#आजचामुद्दा : दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांवर आवाजबंदी

#आजचामुद्दा : दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांवर आवाजबंदी

गणेशोत्सव असो, दहीहंडी असो, नवरात्र असो किंवा दिवाळी. आवाजाशिवाय आमच्याकडे काहीही नसतं .आवाज झालाच पाहिजे. परंतु यंदा हा आवाज बंद होण्याची लक्षणं दिसतं आहेत. कारण जे लाऊड स्पीकरवाले सणांना उत्सवांना हा आवाज करत असतात त्यांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून यंदा 'आवाजबंदी' करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

महेश म्हात्रे , कार्यकारी संपादक आयबीएन लोकमत

सण उत्सव जवळ आले आहेत. आपल्याकडे सण उत्सव किंवा काहीही पारंपारिक गोष्टी करायच्या असल्यास जर त्या आवाजात आणि दणक्यात झाल्या नाहीत तर झाल्यासारख्या वाटत नाहीत. मग गणेशोत्सव असो, दहीहंडी असो, नवरात्र असो किंवा दिवाळी. आवाजाशिवाय आमच्याकडे काहीही नसतं .आवाज झालाच पाहिजे. परंतु यंदा हा आवाज बंद होण्याची लक्षणं दिसतं आहेत. कारण जे लाऊड स्पीकरवाले सणांना उत्सवांना हा आवाज करत असतात त्यांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून यंदा 'आवाजबंदी' करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका अर्थाने तर माझ्यासारखा माणूस आवाजबंदीसारख्या निर्णयाचं स्वागतच करेल. कारण आमच्याकडे ध्वनिप्रदूषणासंदर्भात जी जागरूकता असायला पाहिजे ती जागरूकता अजिबातच नाही. आम्ही कुठलाही व्यक्तीगत सण जरी असेल तरी किमान विचार करत नाही आणि उत्सव आणि उत्साह धुमधडाक्यात साजरा करत रस्त्यावरून जातो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाने जी पातळी गाठली आहे ती धोक्याच्या सीमेपर्यंत पोचलेली आहे. त्यामुळेच कदाचित ध्वनिप्रदूषण करायला ज्यांची यंत्र कारणीभूत ठरतात त्या लाऊडस्पीकर एजन्सीजला पोलिसांनी सातत्याने न्यायालयाच्या चौकटीत बाध्य केलं असेल, त्रास दिला असेल आणि म्हणून कंटाळून पुण्यापासून या लाऊडस्पीकर एजन्सीजने ही आवाजबंदी सुरू केली असेल.

एका अर्थाने जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणावं लागेल. कारण आज जगात सर्वात जास्त ध्वनिप्रदूषण असलेल्या जगातली पाच शहरांमध्ये, जिथे आवाजामुळे ,गोंगाटामुळे लोकांच्या बहिरेपणात जास्तीजास्त वाढ झाली त्या पाच शहरांमध्ये दिल्ली येतं ,मुंबईही येतं. यावरून तुम्ही समजू शकता की भारतात ध्वनिप्रदूषणाबद्दल किती अनास्था आहे.

प्रगत देशांमध्ये हॉर्न वाजवणे हा कायद्याने गुन्हा आहे. तिथल्या लोकांनी या गोष्टीकडे सभ्यतेचा निकष म्हणून पाहिलं आहे. आपल्याकडे मात्र सर्रास हॉर्न वाजवल्याशिवाय वाहनं पुढेच जात नाहीत. तिच गोष्ट सण समारंभांची. जेवढेही उत्सव येतात आपल्याकडे ते उत्सव आवाज केल्याशिवाय आपल्याला साजरे करता येत नाहीत. दहीहंडी तोंडावर आली आहे, मग दहीहंडीमध्ये ट्रकवर जे लोकं बसतात किंवा गावांमध्ये जे काही उत्सव होतात सगळीकडे आवाज केलाच जातो ,वाद्यांचा दणदणाट केलाच जातो. गणपतीमध्ये तर या सगळ्या गोष्टी सर्रास चालतात.

