वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 27 जून : एकतर्फी प्रेम प्रकरणातून पुण्यात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर एकाने कोयत्याने हल्ला केला. प्रेमसंबंधास नकार दिल्याने प्रियकराने गुन्हा करण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील. पण विवाहित तरुणीने प्रियकर तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून तरुणाचे अपहरण करून त्याला गुजरातमधील वापी येथे नेण्यात आले होते. उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून वापी येथे जाऊन तरुणाची सुटका केली. काय आहे प्रकरण? पुण्यातील एका तरुणाचे गुजरातमधील वापी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या एका 28 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचा विवाह करण्याचे निश्चित केल्याने तो पुण्यात परत आला होता. तरुणाने प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या विवाहित तरुणीने तरुणाचे अपहरण करण्याचा कट रचला. इतकेच नाही तर तरुणाचे अपहरण करुन थेट वापीला नेऊन डांबून ठेवल्याने एकच खळबळ उडाली होती. तरुणाचे अपहरण करण्यासाठी दोघांना दिली सुपारी आरोपी तरुणीने प्रियकर तरुणाच्या अपहरणासाठी दोघांना सुपारी दिली होती. या प्रकरणी तरुणीसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. प्रथमेश राजेंद्र यादव (वय 21, रा. बच्छाव वस्ती, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आणि अक्षय मारुती कोळी (वय 26, रा. पुसेगाव, गोरे वस्ती, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तरुणाच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. वाचा - पुण्यात चाललंय काय? MPSC तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; धक्कादायक Video आला समोर तरुणाचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचे एनडीए रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात दिसून आलं होतं. तांत्रिक तपासात आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या पथकाने वापी येथे एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. महिलेच्या दोन साथीदारांना पुसेगाव येथून अटक करण्यात आली. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार; तसेच उमेश रोकडे, तानाजी नांगरे, किरण देशमुख, विनोद शिंदे यांनी ही कारवाई केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.