सुधीर जैन, प्रतिनिधी रतलाम, 3 जून : मध्यप्रदेशच्या रतलाममधील एका खासगी बारमध्ये काल रात्री गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या आवडीचे गाणे न वाजवल्याचा राग मनात धरून चोरट्याने बारची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना प्रतापनगर बायपास परिसरात घडली. याठिकाणी सौरभ बारागुंडा नावाच्या व्यक्तीने दमदाटी करून एका कर्मचाऱ्याला चाकू मारला. आपल्या आवडीचे गाणे न वाजल्याने हा बदमाश संतापला आणि त्याने साथीदारांसह बारमध्ये गोंधळ घातला. या घटनेचे संपूर्ण चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तर चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या शैलेंद्र सिंह या कर्मचाऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची फिर्याद मिळताच स्टेशन रोड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सौरव बारागुंडा हा त्याच्या काही साथीदारांसह गुरुवारी संध्याकाळी बारमध्ये पोहोचला होता. तिथे त्याने बारच्या गायकाला त्याच्या आवडीचे गाणे गाण्याची विनंती केली. आपल्या आवडीचे गाणे न गायल्याने संतापलेल्या आरोपी सौरव बारगुंडा याने बार कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.
बार कर्मचाऱ्यांनी त्याला हाकलून दिले. मात्र, काही वेळाने आरोपी सौरव बारगुंडा त्याच्या काही साथीदारांसह परत आला आणि त्याने बारची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी बार कर्मचारी शैलेंद्र सिंह यांच्या छातीवर वार करण्यात आले. जखमी कर्मचारी शैलेंद्र सिंग यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर आरोपीने त्याच्या साथीदारांसह घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी स्टेशन रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी सौरव बारागुंडा याच्याविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.