मुंबई, 17 जून : मुंबईतील विक्रोळी भागात राहणाऱ्या चेतन आचिर्णेकर या तरुणाला 2016 साली एका रिक्षाचालकामुळे जीव गमवावा लागला होता. चेतन एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये (Software Firm) काम करत असे. पाच वर्षांपूर्वी हा दुर्दैवी प्रकार घडला होता. या प्रकरणात चेतनच्या कुटुंबीयांना 43 लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे. काय घडले होते प्रकरण? चेतन त्याचे काम संपवून रिक्षानं घरी परतला. ऑटो त्याच्या घरी पोहोचली तेव्हा भाडं 172 रुपये झालं होतं. चेतनजवळ सुटे पैसे नसल्याने त्याने ड्रायव्हरला 200 रुपये दिले. त्याला चालकानं सुटे पैसे नसल्याचं सांगितलं आणि उर्वरित 28 रुपये चेतनला परत करण्याऐवजी रिक्षा सुरू केली. चेतनने त्याला थांबण्यास सांगितलं; पण चालकाने मात्र रिक्षाचा वेग वाढवला. यावेळी ऑटोरिक्षा चेतनच्या अंगावरून गेली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चेतनच्या वडिलांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चेतनच्या कुटुंबीयांनी फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विम्याची रक्कम देण्याची मागणी केली, परंतु कंपनीने नकार दिला. हे मनुष्यवधाचं प्रकरण असल्याने कंपनी विम्याची रक्कम देण्यास जबाबदार नाही, असा युक्तिवाद विमा कंपनीने मोटार अॅक्सिडेंटरल क्लेम ट्रिब्युनलसमोर केला. तर, चेतनचा मृत्यू मोटार वाहन अपघातात झालेल्या दुखापतीमुळे झाला, असं ट्रिब्युनलला चेतनच्या मृत्यू प्रमाणपत्र आणि पोस्टमॉर्टेम अहवालात आढळून आलं. काय लागला निकाल? एम. एम. चांदेकर यांच्या अध्यक्षतेखालील ट्रिब्युनलने म्हटलं की, हा अपघात ज्या पद्धतीने झाला, त्यावरून रिक्षाचालकाजवळ हा दुर्दैवी अपघात टाळण्याची एक संधी असल्याचं स्पष्ट होतं. ऑटो चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचा दावाही विमा कंपनीने केला होता, पण कंपनी आपला दावा सिद्ध करू शकली नाही. त्यामुळे ट्रिब्युनलने चेतनच्या कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिला. आता विमा कंपनी आणि ऑटोरिक्षा मालक कमलेश मिश्रा यांना संयुक्तपणे चेतनच्या कुटुंबीयांना 43 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. अपघातावेळी चेतनचा महिन्याचा पगार 15 हजार रुपये होता. ही बाब लक्षात घेऊन ट्रिब्युनलने व्याजासह भरपाईची रक्कम निश्चित केली. वसईतील बिअर बारमध्ये वेटर आणि ग्राहकाची फ्री-स्टाईल हाणामारी; VIDEO आला समोर अपघाताच्या वेळी चेतन 26 वर्षांचा होता. चेतनच्या कुटुंबीयांनी डिसेंबर 2016 मध्ये या संदर्भात दावा सादर केला होता. दाव्यात, चेतनच्या मृत्युमुळे त्यांचे भावनिक आणि आर्थिक नुकसान झाल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं होतं. दुसरीकडे, ऑटो रिक्षाचा मालक ट्रिब्युनलसमोर हजर झाला नाही आणि त्याच्याविरुद्ध एक पक्षीय आदेश पारित करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणावर जवळपास सहा वर्षं सुनावणी पार पडली आणि अखेर ट्रिब्युनलने चेतनच्या कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिला. आता विमा कंपनी आणि ऑटोरिक्षा मालक कमलेश मिश्रा यांना संयुक्तपणे चेतनच्या कुटुंबीयांना 43 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. सामान्य माणूस साधारणपणे कोर्टाची पायरी चढायला जात नाही; पण चेतनच्या वडिलांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानं त्यांना ही नुकसान भरपाई मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.