लखनऊ, 26 ऑक्टोबर : दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, चोरी अशा प्रकारचे गुन्हे वाढले आहेत. किरकोळ वादाचं रुपांतर खुनासारख्या गंभीर गु्न्ह्यात होताना दिसत आहे. अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली आहे. कारच्या पार्किंगवरून किरकोळ वाद झाल्यानंतर चार ते पाच हल्लेखोरांनी एका युवकाला जबर मारहाण करत त्याची हत्या केली आहे. मृत युवक निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोड रेज अर्थात रस्त्यावरील हाणामारीचा बळी ठरलेला युवक अरुण (वय 35) टीला मोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील जावळी गावाचा रहिवासी होता. मृत युवक अरुण हा दिल्ली पोलिस दलातून निवृत्त पोलीस अधिकारी कुँवर सिंह यांचा मुलगा आहे. या प्रकरणाचा रोड रेजसह इतर अनेक बाजूंनीही तपास केला जात आहे.
दरम्यान, घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात जमिनीवर पडलेल्या युवकावर अन्य युवक विटांनी हल्ला करत असल्याचं दिसत आहे. घटनेनंतर कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
हे वाचा - संतापजनक! पत्नी गळफास घेत असताना पतीचं धक्कादायक कृत्य, वाचून बसणार नाही विश्वास
आज तकच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, अरुण त्याच्या दोन मित्रांसोबत मंगळवारी रात्री सुमारे 9.30 वाजता जेवण्यासाठी गेला होता. या वेळी कार पार्किंगवरून त्याचा अज्ञात युवकांशी वाद झाला. हा वाद इतका वाढला, की त्या पाच ते सहा अज्ञान युवकांनी अरुणला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अरुण गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या अरुणला तत्काळ दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर अरुणला मृत घोषित केलं. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.
या प्रकारची एक घटना नोएडा येथे घडली होती. 1 मे 2022 रोजी कारला धक्का लागून स्क्रॅच पडल्याने झालेल्या वादातून एका कारचालकाने दुसऱ्या युवकाला फरपटत नेण्याचा प्रयत्न केला होता. नोएडा- ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर ही घटना घडली होती. आरोपी कार चालकाने अचानक कार मागे घेतली आणि युवकाला फरफटत नेत निघून गेला. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला कैलास रुग्णालायात भरती करण्यात आलं होतं.
हे वाचा - दरोड्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आवळल्या मुसक्या; अंधारात सिनेस्टाईल पाठलाग
दरम्यान, एक महिन्यापूर्वी राजधानी दिल्लीत एक रोड रेजची घटना समोर आली होती. एक पोलीस कर्मचारी रोड रेजच्या घटनेचा बळी ठरला होता. रस्त्यावरून जाताना किरकोळ वाद झाल्यानंतर तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. किरकोळ वादातून एका तरुणानं पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याने त्याला रुग्णालयात भरती करावं लागलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news