भोपाळ, 23 मे : दोन बहिणींना हेरगिरीच्या संशयातून अटक करण्यात आली आहे. या दोघी कथितरित्या दोन पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क ठेवून होत्या, असा संशय आहे. याप्रकरणी मिलिटरी इंटेलिजन्स आणि पोलीस अधिक तपास करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या महिलांची चौकशी केली जात असून त्या ज्या पाकिस्तानी आयएसआय (ISI) एजंट लोकांच्या संपर्कात होत्या, त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अटक केलेल्या दोन महिलांचे वय 32 आणि 28 वर्षे आहे.
इंदूर पोलिसांना दोन बहिणींनी हेरगिरी केल्याचा संशय असून महू येथील छावणी परिसरातून अटक केली आहे. नकली ओळखपत्राच्या आधारे या दोघी महिला मागील जवळजवळ एका वर्षापासून पाकिस्तानातील लोकांच्या संपर्कात असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या दोघी इंदूर जवळच्या डॉ. आंबेडकरनगरमधील एका शाळेत शिकवतात.
या दोन्ही महिलांचे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. इंदूरचे इंस्पेक्टर जनरल हरी नारायण मिश्रा म्हणाले की, लष्कराचा गुप्तहेर विभाग आणि स्थानिक पोलीस मिळून या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, दोन्ही महिलांना महू येथील ग्वाली पवासिया परिसरातून अटक करण्यात आली, या महिला इतरही काही देशांना महत्त्वाची माहिती पाठवत असल्याचा संशय आहे.
हे वाचा - दिलदार माणूस! कोरोनाग्रस्तांसाठी रिक्षाची केली ॲम्बुलन्स, 500 हून जास्त रुग्णांना मदत
मागील काही दिवसांपासून या महिलांवर नजर ठेवली जात होती, काही ऑनलाइन व्यवहारानंतर त्या दोघी लष्कराचा गुप्तहेर विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या रडारवर होत्या. या दोघी पाकिस्तानच्या किंवा लष्कराशी संबंधित लोकांच्या संपर्कात होत्या असा संशय व्यक्त केला जात आहे. शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या या संबंधित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indore News, Pakistan, Terrorism