संदीप मिश्रा, प्रतिनिधी सीतापूर, 26 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना घडत आहेत. यासोबतच लिव्ह-इन नात्यात तयार झालेल्या तणावातूनही आत्महत्या आणि खूनाच्या घटना घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित मुलीच्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. या विवाहित मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या सीतापूरमध्ये बिंद्रा हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. प्रेम प्रकरणात अडथळा ठरलेल्या वडिलांची पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. इतकेच नाही तर वडिलांचा मृतदेह गावाबाहेर पुरला. पोलिसांनी या प्रकरणी मृत बिंद्रा यांच्या मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
वडिलांच्या हत्येचा कट मास्टरमाईंड मुलीने प्रियकर सोबत असताना घरातच आखला होता. सिधौली पोलीस ठाणे हद्दीतील अकोहरा गावातील रहिवासी बिंद्रा हे आंब्याच्या बागेची देखभाल करुन येतो, असे सांगत घरातून गेले. मात्र, ते सकाळी घरी परतले नाहीत. यानंतर त्यांची मुलगी गुडियाने ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस तपास सुरू होता. मात्र, याचदरम्यान, 10 जूनला शेतात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या युवकांना जमिनीतून बाहेर पडलेले हातपाय दिसले. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. यानंतर पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला असता हा मृतदेह बेपत्ता झालेल्या बिंद्रा यांचा असल्याची ओळख पटली. त्यावरून पोलिसांनी खून आणि मृतदेह लपवून ठेवल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. पोलीस तपासात पोलिसांचा संशय हा मृताच्या मुलीवर बळावला. यानंतर तिची कसून चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. या खळबळजनक आंधळ्या हत्येच्या शोधात पोलीस इकडे तिकडे भटकत राहिले आणि लोकांची चौकशी करत राहिले, त्यात पोलिसांना काही मुद्दे दिसले ज्यात त्यांचा संशय मृत बिंद्राच्या मुलीवरच बळावला. मृत बिंद्राची मुलगी गुडिया हिची पोलिसांनी चौकशी केली असता, तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. प्रियकराच्या मदतीने आपल्या वडिलांची हत्या केल्याचे तिने सांगितले. यानंतर पोलिसांनी गुडिया हिचा प्रियकर गोकुळ (लखनऊ) यालाही अटक केली. काय होते कारण - या घटनेची माहिती देताना एएसपी दक्षिण एनपी सिंह यांनी सांगितले की, गुडियाचे सासर महमूदाबाद पोलीस ठाणे हद्दीत आहे. तिचा पती गेल्या 7 वर्षांपासून सौदी अरेबियात कामाला आहेत. यादरम्यान, गुडियाचे तिचा नातेवाईक गोकुळसोबत अनैतिक संबंध सुरू झाले. मात्र, या अनैतिक संबंधावर बिंद्रा यांचा नेहमीच आक्षेप होता. तसेच बिंद्राच्या 4 बिघा जमिनीपैकी 2 बिघे विकून गोकुळ गुडियाला लखनौला यायला सांगत होता. यावर बिंद्रा यांची सहमती नव्हती. बिंद्रा या दोघांच्या प्रेमसंबंधांत त्यांना अडथळा बनत असल्याचे त्या दोघांना वाटले. त्यामुळे गुडिया आणि गोकुळ यांनी बिंद्राच्या हत्येचा कट रचला. ज्या रात्री बिंद्राचा खून झाला त्या रात्री गोकुळही घरातच होता. गोकुळ घरात असल्यावरुन बिंद्रा यांनी आक्षेप घेतला. यामुळे गोकुळने बिंद्रा यांच्या डोक्यावर काठीने वार केले आणि पाठीवर अनेक वार करत त्यांची हत्या केली. यानंतर गुडिया आणि तिचा प्रियकर गोकुळने त्यांचा मृतदेह नव्याने बांधलेल्या एज्युकेशन रोडवर पुरला, अशी कबुली त्यांनी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.