चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 20 जून : पुणे शहराला रात्री अवघ्या 20 वर्षाच्या गावगुंडाने शब्दश: वेठीस धरलं. पपुल्या वाघमारे या वारजे भागातील गुंडाच्या टोळीने कर्वेनगर आणि तळजाई परिसरात 40 च्यावर गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवली एवढंच नाही. दोघा तिघांवर कोयत्याने वारही केले. अखेर पोलिसांनी या गावगुंडाला जेरबंद करून त्याच भागात त्यांची धिंडही काढली. पण एका गावगुंडाने सामान्य नागरिकांच्या हकनाक गाड्या फोडल्या त्याची भरपाई कोण देणार? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. काय आहे प्रकरण? पुण्यात काल रात्री पपुल्या वाघमारे नावाच्या अवघ्या 20 वर्षांच्या गावगुंडाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. एका आरोपीच्या शोधात या टोळक्याने वारजेत फक्त गाड्यांची तोडफोडच केली नाही तर येणाऱ्या जाणाऱ्यांवर कोयत्यांचे वार करून जखमीही केलं. वारजेत दहशत माजवून झाल्यावर हे टोळकं एका आरोपी साथीदाराच्या शोधात थेट तळजाईला पोहोचलं तिथं तर त्यांनी शब्दश: उच्छाद मांडला. तिकडे त्यांनी तब्बल 30 गाड्या फोडल्या. काही लोकांच्या घराच्या दरवाजावरही कोयत्याने वार केले. वाचा - दर्शनाचा मृत्यू नेमका कसा झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा अवघ्या 20 वर्षाच्या गावगुंडाने रात्रभर हा एवढा उच्छाद मांडल्याचं पोलिसांना समजतात मग पोलिसांनीही या पपुल्या वाघमारेला त्याच्याच अड्ड्यावरून उचललं आणि जिथं तोडफोड केली तिथंच त्याची धिंड काढली. या तोडफोड प्रकरणी वारजे पोलिसांनी 6 आरोपींना तात्काळ जेरबंद केलं. वारजे आणि तळजाईत 42 गाड्या फोडणारा हा पपुल्या वाघमारे मूळचा बार्शीचा आहे. इथं वारजेतील रामनगर झोपडपट्टीत राहतो. अल्पवयीन असतानाच त्याच्यावर हाफ मर्डरचे 5 गुन्हे दाखल आहेत. तर सज्ञान होताच आणखी पाच गुन्हे त्याच्यावर नोंद झालेत तेही 307 चे. म्हणूनच वारजे पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला होता. पण जेलमधून सुटताच या पुपल्याने पुन्हा अशी दहशत माजवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.