अकोला, 9 जून : चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या पणजोबाला पोक्सोच्या विशेष न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 10 नोव्हेंबर 2018 रोजी अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या परिसरात हा प्रकार घडला होता. ही नात साडेतीन वर्षाची असून नराधम पणजोबा हा घटनेच्या दुसऱ्या दिवशीपासून कारागृहात आहे. तसेच विशेष न्यायालयाने तीन लाखांचा दंड ठोठावला असून दीड लाख रुपये पीडित नातीला देण्याचे आदेश ही दिले आहेत.
फिर्यादी व आरोपीची मुलगी हे जवळजवळ राहत होते. फिर्यादी या साडेतीन वर्षाच्या नातीला घरी ठेवून दहा नोव्हेंबर 2018 रोजी नेहमीप्रमाणे कामाला गेल्या होत्या. त्यानंतर आरोपी हा नातीला भेटला. तिच्याशी गोड बोलून तिच्यावर अत्याचार केला. फिर्यादी घरी आल्यानंतर पीडित मुलगी वारंवार रडत होती. तिने आजीला गुप्तांग दुखत असल्याचं सांगितलं. आजीने तिला विचारले तर तिने डोंगरे आबा आले होते, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी मुली नीट तपासलं. तिची परिस्थिती बरी नव्हती. म्हणून त्यांनी तिला थेट सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी यादवराव अर्जुनराव डोंगरे (वय 72 वर्ष, रा. आसरा, ता. भातकुली, जिल्हा अमरावती) यास 376 (2), (एफ) आणि पोक्सो 4, 5 नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी यादवराव डोंगरे यास अटक केली. तेव्हापासून आरोपी हा जिल्हा कारागृहात बंद आहे.
हे ही वाचा-अल्पवयीन मुलीची छेडछाड रोखणं जीवावर बेतलं;राज्यस्तरीय बॉक्सरची चाकू भोकसून हत्या
याप्रकरणी पोक्सो विशेष न्यायालयाने 11 साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. पोक्सो विशेष न्यायालयाचे अतिरिक्त स्तर न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी याप्रकरणी आरोपी यादवराव डोंगरे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच तीन लाखांचा दंड ही दिला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुनावली. तसेच दंडातील दीड लाखांची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायाधीश यांनी दिले. सरकारी पक्षातर्फे सहायक सहकारी वकील ऍड. मंगला पांडे यांनी काम पाहिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rape