चंदीगड, 06 मार्च: शुक्रवारी सकाळी काही अज्ञात चोरट्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचं ATM मशीनचं चोरून नेलं आहे. यावेळी त्याने ATM मधील पैसे चोरण्यासाठी थेट मशीन गाडीला बांधून उपटली आहे. यानंतर चोरट्यांनी ही मशीन गाडीत टाकून घटनास्थळावरून पोबारा केला आहे. या मशीनमध्ये 22 लाख 88 हजार रुपयांची रोकड असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पंजाबमधील सरहिंद येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ATM मशीनवर डल्ला मारला आहे. यावेळी त्यांनी ATM मशीन उपटून काढण्यासाठी गाडीचा वापर केला आहे. चोरट्यांनी मशीनला दोरखंडाने बांधून गाडीने ओढलं आहे. यानंतर हे मशीन गाडीत टाकून चोरट्यांनी पोबारा केला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळापासून पोलीस चौकी केवळ 300 मीटर अंतरावर आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सरहिंद येथील जकात क्रमांक 4 जवळ घडली आहे. येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास काही चोरटे काळ्या रंगाच्या कारमध्ये आले. त्यानंतर त्यांनी ATM मशीनला दोरीने बांधलं, मग गाडी टो करून मशीन बाहेर काढली. कारने मशीन खेचताच ATM मशीन उपटून निघाली. त्यानंतर चोरट्यांनी मशीन गाडीत टाकून पसार झाले आहेत.
हे ही वाचा -धक्कादायक, पोलीस कर्मचारीच निघाला बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातला आरोपी!
स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर यांनी सांगितलं की, गुरुवारी मशीनमध्ये 18 लाख 88 हजार रुपये भरण्यात आले होते. मशीनमध्ये नोटा लोड करण्यापूर्वी त्यात अगोदरपासून 4 लाख रुपये होते. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचंही मॅनेजरनी सांगितलं आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Police investigation, Punjab, Robbery, Robbery Case, Sbi ATM, SBI Bank News, Theft