सोनभद्र, 25 नोव्हेंबर: समाजातील विकृती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपला हेतू साध्य झाला नाही तर काही नराधम कितीही खालच्या पातळीला जात आहेत. 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करताना मुलीने आरडाओरड केला म्हणून बिथरलेल्या आरोपींनी त्या मुलीला घराच्या गच्चीवरुन खाली फेकून देण्यात आलं. 3 आरोपींनी एक मुलीचं अपहरण केलं. तिच्यावर बलात्कार करण्यासाठी त्यांनी तिला एका घराच्या गच्चीवर नेलं. आरोपी बलात्कार करण्याच्या प्रयत्नात असतानाच तिने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. आजूबाजूच्या लोकांनी ऐकलं तर आपण पकडले जाऊ या भीतीने त्या नराधमांनी घराच्या गच्चीवरुन त्या मुलीला खाली ढकलून दिलं आणि स्वत: पळून गेले. उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
काय घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरावल पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांकडे जात होती. रस्त्यावर एकटी मुलगी फिरताना दिसल्यावर 3 नराधमांनी तिचं अपहरण केलं आणि अत्याचार करण्याच्या हेतूने तिला एका घरात घेऊन गेले. घाबरलेल्या मुलीला त्यांचा हेतू आत्तापर्यंत समजून चुकला होता. तिने आपले प्राण वाचवण्यासाठी आरडाओरड केली. आजूबाजूची लोकं ऐकतील आणि आरोपींना पकडतील या भीतीने त्यांनी मुलीला गच्चीवरुन फेकून दिलं. यामुळे मुलगी बरीच जखमी झाली आहे आणि तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
घोरावर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींविरोधात कलम 342, 307, 354ए, 354बी और 7/8 पॉस्कोअंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या कुटुंबातील व्यक्ती 3 आरोपींपैकी दोघांना ओळखतात. तिनही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.