पुणे, 8 मे : सर्वसामान्य पुणेकरांप्रमाणेच दर्शना त्या दिवशी ऑफिसमधून घराच्या दिशेने निघाली होती. मात्र ती रात्र तिच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली. त्या काही क्षणात असं काय घडलं की, 21 वर्षीय दर्शनाला मृत्यूला सामोरं जावं लागलं. शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर दर्शना, आयटी सेक्टरमधील आयबीएम या कंपनीमध्ये ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून रुजू झाली होती. 30 जुलै 2010 रोजी रात्री 9.15 वाजता, तिच्या प्रियकरानं तिला बावधन खुर्द येथील सुवर्णा पार्क सोसायटीतील तिच्या राहत्या घराजवळ ऑटोरिक्षातून सोडलं. काही मिनिटांनंतर, तिच्या राहत्या घराजवळील मराठा मंदिर हॉलजवळच एका हल्लेखोरानं तिच्यावर मागून वार केले. चाकूनं वार झाल्यानंतर दर्शनानं तिला घरी सोडलेल्या मित्राला फोन केला आणि झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितलं. दर्शनाला जखमी अवस्थेत बघितलेल्या काही रहिवाशांनी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखलं केलं. पुढील उपचारांसाठी तिला कोथरूडमधील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं होतं. मात्र, हल्ल्याच्या दोन तासांनंतर अंतर्गत रक्तस्रावामुळे तिचा तिथे मृत्यू झाला. आपल्या देशामध्ये दररोज विविध प्रकारचे हजारो गुन्हे घडतात. यातील काही गुन्ह्यांची पोलीस तपासात उकल होते तर काही गुन्हे वर्षानुवर्षे रहस्य बनून राहतात. 2010 मध्ये राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात अशीच एक घटना घडली होती. जुलै 2010 मध्ये पुण्यात 21 वर्षांच्या तरुणीचा खून झाला होता. दर्शना टोंगारे असं या तरुणीचं नाव होतं. तिच्या मृत्युला 13 वर्षं उलटूनही अद्याप तिचा खूनी सापडलेला नाही. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यावेळी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्र अस्तित्वात नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरुवातीला हिंजवडी पोलीस ठाण्यानं केला होता. हिंजवडी त्यावेळी पुणे शहर कार्यक्षेत्राचा भाग होता. हिंजवडी पोलिसांना सुरुवातीच्या तपासात कोणतीही प्रगती करता आली नाही. त्यामुळे दर्शनाचा भाऊ केतन टोंगारे याने दाखल केलेल्या रिट याचिकेवर निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयानं 2012 मध्ये या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला. पुणे : मुलगी, कॉल आणि जाळ्यात अडकत DRDO अधिकाऱ्याने पाकिस्तानला दिली सिक्रेट माहिती, असं फुटलं बिंग
सीआयडीनं या प्रकरणाचा ताबा घेतल्यानंतर दर्शनाच्या कुटुंबीयांनी आणखी एक याचिका दाखल केली की, हिंजवडी पोलिसांनी दर्शनाचा मोबाइल फोन आणि कॉम्प्युटर हार्ड डिस्क, तिला घरी सोडणाऱ्या मित्राचा मोबाईल जप्त केला होता. पण, या वस्तूंचा तपास सीआयडीनं केला नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना सीआयडीनं सांगितलं की, हिंजवडी पोलिसांना किमान अर्धा डझन रिमांयडर्स देऊनही त्यांनी जप्त केलेल्या वस्तू आम्हाला दिल्या नाहीत. हिंजवडी पोलीस अनेक महिने सीआयडीला सांगत होते की ते या वस्तूंचा शोध घेत आहेत. अखेरीस, जुलै 2013 च्या सुमारास, हिंजवडी पोलिसांनी या जप्त केलेल्या वस्तू सीआयडीला दिल्या.
तपासात असं समोर आलं की, हत्येच्या वेळी दर्शना तिच्या भावाचा मोबाईल वापरत होती कारण तिला म्युझिक ऐकायचं होतं. तर तिचा फोन तिच्या भावाकडे होता. ती वापरत असलेल्या तिच्या भावाचा हँडसेट सापडला नाही. मारेकऱ्यानं हा फोन घेतला असावा किंवा तो नष्ट केला असावा, असा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. जप्त केलेल्या वस्तूंच्या तपासातून कोणतेही ठोस निष्कर्ष मिळू शकले नाहीत. हिंजवडी पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान 250 जणांचे जबाब नोंदवले, तर सीआयडीनं सुमारे 100 जणांची चौकशी केली. दर्शनाच्या कुटुंबीयांना त्यांच्या काही नातेवाईकांवर संशय आला होता. सीआयडीनं सहा जणांच्या पॉलीग्राफ, लाय डिटेक्टर आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट केल्या. यामध्ये तिचे तीन नातेवाईक, तिला घरी सोडणारा मित्र, तिला सोडणारा रिक्षाचालक, नाशिकचा एक मित्र आणि एक ज्योतिषी यांचा समावेश होता. दर्शनाच्या काही नातेवाईकांनी तिच्या पालकांच्या नकळत तिची कुंडली तयार करण्यासाठी ज्योतिषाचा सल्ला घेतला होता. त्यांच्या टेस्टमधून तपासकर्त्यांना कारवाई करण्यायोग्य कोणतंही लीड मिळालं नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका सीआयडी ऑफिसनं सांगितंल की, ‘शक्य असणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक आणि फिजकल क्लूंचा शोध घेण्यात आला. दरोड्याचा प्रयत्न, एखाद्या प्रकारचा बदला घेणं, वैयक्तीक वैमनस्य, दुसरीच व्यक्ती समजून हल्ला होणं किंवा हल्लेखोर बेघर व मानसिकदृष्ट्या अस्थिर असावा, अशा या सर्व थिअरी वापरून तपास करण्यात आला. पण, त्यात काही यश आलं नाही.’ हिंजवडी पोलीस आणि सीआयडी दोन संस्थांनी अनेक थिअरी वापरून तपास केला, सुमारे 350 जणांची चौकशी केली, सहा व्यक्तींच्या पॉलीग्राफ आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेतल्या आणि हजारो फोन रेकॉर्ड्स तपासले, पण दर्शनाचा खून कोणी केला याचा तपास लागला नाही. पुण्यातील एका महत्त्वाच्या संरक्षण संस्थेतून निवृत्त झालेले दर्शनाचे वडील, देविदास टोंगारे म्हणतात, “मी एवढेच म्हणू शकतो की, सीआयडीच्या तपासकर्त्यांनी या प्रकरणाचा शक्य तो सर्व तपास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सर्व संभाव्य थिअरी वापरूनही या प्रकरणातील गुन्हेगार सापडला नाही. एक दिवस गुन्हेगार नक्की सापडेल अशी आपण आशा करू शकतो.”