रायचंद शिंदे, प्रतिनिधी शिरूर, 19 जुलै : राज्यात आणि देशात सध्या टोमॅटोला सोन्याचे दिवस आले आहेत. काही दिवसांमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. मात्र, याच गोष्टीचा फटकाही शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारात भाव खाणाऱ्या टोमॅटोची शेतातून चोरी होऊ लागली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे अरुण बाळासाहेब ढोमे या शेतकऱ्याने दिवसरात्र मेहनत करुन तोडून ठेवलेला टोमॅटो रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? सध्या टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील अरुण बाळासाहेब ढोमे यांच्याकडेही काही प्रमाणात टोमॅटोचे पिक आहे. यंदा चांगला भाव असल्याने तेही खुश होते. ढोमे यांनी जवळपास 25 ते 30 क्रेट टोमॅटो तोडून बाजारात नेण्यासाठी गाडीत भरून ठेवला होता. मात्र, याच टोमॅटोची रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने ढोमे यांच जवळपास 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान आता पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे. गेली काही दिवसापासून शेतीमालाच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने शेतकरी वर्गामध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. टोमॅटो बेतले जीवावर! सध्या देशभरात टोमॅटोची चर्चा पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे दर इतके वाढले आहेत की आता विकणाऱ्यासोबत घेणाराही श्रीमंतांच्या श्रेणीत गणला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावरही फक्त टोमॅटोची हवा दिसत आहे. लोक मीम्स व्हायरल करत आहे. दुसरीकडे कधी नव्हे ते शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. अशात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात एका टोमॅटो शेतकऱ्याची लुटण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आली. वाचा - टोमॅटो झाला डॉलरपेक्षा भारी अन् करोडपती झाला पुणेकर शेतकरी! नरेम राजशेखर रेड्डी (62) यांची बुधवारी मदनपल्ले मंडलातील बोडीमल्लादिन गावात हत्या झाली. मंगळवारी रात्री ते गावी दूध देण्यासाठी जात असताना त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांनी त्यांना रोखून हात पाय बांधून टॉवेलने गळा आवळून खून केला. शेतात राहणारे नरेम राजशेखर रेड्डी आपल्या गावापासून दूर दूध पोचवण्यासाठी गावात जात होते. त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, काही अज्ञात लोक टोमॅटो खरेदीच्या बहाण्याने शेतात आले होते. पती गावी गेल्याचे तिने सांगताच ते निघून गेले. या शेतकऱ्याने नुकतेच कृषी बाजारात टोमॅटो विकून 30 लाख रुपये कमावल्याचे सांगण्यात येत आहे. हेच पैसे लुटण्याच्या हेतून ही हत्या झाल्याचा संशय आहे. शेतकऱ्याकडे पैसे होते की नाही याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.