रिपोर्ट : संतोष कुमार
50 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याप्रकरणी दोन गुन्हेगारांना शिक्षा झाल्याची घटना समोर आली आहे. पकडण्यात आलेले हे दोन्ही जण 19 ते 20 वर्षांचे असताना फरार झाले होते, पण वयाच्या 68-69 व्या वर्षी त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. तब्बल 50 वर्ष हे दोघंही पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत होते. बिहारच्या छपरा जिल्ह्यामधली ही घटना आहे.
कानून के हात लंबे होते हैं, हा हिंदी चित्रपटातला घासून गुळगुळीत झालेला डायलॉग छपरामधल्या या प्रकरणामुळे सत्यात उतरला आहे. रेल्वेमध्ये केलेल्या चोरीप्रकरणी रेल्वे सुरक्षा पोलिसांनी दोन आरोपींना 49 वर्षांनी जेलमध्ये पाठवलं आहे.
प्रभू राय आणि गोधन भगत मित्र होते. गुन्हा केला तेव्हा एकाच वय 19 आणि दुसऱ्याचं वय 20 वर्ष होतं, त्यावेळी दोघांनी रेल्वेमध्ये चोरी केली होती. आता प्रभू रायचं वय 68 आणि गोधन भगतचं वय 69 आहे. दोघांच्या नावावर वॉरंट काढण्यात आलं होतं, त्यानंतर आता या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातला एक आरोपी नयागाव आणि दुसरा आरोपी डोरीगंजमधून पकडण्यात आला. हे दोघंही सोनपूर आणि नयागाव भागातच राहतात.
या दोघांचा शोध घेण्यासाठी 100 पेक्षा जास्त वेळा तपास आणि छापेमारी करण्यात आली. यानंतर दोघांच्याविरोधात 2001 साली वॉरंट जारी करण्यात आला. छापेमारीवेळी डोरीगंज स्टेशन अंतर्गत असलेल्या इस्माईलपूरच्या 69 वर्षाच्या गोधन भगतला अटक करण्यात आली. तर सोनपूरच्या नयागाव ठाण्याच्या हद्दीतल्या हासिलपूरमधून 68 वर्षाच्या प्रभू रायलाही अटक झाली आहे. या दोघांविरोधात रेल्वे संपत्तीची चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे.
गोधन भरत हा सुरूवातीला नयागावमधल्या हासिलपूरमध्ये राहत होता, यानंतर त्याने संपत्ती विकून इस्माईलपूरमध्ये घर बनवलं. अटक केल्यानंतर दोघांना रेल्वे कोर्टात नेण्यात आलं त्यानंतर दोघांची रवानगी जेलमध्ये झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.