राजापूर, 18 जानेवारी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. भालावलीमधल्या दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणारी ही व्यक्ती अज्ञात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दोन्ही मुली नजीकच्या महाविद्यालयातून घरी जात असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सिद्धी संजय गुरव आणि साक्षी मुकुंद गुरव अशी या दोन मुलींची नावं आहे. या दोन्ही मुलींचं वय 22 वर्ष एवढं आहे. या दोन्ही मुली भालवली वरची गुरव वाडी इथल्या रहिवासी आहेत. या हल्ल्यामध्ये दोन्ही मुली जखमी झाल्या असून एकीची प्रकृती गंभीर आहे. सिद्धी आणि साक्षी या दोन्ही मुली भालावली सिनियर कॉलेज धारतळे येथे शिकत होत्या. या प्रकरणी नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी मुलींना धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे. मुलींवर हा हल्ला कुणी केला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या मुलींवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून हल्लेखोर फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनायक शंकर गुरव यांना ताब्यात घेतलं आहे. जमिनीच्या वादातून या मुलींवर हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.