हैदराबाद, 28 जून : ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे काय होऊ शकतं, याची जाणीव करून देणारी उदाहरणं अलीकडच्या काळात अनेकदा पाहायला मिळतात. तेलंगणातल्या एका महिलेनं या गेमिंगमुळे कर्जबाजारी झाल्याने टोकाचं पाऊल उचललं. गेमिंगचं व्यसन लागल्यामुळे ती महिला कर्जबाजारी झाली होती. तब्बल 12 लाख रुपयांचं कर्ज तिनं घेतलं होतं. ते परत करण्याबाबत तिच्यावर सतत ताण येत होता. त्यालाच कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललं. ऑनलाइन गेम्स खेळून स्वतःचं मनोरंजन करणारे कधी त्या गेम्सच्या आहारी जातात, हे त्यांनादेखील कळत नाही. काही गेम्समुळे तरुणांनी नको ते उद्योग केले आहेत, तर काही गेम्समुळे कर्जबाजारी होऊन काही जणांनी आत्महत्याही केल्या आहेत. अशीच एक घटना तेलंगणमध्ये घडली आहे. कनिष्ठ मध्यम वर्गातल्या एका महिलेला ऑनलाइन गेम्स खेळायची सवय लागली. त्यात पैसे खर्च करण्यासाठी तिने तब्बल 12 लाख रुपयांचं कर्ज केलं. ही रक्कम परत करता न आल्यानं तिच्यामागे देणेकऱ्यांनी तगादा लावला होता. तेलंगण राज्यातल्या यदद्री भोंगीर जिल्ह्यातल्या चौटुप्पल गावात ही घटना घडली आहे. पोलीस व स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूदान पोचमपल्ली मंडलातल्या दंतूरमधल्या राजेश्वरी (27) यांचं वालिगोंडा मंडल इथल्या गोलेनपल्ली गावातल्या अविशेट्टी मल्लेश यांच्याशी 7 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. चौटुप्पल पालिका क्षेत्रातल्या मल्लिकार्जुन नगरमध्ये त्यांचं घर होतं. अनिरुद्ध (3) व हर्षवर्धन (2) अशी दोन मुलं त्यांना होती. (Fake Currency : नकली नोटांची क्वालिटी अशी सुधारली, पोलीसही झाले हैराण, दोघांना अटक) मल्लेश टेम्पोवर ड्रायव्हर म्हणून काम करत होते. चार दिवसांतून एकदा तो घरी यायचा. त्यामुळे राजेश्वरी एकटीच घरी असायची. त्याच काळात वेळ जात नसल्यानं तिने ऑनलाइन गेम्स खेळून पाहिला. त्या या खेळांमध्ये इतक्या गुंतल्या की त्यांना खेळांचं व्यसन लागलं. बरेच पैसे हरल्यावरही त्यांचं हे व्यसन कमी होत नव्हतं. उलट या गेम्ससाठी त्यांनी नातेवाईकांकडून 12 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. नातेवाईकांनी सतत विचारणा सुरू केल्याने मल्लेश यांनी 6 लाख रुपयांचं कर्ज फेडलं. काही नातेवाईकांनी घरी येऊन भांडणंही केली. त्यामुळे राजेश्वरी यांच्या आईनं पैसे परत देण्याची ग्वाही दिली. तरीदेखील काही नातेवाईकांनी मंगळवारी (27 जून) सकाळी राजेश्वरी यांच्या घरी जाऊन पैसे परत करण्याची मागणी केली. याचा ताण सहन न झाल्यानं राजेश्वरी यांनी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पाण्याच्या टाकीत उडी मारली. संध्याकाळपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला. (संतापजनक VIDEO! बाळाला उकळत्या दुधाची अंघोळ; तडफडत होता चिमुकला, सर्व पाहत राहिले तमाशा) ऑनलाइन गेम्सच्या सवयीला वेळीच आळा घातला नाही, तर त्याचं व्यसन लागतं. या व्यसनापोटी आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर काहींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, याचं हे ताजं आणि दुर्दैवी उदाहरण.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







