तमाम शहरी बंधू-भगिनींना आणि त्यांच्या मध्यमवर्गीय जाणिवांना एक खुलं आवाहन...

तमाम शहरी बंधू-भगिनींना आणि त्यांच्या मध्यमवर्गीय जाणिवांना एक खुलं आवाहन...

"गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझ्या शहरी भावा-बहिणींच्या लेखणीला आणि वाणीला भलतीच धार चढलेली दिसतेय. ज्यांचे निम्म्याहून अर्धे आयुष्य ऑफिसच्या सुरक्षित जातं, ज्यांची सकाळ-संध्याकाळ एकतर रस्त्यावरच्या ट्रॅफिक जॅम मध्ये किंवा रेल्वेच्या घुसमटलेल्या डब्ब्यात जाते आणि ज्यांच्या बहुतेक रात्री जेवणानंतर तात्काळ निद्रादेवीची आराधना करण्यात किंवा बेहोशी आणणाऱ्या झम - झमत्या बारमध्ये विलीन होतात अश्या माझ्या शहरी भाव-बहिणींनी शेतकरी संपासंदर्भात जे काही तारे तोडले आहेत त्याला अक्षरशः तोड नाही"

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, IBN लोकमत

गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझ्या शहरी भावा-बहिणींच्या लेखणीला आणि वाणीला भलतीच धार चढलेली दिसतेय. ज्यांचे निम्म्याहून अर्धे आयुष्य ऑफिसच्या सुरक्षित जातं, ज्यांची सकाळ-संध्याकाळ एकतर रस्त्यावरच्या ट्रॅफिक जॅम मध्ये किंवा रेल्वेच्या घुसमटलेल्या डब्ब्यात जाते आणि ज्यांच्या बहुतेक रात्री जेवणानंतर तात्काळ निद्रादेवीची आराधना करण्यात किंवा बेहोशी आणणाऱ्या झम - झमत्या बारमध्ये विलीन होतात अश्या माझ्या शहरी भाव-बहिणींनी शेतकरी संपासंदर्भात जे काही तारे तोडले आहेत त्याला अक्षरशः तोड नाही.

ज्यांची बालपणं गावखेड्यातील आजीच्या लुगड्याच्या दुपट्यात किंवा आजोबांच्या धोतराच्या बाळोत्यात गेली आहेत त्या सगळ्या शहरी मंडळींना आपल्या दोन-तीन पिढ्यांपूर्वीच्या सामाजिक स्थितीचा इतक्या पटकन विसर पडला याचे आश्चर्य वाटण्यापेक्षा दुःख वाटतंय. ही सामाजिक दरी इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढली ? आमचे सामाजिक सामंजस्याचे, समरसतेचे विचार एवढ्या लवकर कसे संपुष्ठात आले या आणि अशा अनेक प्रश्नांनी डोके भंडावून गेलंय.

शहरी मंडळीनो, तुम्ही भलेही खेड्यात, शेतात राहणाऱ्या शेतकरी मंडळींना परकं समजत असाल पण तो तुम्हाला नेहमीच आपलं मानणार. जरा आठवा गेल्या वर्ष-दोन वर्षात सहज कुठेतरी फिरायला जाताना रस्त्याच्या कडेला स्ट्रॉबेरीची, द्राक्षाची बाग दिसली, उसाचं शेत दिसलं, आंब्याचं झाड दिसलं, गुळाचं गुऱ्हाळ  दिसलं तर तुम्ही कसे हक्काने थांबून शेतात घुसला होता आणि तो शेतातला शेतकरी दादा हसून मोठ्या प्रेमाने घ्या-घ्या तुम्हाला हवं तेवढं तोडून घ्या म्हणाला होता. आणि आता सांगा तुमच्या घरात जर असा कोणी खेड्यातला माणूस घुसला तर तुम्ही त्याला साद पाणी सुद्धा द्याल का? नाही ! तुम्ही दरवाजा सुद्धा उघडणार नाही. आणि शक्य झालं तर त्याला हाकलून लावणार, धक्के मारून. नाही...हा तुमचा दोष नाही, हा बदललेल्या परिस्थितीचा दोष आहे. जागा बदलली की संस्कृती बदलते, संस्कृती बदलली की माणसाची प्रकृती बदलते आणि त्यातूनच विकृती जन्माला येते. आज माझ्या शहरी बांधवांच्या मनात शेतकरी वर्गाविषयी जो विखार पेटलाय तो या विकृतीमुळेच. चांगला समाज कधीच विकृती वाढू देत नाही. जमेल तेवढी नष्ट करतो.

हे तुम्ही शिकल्या-सवरलेल्या मंडळींना मी सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. म्हणून शेतकऱ्यांचा संप का होतोय याचा तुम्ही विचार करावा एवढ्यासाठी हा सारा खटाटोप. बरं हे सगळं शहरातील ४ बुकं शिकलेल्या भाव-बहिणींच्या कानी पडलं तर त्यातून काहीतरी चांगलच निघेल, हा आमचा विश्वास.

तुम्हाला ठाऊक आहे का? आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस शंभरातील ९०-९२ माणसें खेड्यात रहायची आणि आता शंभरातील जवळपास ५५-६० माणसं शहराच्या वळचणीला आल्यात. त्या सगळ्यांना उत्तम आयुष्य लाभलं आहे असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही. कारण शहरात राहणाऱ्या बहुतांश लोकांचं आयुष्य झोपड्याच्या खुराड्यात, चाळीच्या बोळक्यात किंवा वन बीएचके फ्लॅटमध्ये किती कष्टानं जात असतं याची आम्हाला कल्पना आहे.

पण तुम्हाला आपल्या शेतकरी भावा-बहिणींच्या दुस्थिती विषयी काहीच ठाऊक नसावे हे योग्य आहे का? तुमच्या शहरी पक्षांच्या पांढरपेशा नेत्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीखाली उगवतात की वर उगवतात हे जसं ठाऊक नाही तसेच तुम्हीसुद्धा. तुम्हाला झुणका, ठेचा-भाकरी किंवा मटण रस्सा-भाकरी खाण्यासाठी शहराजवळच्या ढाब्यावर जायला वेळ असतो पण तोट्यात चाललेल्या शेतीचं अर्थकारण तुम्हाला कधी जाणून घ्यावसं वाटलं का? डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं व्हिसा  धोरण असो किंवा इंटरनेट क्रांतीचा नवा टप्पा अश्या कुठल्याही विषयावर तुमच्याकडे माहिती असते. पण गेल्या २०-२२ वर्षात आपल्या महाराष्ट्रात ५८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या हे समजून घ्यावं असं किती शहरी बुद्धिवंताना वाटलं? समाजाचं प्रतिबिंब साहित्यात उमटतं असं म्हणतात, पण मराठी साहित्यात राज्यातील या शेतीसमस्येविषयी किती लिखाण झालं? किती साहित्य संमेलनात हा गंभीर विषय चर्चिला गेला? किती स्वयंसेवी संघटनांना या समस्येची दखल घ्यावीशी वाटली? किती प्रसार माध्यमांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे? या सगळ्याची उत्तरे नकारात्मकच येतात.

कारण स्वातंत्र्याच्या आधीपासूनच आम्ही शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच करत आलोय. आज जेव्हा शेतीचा प्रश्न बिकट झाला आणि शेतकरी संपावर गेला तेव्हा शहरी लोकांच्या संतापाला लगेच कंठ  फुटला. पण प्रत्येक अस्मानी-सुलतानी आपत्तीत तळपत्या उन्हात कोसळत्या पावसात ज्याने आपल्या शेताचे बांध कधीच ओलांडले नाहीत. सैनिकाच्या शिस्तीत आणि व्रतस्थांच्या मस्तीत जो साऱ्या संकटाना भिडत राहिला,  त्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध अश्या पद्धतीने का फुटला असावा याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. या प्रश्नाला जे कोणी जातीय, वर्गीय किंवा पक्षीय रूप देऊन त्याची खिल्ली उडवताहेत, त्यांना एकच सांगावेसे वाटतेय, भावांनो, प्रश्न हा प्रश्न असतो, जोवर त्याला उत्तर मिळत नाही तोवर तो प्रश्न डोक्यावरून उतरत नाही.

तुम्ही तो कोणत्याही निमित्ताने टाळायला गेलात तर तात्पुरते यश येऊ शकते, पण त्याला तुम्ही फार काळ दाबून किंवा डांबून ठेऊ शकत नाही. हे सगळे चित्र बदलू शकते. शेतकऱ्यांचा उद्रेक शांत होऊ शकतो, त्यासाठी तात्कालिक आणि दीर्घकालीन उपाययोजनांची आखणी आणि अंमलबजावणी केली पाहिजे. कल्याणकारी राज्याची संकल्पना मानणाऱ्या प्रत्येक राज्यकर्त्येने  विकासाची गंगा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवली पाहिजे. आणि त्याला समाजातील विचार करणाऱ्या वर्गाने पाठिंबा दिला पाहिजे. तो देण्याऐवजी जर मध्यमवर्गीय बांधव त्याला समजून नघेता विरोध करत असतील तर, भारताचे काही खरे नाही. येथे वर्गयुद्ध अटळ ठरेल.

देश आणि समाज म्हणून आपण खूपच मोठा टप्पा ओलांडलेला आहे.  स्वातंत्र्यपूर्वी आपण ५६५ संस्थानिकांच्या विविध राजवटीला राहत होतो. छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव पाटील यांच्यासारखे काही मोजके अपवाद वगळता अन्य राज्य आणि तेथील प्रजा म्हणजे राजे-नबाबांची खाजगी मालमत्ता होती. त्यामुळे अवघा समाज गुलामीचे जीवन जगात होता.

इंग्रजांच्या राजवटीत, १९३१ मध्ये भारतीयांचे सरासरी आयुर्मान फक्त २७ वर्षे होते. आज ते ६६ वर्षावर पोहोचले आहे. १९५१ मध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण फक्त नऊ टक्के होते, ते आज ६५ झाले आहे. अजून खूप मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. फक्त आर्थिकदृष्टयाच नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टया संपन्न समाजनिर्मितीचे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. आम्ही हे आव्हान सहजपणे आणि समर्थपणे पेलू शकतो. फक्त त्यासाठी सबळ इच्छाशक्तीची गरज आहे. ती आपण सगळ्यांनी एकत्र येऊन दाखवली पाहिजे. आज आपण सर्वानी मिळून संकटाना, समस्यांना एकत्रित भिडण्याची  ती वेळ आलेली आहे.

१८६८ मध्ये मेईजी क्रांतीनंतर जपानमध्येही आर्थिक अस्थिरता माजली होती. त्या वेळी देशाच्या एकूण विकासासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे तत्कालीन जपानी नेत्यांनी मानले आणि अवघ्या चारेक दशकांत जपानला साक्षर आणि सजग बनवले. त्या वेळी त्या सगळ्या परिवर्तन प्रक्रियेतील महत्त्वाचे योगदान देणाऱ्या किडो ताकयोशी यांनी फार सुंदर उद्गार काढले होते. ते म्हणतात, आमचे जपानी लोक आजच्या युरोप वा अमेरिकन लोकांपेक्षा वेगळे नाहीत. प्रश्न फक्त आहे शिक्षण असण्याचा किंवा नसण्याचा. थोडक्यात सांगायचे तर, शिक्षणाच्या वाटेवर लवकर पाऊल टाकल्यामुळे जपान अनेक वर्षे आशियायी आर्थिक महासत्ता म्हणून टिकला. आता अमेरिकेनंतरचे जपानचे स्थान आता चीनने पटकावलेले आहे.

