रहमान, प्रतिनिधी बस्ती, 12 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, बलात्कार तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशाच्या लोभापोटी शिक्षकाचा मुलगा राक्षस झाला आणि त्याने कुदळीने वार करून आपल्या बापाची हत्या केली. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील शोभनपार गावातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मुलाने वडिलांच्या नावावर 40,000 रुपये कर्ज घेतले होते. ते भरण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. अशात वाद इतका वाढला की, मुलाने वडिलांच्या डोक्यात कुदळीने वार करून खून केला. हे या खूनामागचे कारण आहे.
आरोपी मुलगा सुधीर हा व्यवसायाने शिक्षक आहे. त्याने आपले 65 वर्षीय वडील बुधीराम यांच्या नावावर KCC कडून 40,000 रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम जमा करण्यावरून अनेकदा वाद होत होते. बुधीरामने दोन-तीन दिवसांपूर्वी झाड विकले होते, झाड विकून मिळालेले पैसे कर्ज खात्यात जमा करण्यासाठी सुधीर दबाव टाकत होता. पण बुधीरामने कर्जाचे पैसे जमा करण्यास नकार दिल्याने मुलगा वडिलांच्या जीवाचा शत्रू झाला. अशा स्थितीत आज सकाळी बुधीराम शौचासाठी घराबाहेर पडत असताना वाटेत मुलगा सुधीर याने कुदळीने त्याच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. सीओ प्रीती खरवार यांनी सांगितले की, सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची तपासणी केली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध लालगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व चौकशी करून पोलीस याप्रकरणी कायदेशीर कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले.