  तर असे हे मेघदूत ,   भारतातील आणि  जगातील डझनावारी भाषांमध्ये मेघदूत पोहचलेले आहे. लक्षावधी लोकांना आजही त्याची ओढ वाटणे, हेच कालिदासचे यश. तसे पाहायला गेलो तर हे महाकाव्य कधी लिहिले त्याचा नीटसा पुरावा उपलब्ध नाही. काही लोकांच्या मते ते २ - ३ हजार वर्षापूर्वीचे नक्की असणार. पण त्यातील नावीन्य नित्यनूतन आहे. हेच कवीच्या काव्यप्रतिभेचे यश म्हणावे लागेल.

खरंतर मेघदूतचे कथानक पहिले तर, त्यात आजकालच्या सस्पेन्स, थ्रिलर किंवा जोरदार धक्का देणाऱ्या कथेसारखे काहीच नाही.  मेघदूतची  कथा खूप साधी. आजीच्या गोष्टीसारखी. पण कालिदासाने त्याला जे अफलातून पैलू पाडलेत , त्याला तोड नाही. ती  गोष्ट आहे एका यक्षाची.  अलकापुरीत, यक्षनगरीत  राहणाऱ्या  एका  यक्षाकडून काही प्रमाद घडतात. कुबेर हा त्यांचा राजा आहे,  'चुकीला माफी नाही ' असा पवित्रा घेत तो  या यक्षाला 'तडीपारी'ची म्हणजे अल्कानगरी एक वर्षासाठी सोडण्याची 'सजा' देतो. नुकत्याच लग्न झालेल्या या यक्षाला पत्नी विरहाचा शाप बसतो  आणि तिथूनच कथा यक्षाच्या भावनिक चाड-उतारासोबत  वळणावळणांनी पुढे सरकते. विशेष म्हणजे , ‘मेघदूत’ आकाराने फारसे मोठे नाही.

 

‘मंदाक्रान्ता’ वृत्तातील अवघ्या ११५ श्लोकांचे हे काव्य ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ अशा दोन भागांत विभागलेले आहे. ‘पूर्वमेघा’त ६३ श्लोक असून, ‘उत्तरमेघा’त ५२ श्लोक आहेत. रूढ अर्थाने ‘मेघदूता’ला कोणतीही पूर्वपीठिका वा कथानक नाही. कालिदास यक्षाला का गावाबाहेर काढले याचे साधे कारणही सांगत नाही, मग त्याच्या घराविषयी, पत्नीसंदर्भात माहिती द्यायची त्याला गरज वाटत नाही. आता बोला, तर सुरुवातीलाच आपल्याला धक्का देऊन कालिदास गोष्ट सुरु करतात. कुबेराने गावाबाहेर काढलेला  अलकापुरीचा हा यक्ष नागपूरजवळच्या रामटेकला येतो . ज्याठिकाणी वनवासातील राम टेकला, थांबला होता, ते स्थान म्हणजे रामटेक.   जे  रामगिरी म्हणूनहि त्याकाळी  ओळखल्या जात असे , त्या पर्वतावर एक आषाढ मेघ विसावलेला दिसतो आणि स्वतःच्या घरापासून दूरावलेला शोकाकुल यक्ष  श्लोकातून  व्यक्त होऊ लागतो.

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्ट सानुम्,

  वप्रक्रिडापरिणतगज प्रेक्षणियं ददर्श...

समग्र पृथ्वीतलावर पसरलेल्या पुष्पकळा आकाशा मधील चांदण्यांमध्ये नेऊन एक विलोभनीय आरास काढण्याचा प्रयत्न करावा, आणि त्याच्या नयनमनोहर देखाव्याने नेत्र आणि मन सुखावून जावे, मोहक सुगंधाने अवघी इंद्रिये सुखी व्हावित ... आणि ज्याच्या श्रवणाने दुसरे काही ऐकू येऊ नये अशी भावना मनी दाटून यावी, असे हे कवी कालिदासाचे  लिखाण म्हणजे आषाढाचे प्रेमसुक्त !

एक वर्षासाठी गाव सोडण्याची शिक्षा लाभलेला हा विरहात बुडालेला यक्ष पहिले आठ महिने कसेतरी काढतो पण , आषाढाच्या पहिल्याच दिवसाने त्याचा सारा  संयम सुटून जातो.   त्याला पत्नीची आठवण अस्वस्थ करू लागते. आजकालच्या व्हाट्सअप , फेसबुक किंवा व्हिडीओ कॉल सारख्या सुविधा त्याकाळात नसल्याने आपल्या पत्नीशी संवाद साधण्यासाठी तो यक्ष  पर्वतावर टेकलेल्या मेघालाच आपले कुशल विरहव्याकुळ पत्नीपर्यंत पोहचवण्याची विनंती करतो. मेघदूताची या कामासाठी अनुमती आहे कि नाही , याची साधी विचारणा करण्या एव्हढा धीर कालिदासापाशी नाही. तो त्या ढगाची प्रतिक्रिया काय याचा विचार सुद्धा करीत नाही. आणि त्याला  अलकापुरीत, यक्षनगरीत  राहणाऱ्या आपल्या पत्नीला संदेश देण्याचे काम सोपवतो. ढगसुद्धा त्याचा आग्रह मोडत नाही. आता खराप्रश्न पुढे आहे.

 

या मेघदूताने अलकापुरीपर्यंतचा प्रवास कसा करायचा ? मेघदूताचे खरे सौंदर्य हेच प्रवासवर्णन आहे. यक्ष प्रत्येक श्लोकागणिक  निसर्गातील रंगचित्रे मोठ्या बहारीने सादर करतो आणि मेघाला आपल्या प्रियपत्नीपर्यंत पोहचण्याचा मार्ग सांगतो . त्याच्या या कथनामध्ये सहजपणे येणाऱ्या प्रेमाच्या उत्फुल्ल आविष्काराच्या कल्पनाविलासाने  मन मोहून जाते. त्याचे शब्द अलंकारिक असतात पण कल्पनांची उंची तुम्हाला मेघदूताची 'नजर'बहाल करते, त्याकाळात विमानाचा शोध लागलेला नव्हता , तरीही कालिदास जे लिहितो , ते कमालीचे तंतोतंत पटते.  आता हाच एक श्लोक घ्या,    ‘त्वय्यादातूं जलमनवते..’ या श्लोकात यक्ष म्हणतो : ‘नदीचा प्रवाह रुंद आहे. तरी आकाशातून पाहणाऱ्यांना तो अरुंद दिसतो. त्यामुळे कृष्णाच्या सावळय़ा रंगाची चोरी करणारा तू मेघ, त्या नदीचं जलप्राशन करण्यास वाकलास की गगनसंचारी लोकांची दृष्टी तुझ्याकडे आकर्षित होईल आणि मध्यभागी इंद्रनील मणी गुंफलेला पृथ्वीच्या गळय़ातील एक सरच जणू आपण पाहत आहोत, अस त्या लोकांना वाटेल.’ कालिदास हा असा शब्दांशी खेळणारा भाषाप्रभू होता, त्याने पहिल्यांदा  मेघाला त्याच्या कथानकाचे नायकत्व बहाल करून त्याबोवती यक्ष-यक्षिणीची कथा गुंफली. त्यात विरहाचा वणवा  आहे पण त्यावर  शृंगाररसाचा वर्षाव करीत प्रत्येक श्लोक  लिहिणारा कालिदास हा भारतातील साहित्याला जागतिक पातळीवर घेऊन जातो . कारण त्याच्या सहज व्यक्त होण्यातही माणसाच्या निसर्गाशी असणाऱ्या  वैश्विक संबंधांचा उच्चतम अविष्कार आहे.

कवी कालिदासांच्या मनातील ही शब्दबद्ध असोशी, तृष्णा खरे तर माणसाच्या आरंभाच्या प्रवासापासून सोबत असलेली. निसर्गाच्या सहवासात जेव्हा माणूसही स्वत:ला निसर्गाचा एक घटक मानत होता, त्यावेळी त्याचे वागणे नैसर्गिक होते; परंतु आम्ही जस-जसे निसर्गापासून तुटत गेलो, तस-तसे आमचे जगणे-वागणे-बोलणे सारे काही, कृत्रिम बनले. या कृत्रिम जीवनाला ‘आषाढ ओढ’ असणार कशी? आषाढाच्या हिरव्या स्वप्नांची गोडी कळणार कशी? विरहाच्या वेदना त्यालाच डसतात, ज्याच्या मनात प्रेमभावना फुललेलया असतात. कालिदास या सगळ्या गोष्टी मोठ्या मजेदार पद्धतीने सांगतो. आपल्या मेघदूताला अलकापुरीपर्यंत कसे जायचे याची वाट दाखवत असताना यक्ष त्याला आवर्जून उज्जैनच्या महाकालाचे दर्शन घेण्याची घेण्याची विनंती करतो. खरेतर उज्जैन यक्षाच्या अलंकापुरीपर्यंत जाण्याच्या मार्गावर नाही. पण तरीही शंकरभक्त कालिदास त्याला वाट वाकडीकरून तिकडे पाठवतो, पण त्या सुंदर नगराचे वर्णन करताना फार बहारदार शब्द वापरतो. उज्जयिनीनंतर वाटेत लागणारी गंभीरा नदी, विन्ध्य पर्वत, चर्मण्वती (चंबळ नदी), दशपूर (मंदसोर), ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र या सर्व प्रवासाचे जे  वास्तवदर्शी पण काव्यात्मक वर्णन कालिदासाने केलेले आहे ते मन थक्क करणारे आहे. एका वैमानिकाने कालिदासाने वर्णन केलेल्या मार्गावरून प्रवास करून त्यावर सचित्र पुस्तक लिहिले आहे, मला नेमके त्याचे संदर्भ आता ठाऊक नाहीत , पण कालिदासाच्या मेघदूताने आषाढाला एक वेगळे कधीही नसम्पणारे वैभव दिले , हे मात्र खरे.

