नंद किशोर मंडल पाकुड, 23 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता बॉम्बस्फोटाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंड राज्यातील पाकुड जिल्ह्यात ही घटना घडली. पाकुड जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस स्टेशन हद्दीतील काकरबोना गाव बॉम्बस्फोटाने हादरले. यावेळी इतका जोराचा आवाज झाला की, तो आजूबाजूच्या गावांपर्यंत गेला. पूर्व वैमनस्यातून काकरबोना येथील एका घरावर हल्लेखोरांनी सलग 10 बॉम्ब फेकले. या बॉम्बस्फोटात एकाच कुटुंबातील 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक 7 वर्षांची मुलगी आणि 3 वृद्ध महिलांचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना लगेच उपचारासाठी सोनाजोडी सदर रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता जखमींची तब्येत ठीक आहे. दरम्यान, या स्फोटांनी संपूर्ण परिसरातील लोक घाबरुन गेले होते.
जखमींची नावे - मसबीरा खातून (7), मरजीना बीबी (45), सुकोदा बीबी, मुदस्सर शेख (22), रेनू बीबी (54), राहिजुल शेख (40) जखमींमध्ये यांचा समावेश आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून हा बॉम्बस्फोट झाला आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी काकरबोना आणि लगतच्या जामतल्ला गावातील लोकांमध्ये कशावरून वाद झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंनी हाणामारीही झाली. यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंतही गेले होते. बॉम्बस्फोटाची ही घटना त्याच जुन्या वादातून घडली आहे. ते म्हणाले की, या बॉम्बस्फोटात अंजामुल शेख, कौशर शेख, लकफोड शेख, रेसफुल शेख, अशरफुल शेख, मोदास शेख यांचा सहभाग आहे. हे लोक बॅगेत बॉम्ब घेऊन काकरबोना शाळेच्या गेटजवळ पोहोचले होते. शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिठू शेख यांच्यावर हल्ला करण्याचा या लोकांचा कट होता. मात्र, मिठू शेख शाळेत न सापडल्याने संशयित आरोपींनी त्यांचे घर गाठून बॉम्बस्फोट केला. मिठू शेख यांनी सांगितले की, ही घटना घडली त्यावेळी ते पाकुड येथे होते. या घटनेची माहिती त्यांना फोनवरून मिळाली. बॉम्बस्फोट करणारे लोक शाळेच्या गेटवर उभे होते. ते माझा शोध घेत होते. मात्र, मी न सापडल्याने त्यांनी घरावर हल्ला केला, असे ते म्हणाले. याप्रकरणी एका जणाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकारी सतीश कुमार यांनी सांगितले.