ग्वालियर, 23 फेब्रुवारी : परफेक्ट व्यक्ती मिळवण्याची इच्छा माणसाला काय करायला लावेल याचा नेम नाही. प्रेम मिळवण्यासाठी पुरुष असो वा महिला कुठल्याही थराला गेल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं आहे, पण मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ग्वालियर जिल्ह्यातली महिला परफेक्ट व्यक्तीच्या शोधात भटकत राहिली आणि पुरुषांच्या संपर्कात आली. या पुरुषांसोबत तिने संबंध बनवले, पण तिची परफेक्ट व्यक्ती मिळवण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. या महिलेचा शेवट वेदनादायक झाला आहे. 35 वर्षांच्या या महिलेची तिच्या 23 वर्षांच्या प्रियकराने गळा घोटून हत्या केली आहे. विवाहित महिला तिच्या नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होती, पण जेव्हा तिची भेट पहिल्या प्रियकरासोबत व्हायला लागली तेव्हा दुसरा प्रियकर संतापला आणि त्याने महिलेची हत्या केली. आणखी धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने महिलेचा मृतदेह भिंडमध्ये राहणाऱ्या तिच्या नवऱ्याकडे पाठवला. यानंतर नवऱ्याने ग्वालियर पोलिसांना तिचा मृतदेह दिला. पोलिसांनी महिलेच्या हत्याप्रकरणी दुसऱ्या प्रियकराला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भिंडमधला व्यक्ती त्याच्या पत्नीचा मृतदेह घेऊन पोलिसांकडे गेला. आपली पत्नी रानीचा हा मृतदेह असून एक मुलगा तिचा मृतदेह घेऊन ग्वालियरमधून आला आहे, असं त्याने पोलिसांना सांगितलं. हा मृतदेह फॉरेन्सिक एक्सपर्टच्या ताब्यात देण्यात आला. तपासानंतर रानीची हत्या गळा दाबून केल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये समोर आलं. पोलिसांनी रानीच्या 10 वर्षांच्या मुलाची चौकशी केली, तेव्हा त्याने आपल्या गैरहजेरीत सुरेंद्र धाकड नावाचा मुलगा आईला भेटायला यायचा असं सांगितलं. यानंतर पोलिसांनी शेजाऱ्यांचीही चौकशी केली तेव्हा याची पुष्टी झाली. पोलिसांनी सुरेंद्रला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने सगळी गुपितं उलगडली. 23 वर्षांचा आरोपी सुरेंद्र धाकड याची रानीशी 7 महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. रानीने भिंडमध्ये राहणाऱ्या तिच्या नवऱ्याला सोडलं होतं. रानी आणि सुरेंद्र लिव्ह-इनमध्ये राहायला लागले, पण तेव्हाच रानीने तिच्या आधीच्या प्रियकरासोबत बोलायला सुरूवात केली. यावरून सुरेंद्र आणि रानी यांच्यात भांडणाला सुरूवात झाली. तीन दिवसांपूर्वी पहिला प्रियकर रानीला भेटायला तिच्या भाड्याच्या घरी आला होता, यावरून रानी आणि सुरेंद्र यांच्यात वाद झाले आणि सुरेंद्रने रानीचा गळा दाबून तिची हत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.