आषाढ हा महिना मोठा विलक्षण, त्याचे नावच मुळी त्याच्या पुढे-मागे येणा-या ‘पूर्वा षाढा आणि उत्तर षाढा’ या दोन नक्षत्रांवरून पडलेले ज्येष्ठाच्या बरसातीने शांतावलेल्या धरतीला आषाढात खऱ्या अर्थाने हिरवा बहर येतो, म्हणून गोकुळातल्या सावळ्या श्रीकृष्णालाही आषाढ आवडतो. जगन्नाथ पुरीचा श्रीकृष्ण-बलराम- सुभद्रेचा रथोत्सव जसा याच महिन्यात तशीच ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात चालणारी पंढरीची वारीही आषाढातच निघते. कृष्णाचा पूर्वावतार भगवान विष्णूला चार महिन्याच्या विश्रांतीची सुरुवातही याच महिन्यातील ‘देवशयनी’ एकादशीला करावीशी वाटते. पण श्रीकृष्णानं भगवद्गीतेत ‘‘मासानां मार्गशीर्षोऽहम्’’ ऐवजी ‘‘आषाढोऽहम्’’ असं म्हणायला हवं होतं अस मला नेहमीच वाटत असतं.

असा हा आषाढ म्हणजे खऱ्या अर्थाने अष्टपैलू महिना, चिखळाळलेल्या शेतात आवेगाने उतरणाऱ्या त्याच्या पाऊसधारांमध्ये प्राणशक्ती दडलेली असते. मातीच्या कुशीत दडलेल्या बियाण्यांना हिरवे बळ देऊन त्या वर आणतातच, पण या हिरव्या पात्यांना ‘सुफलतेचे’ वर दान करून आषाढ नामानिराळा राहतो.. जून महिन्यात दाखल होणाऱ्य़ा मान्सूनचे आगमन एक आठवडा उशिरा झाले. मात्र, त्यानंतर संपूर्ण महिना संपत आल्यावरही पावसाचे अस्तित्व जाणवत नसल्याने देशात चिंतेची परिस्थिती  निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई पट्टय़ात नावाला शिडकावा करून गायब झालेल्या पावसामुळे गेला पाऊस कुणीकडे, असे म्हणण्याची पाळी आली आहे... हे सारे खरे असले तरी आषाढ महिमा आपण विसरू शकत नाही.. आषाढ खरेतर धाकटा, ज्येष्ठ महिना ज्यावेळी पाठ दाखवतो, त्यावेळी साऱ्यांची नजर जिच्यावर स्थिरावते, तो हा लाडका आषाढ.

आषाढातील पाऊस खरोखर नक्षत्रासारखाच देखणा- राजबिंडा- मन मोहवून घेणारा, मृगाच्या पाठीवरील नक्षी पाहून फक्त आमची सीतामायच भुलली नव्हती, आजही गावा-गावातील आया-बाया आकाशापासून जमिनीपर्यंत, शेतातून ओहळापर्यंत चौखूर धावणाऱ्या, खरे तर उधळणाऱ्या मृगसरींवर भुलतात, भाळतात.. त्या मृगाच्या भरवशावर पेरतात जीवनदायी रत्नांचे दाणे..आणि त्याच्या जोडीला असते जीवनगाणे...

आषाढ असा आमच्या अवघ्या जीवनाला व्यापून असतो. संसार तापाने पोळलेल्या वारकऱ्यांची दिंडी जेव्हा पंढरपुरात पोहचते, तेव्हा कृष्ण मेघश्याम आषाढ दोन्ही कर कटेवर ठेवून वीटेवर उभा दिसतो. त्याचेच सावळे प्रतिबिंब प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात उमटलेले. मग त्या हृदयांच्या असंख्य तारा झंकारतात आकाशात ‘जय जय विठोब्बा रखमाई’चा झणत्कांर होतो, वारकऱ्यांच्या मनातील सावळा मेघश्याम आषाढ घन बनून बरसू लागतो. झाडांच्या पानापानातून वाजू लागते टाळी आणि चंद्रभागेच्या पाण्यातून ऐकू येतात अभंग ओळी. ओल्या काळ्या मातीचा होतो अबीर बुक्का आणि मनामनात भरून राहतो आकाशाएवढा तुका..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 11:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading