पप्पू पांडेय, प्रतिनिधी अमेठी, 12 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये लग्नाच्या बहाण्याने तरुणीचे लैंगिक शोषण झाल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गौरीगंज पोलीस ठाणे परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या प्रियकरावर लग्नाच्या बहाण्याने अनेक वर्षे बलात्कार केला, असा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुन्शीगंज भागातील त्रिलोकरपूर गावातील प्रभात कुमार प्रयागराजच्या चकपट्टी भागात राहतो. प्रभात कुमारने त्याच्या नातेवाईकाच्या घरी राहून गौरीगंज भागातील एका गावातील प्रेयसीवर लग्नाच्या बहाण्याने चार वर्षे बलात्कार केला. लग्नाची चर्चा सुरू असताना प्रभातच्या दोन बहिणी अडसर बनून त्याला लग्न करू देत नाही आहेत. त्याचवेळी पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रभातने तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून औषध घेऊन गर्भपात करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यावरून प्रियकर आणि प्रेयसीमध्ये बराच वाद झाला.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा प्रियकर प्रभातने त्याच्या दोन बहिणींसह तिला प्रयागराज येथे नेले आणि येथील रुग्णालयात तिची तपासणी केली. चाचणी अहवालानंतर डॉक्टरांनी तिला 17 जुलै रोजी गर्भपातासाठी येण्यास सांगितले. प्रभातने गर्भपात करण्याचा हट्ट केल्यावर तरुणी नाराज झाली आणि तिने सगळा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने मंगळवारी तिला गौरीगंज पोलीस ठाण्यात नेले. तसेच प्रभात कुमारवर लग्नाच्या बहाण्याने वर्षानुवर्षे लैंगिक शोषण केल्याचा आणि तिच्या बहिणींविरुद्ध कट रचल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. याप्रकरणी आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गौरीगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.