तिरुवनंतपुरम, 1 नोव्हेंबर : ब्रेकअप करत नाही म्हणून एका प्रेयसीने प्रियकराला विष देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार तिरुवनंतपुरममध्ये घडला आहे. केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने या तरुणीला अटक केली आहे. या तरुणीवर तिच्याशी संबंध तोडण्यास नकार देणाऱ्या एका 23 वर्षीय प्रियकराला विष देऊन त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. ताब्यात घेण्याच्या आदल्यादिवशी 22 वर्षांच्या आरोपी ग्रीष्माला पोलीस शौचालयात नेत असताना कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
अधिकाऱ्याने सांगितलं की, रविवारी रात्री मुलीला आत्महत्येच्या प्रयत्नात ताब्यात घेण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांनी तिचा जबाब नोंदवला आहे. आता आम्ही न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर रिमांड अर्ज दाखल केला. तिच्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे न्यायदंडाधिकारी येथे रुग्णालयात येऊन तिला कोठडीत पाठवतील असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.
कीटनाशक प्यायल्यानंतर तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा
आदल्यादिवशी ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. सिल्पा यांनी न्यूज एजन्सीला सांगितलं की, या तरुणीने विषप्राशन केलंय, असा आम्हाला संशय आला, त्यामुळे आम्ही तिला लगेच रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी आता तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय. आम्ही तिच्यावर लक्ष ठेवून आहोत. तरुणीने परसाला येथील रहिवासी शेरॉनला विष दिल्याचं कबूल केल्यानंतर तिला रविवारी 30 ऑक्टोबर रोजी आम्ही ताब्यात घेतलं होतं, असंही त्या म्हणाला.
10 दिवसांनी झाला शेरॉनचा मृत्यू
तरुणीचं दुसऱ्या व्यक्तीशी लग्न ठरलं होतं. त्यामुळे ती तिच्या प्रियकराला ब्रेकअप करण्यास सांगत होती. केरळमध्ये तिच्या प्रियकराची हत्या केल्याच्या आरोपाखाली तरुणीला ताब्यात घेण्यात आलं होतं, असं अतिरिक्त पोलीस महासंचालक अजित कुमार यांनी सांगितलं. ग्रीष्माने 14 ऑक्टोबरला शेरॉनला आपल्या घरी बोलावलं होतं. तिने त्याला कथितरित्या कीटकनाशक असलेला आयुर्वेदिक काढा प्यायला दिला होता. 10 दिवसांपेक्षा जास्त काळ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार केल्यानंतरही शेरॉनचा 25 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.
अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणाले की, “मुलीचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी ठरलं होतं. त्यामुळे ती अनेक मार्गांनी प्रियकरापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होती. पण वारंवार अपयशी ठरल्यानंतर तिने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. हेच तिच्या वक्तव्यावरून लक्षात येतंय.” तरुणीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.