आम्ही मात्र या सगळया लढाईत पार मागे पडलो आहोत. २०१०च्या पूर्वार्धात ९.३ टक्के असणारा भारताचा विकास दर यंदा थेट सहा  टक्क्यांवर घसरलाय. त्यामुळे जगातील वेगाने विकसित होणारा दुसरा देश म्हणून ओळखला जाणारा भारत आता खालच्या  क्रमांकावर घसरलाय. अर्थात सहा महिन्यांपूर्वी ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्यानंतर एकूणच अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसलाय  हे या सगळयामागील मुख्य कारण असले तरी वाढता भ्रष्टाचार, दप्तरदिरंगाई, वशिलेबाजी यात अडकलेले शासन-प्रशासन  आणि सगळयाच विकासकामांना विरोध करणारे विरोधी पक्ष यामुळेही भारतातील अर्थसंकट आज अधिक गडद झाले. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग अस्वस्थ होणे योग्य नाही.

इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीमुळे अठराव्या शतकात नगरीकरणाची एक उंच लाट उसळली होती. औद्योगिकीकरणातून निर्माण झालेल्या त्या नगरीकरणाच्या लाटेने ग्रामीण जीवनव्यवस्था उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली होती. त्याच सुमारास ऑलिव्हर गोल्डस्मिथ या क्रांतदर्शी कवीने डिव्हास्टेटेड व्हिलेज (उद्ध्वस्त खेडे) या नावाची दीर्घ कविता लिहिली. या कवितेतून त्यांनी ग्रामीण जीवन कसे विनाशाच्या उंबरठयावर उभे आहे, हे अगदी परखडपणे दाखवले होते. ते शब्दश: खरे ठरले, त्यामुळे आजही त्यांची ही कविता इंग्रजीतील अभिजात वाङ्मय म्हणूनच ओळखली जाते..

शेतजमिनीवरचे आक्रमण निष्ठुर व भयकारी

संपत्ती वाढवणारे, पण माणसे नष्ट करणारे

राजेरजवाडे सरदार मोठे होतील किंवा संपतील

त्यांचा जीवनश्वास चालू राहील, जसा अविरत जीवनप्रवास

पण.. जर जमीन कसणारा, देशाची शान असणारा शेतकरी

एकदा का संपला की पुन्हा निर्माण होणे नाही!

कविवर्य गोल्डस्मिथ यांनी ही कविता लिहिली त्या काळात १७६० च्या सुमारास इंग्लंडमध्ये शेतीवर आधारित जीवन जगणाऱ्या लोकांचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक होते. आज सुमारे अडीचशे वर्षानंतर तेथील केवळ दोन टक्के लोकसंख्या शेतीवर आधारित आहे, म्हणजे जेवढे शेतकरी शेतीपासून दुरावले, ते दुरावलेच. ते पुन्हा शेतात, बागेत, आगरात किंवा वावरात उतरलेच नाहीत, आपल्या देशात हि स्थिती यायला फक्त पन्नास वर्षे पुरेसे आहेत. मग तेंव्हा आम्ही अन्नधान्य, दूधदुभते, फळभाज्या काय फक्त आयात करणार ?

नाही ना, मग चला शेतकऱ्याची टिंगलटवाळी करण्याऐवजी बाजू ऐकून घेऊ या...मंडळी, तुमच्या एका हाकेमध्ये शेतकऱ्यांचे मन जिंकण्याचे सामर्थ्य आहे. फक्त तुम्ही आवाज द्या, मग बघा, तुम्ही राष्ट्रगीताचा ऐकलंय-गायलंय, तसा सुजलाम, सुफलाम, भारत  होतो की नाही...

तुमचाच

शेतकरी भाऊ

First Published: Jun 2, 2017 06:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading