कुलभूषण जाधव यांचे काय होणार ?

कुलभूषण जाधव यांचे काय होणार ?

कुलभूषण जाधव यांचे काय होणार याकडे राष्ट्र-महाराष्ट्राचे लक्ष लागलेले दिसते. विशेष म्हणजे, जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयात ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी भारताने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वकिलांच्या मते हा खटला निकालात निघाला तर एका आठवड्याच्या आत निकाल लागेल पण जर रेंगाळला तर काही महिने चालेले. या खटल्यात जो निकाल लागेल तो दोन्ही देशांना मान्य करावाच लागतो आणि त्याविरोधात कुठेही अपील करता येत नाही.

  • Share this:

महेश म्हात्रे, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक 

एकीकडे भारत- पाकसिमेवर पाकिस्तानी सैनिक कुरापती करत आहेत, त्यांच्या हल्ल्याने भारतीय जनमत प्रक्षुब्ध होत आहे. काश्मीरसह सगळ्याच सीमावर्ती भागात ज्याने धुमाकूळ घातलाय  तो कुख्यात दहशतवादी हाफिज सैद जिहादच्या नावावर दहशदवादी कारवाया करतो  हे  पाकिस्तान सरकार जाहीरपणे मान्य करते, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकार पाकच्या आक्रमक आगळिकेने वैतागलेले आहे..कधी नव्हे ते पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल कोटस यांनी पाकिस्तानमुळे भारतीय उपखंडात अशांतता आहे असे विधान केले आहे. नव्याने या पदावर आलेल्या डॅनियल कोटस यांनी पाकच्या नापाक इराद्याची चिकित्सा करताना त्यांच्या हातात असणाऱ्या अणुबॉम्बसंदर्भात चिंताही व्यक्त केली आहे. आणि या सगळ्या ताज्या तणावपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नेदरलँडमधील हेग येथे पीसपॅलेसच्या ग्रेट हॉल आॅफ जस्टिसमध्ये ही सुनावणी होणार आहे.मूळचे सांगलीकर असणारे कुलभूषण जाधव हे मुंबई पोलीस दलातील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पुत्र आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधव यांची बाजू मांडण्यासाठी मूळचे नागपूरकर असणारे, माजी केंद्रीय मंत्री एन के पी साळवे यांचे पुत्र,  प्रसिद्ध विधिज्ञ हरीश साळवे आणि तज्ज्ञ वकिलांचे पथक मोठया तयारीने गेले आहे.  कुलभूषण जाधव यांचे काय होणार याकडे राष्ट्र-महाराष्ट्राचे लक्ष लागलेले दिसते. विशेष म्हणजे, जाधव यांना  पाकच्या लष्करी न्यायालयात ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी भारताने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वकिलांच्या मते हा खटला निकालात निघाला तर एका आठवड्याच्या आत निकाल लागेल पण जर रेंगाळला तर काही महिने चालेले. या खटल्यात जो निकाल लागेल तो दोन्ही देशांना मान्य करावाच लागतो आणि त्याविरोधात कुठेही अपील करता येत नाही.

जवळपास 18 वर्षांनी जाधव केसच्या निमित्ताने भारत-पाक आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथमच समोरासमोर येणार आहेत. 18 वर्षांपूर्वी 10 आॅगस्ट 1999  रोजी भारताने कच्छच्या रणात पाकिस्तानी नौदलाचे एक टेहळणी विमान पाडले होते. यात पाक नौदलाचे 14 जण मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कांगावा करून  60 दशलक्ष डॉलर भरपाईसाठी या  आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा केला होता. 21 जून 2000 रोजी 16 न्यायाधीशांच्या पीठाने 14 विरुद्ध 2 अशा बहुमताने हा दावा फेटाळला होता. मुख्य म्हणजे भारताने त्यावेळेस तो खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवणे गरजेचे नाही अशी भूमिका घेतली होती  कारण पाकच्या विमानाने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती हे प्रथमदर्शनी सिद्ध झाले होते. पण  कुलभूषण जाधव केस वेगळी आहे. या खटल्यामध्ये जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा ठपका ठेवत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. यासाठी पाकने जाधव यांचा कबुलीजवाब ग्राह्य मानलेला दिसतोय. अर्थात या निर्णयाविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आज प्रत्येकी दीड तासांच्या दोन सत्रांमध्ये हा खटला चालेल,  विधिज्ञ हरीश साळवे यांनी मोठ्या तयारीने बाजू मांडल्यामुळे जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयात स्थगिती मिळालेली आहे, एका अर्थाने आम्ही पहिली लढाई जिंकलेली आहे.

आज सुनावणी सुरू झाल्याबरोबर पहिल्यांदा भारताला बाजू मांडण्याची संधी मिळेल. पाकच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जंजुआ आणि सॉलिसिटर जनरल अश्तार औसाफ हे जाधव यांच्या फाशीचे समर्थन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या बचावाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा 18 वर्षांपूर्वीच्या विमान पडण्याच्या केसही निगडित आहे. त्यावेळी आपण  त्यावेळेस तो खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवणे गरजेचे नाही अशी भूमिका घेतली होती, त्या शिळ्या काढिला ऊत आणून पाकला जाधव यांची पाकिस्तानातील अटक आणि त्यांचा कबुलीजवाब याच्या बळावर हा खटला पाकिस्तान आपल्या कायद्यानुसार निकालात काढू शकतो हे सिद्ध करायचे आहे. पण त्याउलट भारताने अगदी पद्धतशीरपणे आपली बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडलेली आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात  मागितलेली दाद हा ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय’ होता. कारण भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आहे व त्यांच्या जीविताला धोकाही आहे, हि वस्तुस्थिती  परराष्ट्र मंत्रालयानं खूप आधीच जाहीर केली होती. भारताने एक-दोनदा नव्हे  तर  जाधव यांची भेट घेण्यासाठी 16  वेळा केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली.

भारतीय दूतावासाच्या प्रतिनिधीला अटक केलेल्या नागरिकांची  भेट नाकारणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होते. जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती 27 एप्रिल रोजी पाकला करण्यात आली होती. त्यावर पाककडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला नाही, या आणि अशा अनेक गोष्टी भारताची बाजू भक्कम करणाऱ्या आहेत. पाकने मात्र  कुलभूषण जाधव हे भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा केला  आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12  मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही त्यांच्या कबुली जबाबाच्या विडिओ सोबत  प्रसिद्ध केली होती. त्याचा प्रतिवाद करताना भारताने  जाधव यांचा इराणी बंदरावरून माल पाकिस्तानात आणण्याचा व्यवसाय आहे आणि त्यांचा रॉशी काही संबंध नाही, असे वारंवार सांगितले आहे. पण कुरापतखोर पाकने ठरवून हे प्रकरण वाढवलेले दिसतेय . आमचे वकील ही  कायदेशीर लढाई मोठ्या ताकदीने लढतील पण भारताशी अखंड वैर पत्करणाऱ्या या सख्या शेजाऱ्याचा सक्त बंदोबस्त करण्यासाठी जे पद्धतशीर प्रयत्न होणे गरजेचे आहेत, ते मोदी सरकार कधी करणार ?

First published: May 15, 2017, 2:44 PM IST

ताज्या बातम्या