गेल्या 10-15 वर्षात ढोल ताशांच जे काही फॅड वाढतं चाललेलं आहे त्या आवाजाने वाजवणाऱ्यांचे कान तर कालांतराने निकामी होतंच असतील पण ऐकणाऱ्यांचेसुद्धा आपल्याला होताना दिसतात. त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही. तज्ज्ञांच्या मते मुंबई दिल्लीसारख्या शहरांमध्ये वेगाने श्रवणशक्ती कमी होण्याचं प्रमाण वाढतं चाललं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार आपल्याकडे जर एखादा माणूस 40 वर्षांचा असेल तर त्याची श्रवणशक्ती ही 60 वर्षाच्या माणसाइतकी झाली असते. याचाच अर्थ प्रगत देशांच्या तुलनेत आपण आपली ऐकण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी करत चाललो आहोत, हरवत चाललो आहोत. या सगळ्याचा विचार तुम्ही आम्ही केला नाही तर कोण करणार?

जर लाऊडस्पीकर लावणाऱ्या लोकांनी व्यवसाय नको असं ठरवलं असेल आणि आवाजबंदी करायची ठरवलीच असेल तर त्याला साऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सहकार्य केलं पाहिजे. जर ते आवाजबंदी करत असतील ,डीजे नको म्हणत असतील तर आपण या बंदीत सहर्ष सहकार्य केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे.

मी एका खूप मोठ्या तज्ज्ञाला विचारलं होतं की, 'आपल्याकडे आरती आणि उत्सवांच्या वेगवेगळ्या प्रसंगी रणवाद्ये का वापरली जातात मंगल वाद्ये का वापरली जात नाहीत'? तर त्यांनी सांगितलं की आपले उत्सव जास्तीजास्त लोकांच्या कानावर पडण्याचा ध्यास आपण घेतला असल्यामुळे आपण रणवाद्य वाजवतो आणि मंगलवाद्य वाजवत नाही. युद्धाच्यावेळी पूर्वी सैनिकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून जी वाद्य वाजवली जातात ती वाद्य आता देवाच्या मिरवणुकीत आपण वाजवतो.

मंगल वाद्याच्या जागी रणवाद्य वाजवून आपण आपला स्तर दाखवला आहे. सनई चौघडा शुभ प्रसंगी वाजवण्याची वाद्य आहेत, टाळ मृदुंगही भजनात वाजवायची वाद्य आहेत. पण त्याऐवजी ढोल जोरजोरात जेव्हा आपण वाजवतो तेव्हा त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. हे जेव्हा आपल्या तरुणांना कळेल तेव्हा त्यांची उर्जा अधिक सकारात्मक पद्धतीने चांगल्या कामांकडे आपल्याला नेता येईल.

मी असं नाही म्हणणार की ढोल ताशे वाजवण बंद झालं पाहिजे. पण सध्या त्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. नाशिक ढोल जो फक्त नाशिकपुरता मर्यादित होता तो आता पुण्यापासून राज्यभर पसरत चालला आहे. तेव्हा ते वाजवणाऱ्या मुलांच्या श्रवणेंद्रियांचा विचार केला पाहिजे. वाजवणाऱ्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्या शरीराचा शासनानेसुद्धा विचार केला आहे. न्यायालयानेसुद्धा अनेकदा हस्तक्षेप केला आहे.

दिवाळीला कोट्यावधी रुपयांचे फटाके फोडून आपण काय मिळवतो? तर आपण अनेकांची झोप मोड करतो. लोकांच्या कानठळ्या बसवणारे आवाज करून काय साध्य होतं? याचा विचार झाला पाहिजे. न्यायालयाने जेव्हा रात्री 10 नंतर आवाज होऊ नये असा निकाल दिला होता तेव्हा अनेकांनी त्याला विरोध केला होता. लोकांना हा निर्णय उत्सव कसा साजरा करायचा या व्यक्तिगत हक्कावर आक्रमण म्हणून पाहिला होता. पण ते तसं नाहीय. जर हक्क आणि कर्तव्य यातील सीमा लोकांना आपल्याकडे कळतं नसेल तर न्यायालयाने केलेला हस्तक्षेप योग्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.

त्यामुळे आता जर लाऊडस्पीकर वाजवणाऱ्या मंडळींनी बंदी केली असेल तर या बंदीच जे होतं ते चांगलं होतं या न्यायाने आपण स्वागत केलं पाहिजे.

उत्सव मंडळांनी रणवाद्यांऐवजी मंगलवाद्यांचा पुरस्कार केला पाहिजे.

First published: August 11, 2017, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading