मुंबई, 06 ऑगस्ट: पासवर्ड लक्षात न राहणं किंवा हॅक होणं (Password Hacking) ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. पासवर्ड हॅक होण्याच्या घटना तर आपण अनेकदा ऐकतो. तुम्ही कॅरियर लॉकबद्दल ऐकलं असेल. खूप पूर्वी हे लॉक मार्केटमध्ये येत असे. रिलायन्सच्या फोनमध्ये हे लॉक उपलब्ध असायचं. अशा फोन्समध्ये दुसऱ्या कंपनीचं सिम कार्ड चालायचं नाही. अर्थात आता अशा प्रकारचे फोन कमी आहेत; पण परदेशात मात्र अजूनही अशा प्रकारचे फोन मिळतात. आता अशा प्रकारच्या फोनमधून कुणी कोट्यवधींची कमाई केली असं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का? पण असं खरंच घडलं आहे. नवभारत टाइम्सच्या वेबसाईटवर याबद्दल वृत्त देण्यात आलं आहे.
अशा प्रकारच्या फोनचा वापर करून एका व्यक्तीनं तब्बल 2.5 कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास 198.41 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे धक्कादायक असलं तरी खरं आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील (California, US) ही घटना आहे. ऑर्गिस्ट्री खुदावरद्याण असं या व्यक्तीचं नाव आहे. तो 44 वर्षांचा आहे. ऑगिस्ट्री हा पासवर्ड चोरी करून लाखो डॉलर्सची कमाई करत असे, असा त्याच्यावर आरोप आहे. त्यानं T-Mobile च्या सिस्टीमला हॅक करून युजर्सचे फोन अनलॉक केले आणि एवढी कमाई केली आहे.
हेही वाचा- गुटखा शौकीन चोरांचा कारनामा! चोरला 10.50 लाख रुपयांचा विमल गुटखा
अमेरिकेच्या मार्केटमध्ये एकाच सिम कार्डबरोबर वापरले जाऊ शकतील असे काही डिव्हाईस मिळतात. यामध्ये अन्य कोणत्याही कंपनीचं सिम वापरता येत नाहीत. T-Mobile ही अशाच प्रकारचे मोबाईल फोन विकणारी कंपनी आहे.हा आरोपी T-Mobile स्टोअरचा मालक आहे. हे स्टोअर लॉस एंजेल्सच्या ईगल रॉक परिसरात आहे. या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीनं युजर्सचे फोन अनलॉक केले. या अनलॉक झालेल्या फोनमध्ये कोणत्याही नेटवर्कचं सिमकार्ड वापरलं जाऊ शकतं. अशाप्रकारे या व्यक्तीनं 2.5 कोटी डॉलर्स कमावले.
कोणत्याही लॉक केलेल्या फोनचा पासवर्ड चोरी करण्यासाठी तो युजरला फिशिंग मेल पाठवत असे. त्या माध्यमातून त्याला त्या कंपनीचा सिस्टीम अॅक्सेस मिळाला. याच अॅक्सेसनं तो फोन अनलॉक करत असे. 2014 ते 2019 या काळात या व्यक्तीनं अनेक फोन्स अनलॉक केल्याचं त्यानं सांगितलं. या व्यक्तीला या सगळ्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. आता 17 ऑक्टोबर रोजी याबाबतचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hacking, Mobile Phone, Money fraud