मुंबई, 29 जानेवारी : ऑनलाईन फसवणुकीमुळे रोज लाखो मुंबईकरांची फसवणूक होते. एखाद्याची ऑनलाईन फसवणूक झाली आणि त्याचे पैसे परत मिळालेत असं कधी ऐकलय का? पण असा चमत्कार मुंबईतच झाला आहे आणि तो ही करुन दाखवला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने. मुंबई सायबर पोलीस स्टेशनमध्ये निराश चेहरा घेऊन आलेली एक व्यक्ती बाहेर जाताना मात्र आनंदात होती. मनोज शहा यांना 1 किंवा 2 नाही तर तब्बल 10 लाख 71 हजार रुपये परत मिळाले. 25 जानेवारीच्या दुपारी मनोज शहा यांच्या खात्यातून 12 लाख 70 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. पण मनोज शहा यांनी ते पैसे काढले नव्हते की कोणाला चेक ही दिला नव्हता. मनोज शहा यांनी तत्काळ बँकेत फोन केला. दोन दिवसांपूर्वीच मनोज शहा यांना एका कंपनीतून फोन आला होता. यावेळी एका मोठ्या कामासाठी मनोज शहा यांच्याकडून त्या कंपनीने कोटेशन मागवून घेतले आणि एडवान्स रक्कम देण्यासाठी मनोज शहा यांना त्यांच्या कंपनीच्या लेटर हेडवर बॅंकेचे डिटेल्स पाठवायला सांगितले. मनोज शहा यांनी त्याप्रमाणे त्या कंपनीला सर्व माहिती लेटर हेडवर लिहून पाठवली आणि त्याच लेटरहेडचा वापर करुन त्या चोरांनी मनोज शहा यांच्या बॅंकेला मेल केला आणि 12 लाख 70 हजार रुपये दिल्ली आणि हरियाणा येथील खात्यात डिपाॅझिट करायला सांगितले. एवढच नाही तर बँकेतून बोलतोय असा फोन करुन चोरांनी मनोज शहांच्या नावाने बॅंकेला फोन केला. हे ही वाचा- देशातील Most Wanted गँगस्टर पपला गुर्जरला अटक; कोल्हापूरात आवळल्या मुसक्या त्यानंतर मात्र मुंबई पोलिसांचे सायबर सेल यांनी तातडीने यावर कारवाई सुरू केली. मनोज शहा यांच्या खात्यातून पैसे गेल्या गेल्या त्यांनी बॅंकेत आणि मुंबई सायबर सेल पोलिसांना संपर्क केला. ज्यामुळे पोलिसांनी आपली सुत्रे हलवून आरबीआयच्या नोडल ॲाफिसरशी संपर्क करुन मनोज शहा यांच्या मुंबईतील बॅंक खात्यातून दिल्ली आणि हरियाणा येथील अनोळखी ज्या बॅंक खात्यात पैसे जमा झाले होते ते बँक खाते तत्काळ गोठवले. पण तोपर्यंत त्या दोन अनोळखी व्यक्तींनी बॅंक खात्यातून 2 लाख रुपये काढले होते. पण ती दोन बॅंक खाती तात्काळ गोठवल्याने मनोज शहा यांचे 10 लाख 70 हजार चोरांना काढतां आले नाही. ज्यामुळे मनोज शहा यांना त्यांचे रुपये परत मिळाले. मुंबई पोलीस सायबर सेलचे एसीपी नितिन जाधव यांच्या टीमने ही कामगिरी केली असून मुंबई पोलिस सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी याबाबत नितिन जाधव टीमला मार्गदर्शन केले होते. मुंबई सायबर सेलमुळे मनोज शहा यांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले. खात्यातून पैसे जाताच मनोज शहा यांनी हुशारी दाखवत तत्काळ पोलिसांशी संपर्क केला अशीच हुशारी जर सर्वांनी दाखवली तर अशी फसवणूक टाळतां येईल असं सायबर तज्ञ उन्मेष जोशी यांचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.