मुंबई, 24 मार्च : आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया, अॅप्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. डेटिंग अॅपच्या माध्यमातून महिला, पुरुषांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार ही घडत आहेत. अशाच प्रकारचं एक प्रकरण नुकतंच उघडकीस आले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सुमारे 300 महिलांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीने महिलांना कोट्यवधी रुपयांना फसवलं आहे. ही व्यक्ती महिलांची फसवणूक करून आलिशान आयुष्य जगत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेवर एखादा सिनेमा तयार व्हावा, अशी या व्यक्तीची इच्छा आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊ या.
रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग इथल्या 42 वर्षांच्या दमित्री फ्रोलोव्ह नावाच्या व्यक्तीला पोलिसांना फसवणुकीच्या आरोपाखाली नुकतीच अटक केली आहे. या व्यक्तीने सुमारे 300 महिलांना कोट्यवधी रुपयांना फसवल्याचं बोललं जात आहे. एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ही व्यक्ती दहा वर्षांपेक्षा जास्त काळ रशियात बनावट नाव आणि कागदपत्रांवर प्रवास करत असल्याचं तपासात समोर आले आहे. दमित्री श्रीमंत महिलांसह गरीब महिलांचीदेखील फसवणूक करत होता. श्रीमंत महिलांची फसवणूक केल्यावर दमित्री पळून जात असे. तसंच तो गरीब महिलांना कर्ज घेण्यास भाग पाडत असे. पैसे मिळाल्यानंतर तो पळून जात असे. स्थानिक माध्यमातल्या वृत्तानुसार, फ्रोलोव्ह डेटिंग अॅप्सवर महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. `एकटेपणाला कंटाळलो आहे. कुटुंब तयार करण्याचा विचार करत आहे. स्वतःचा एक छोटा व्यवसाय आहे,` असं त्याने त्याच्या बायोमध्ये लिहिलं होतं.
पोलिसांना तपासादरम्यान फ्रोलाव्ह अलेक्सान्द्रोव्ह नावाच्या छोट्या शहरात राहत असल्याचं स्पष्ट झालं. यापूर्वीदेखील त्याला फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अटक झाली होती. नाव, पत्ता, कारचा क्रमांक आणि कागदपत्रं तो बदलत असतो. फसवणुकीच्या या घटनेत तो दोषी ठरला तर त्याला सहा वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते. स्थानिक माध्यमानुसार, फ्रोलोव्हला त्याच्या या कहाणीवर एखादा सिनेमा निघावा, असं वाटत आहे.
याबाबत माहिती देताना 50 वर्षांची पीडित महिला अॅलेक्झांड्रा पेस्कोव्हाने सांगितलं, की `फ्रोलोव्ह माझ्याशी दोन वर्षं संवाद साधत होता. त्याने भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मांडली. त्याने मला माझी कार विकण्यास सांगितलं, जेणेकरून माल ट्रान्स्फर करण्यासाठी नवीन मोठं वाहन खरेदी करता येईल. एखाद्या महिलेला त्याच्यावर संशय आला तर तो तिची स्तुती करत असे आणि तिला गिफ्ट देत असे. त्याने मला त्याच्या पैशांनी पर्यटनासाठी पाठवलं. मला वाटलं तो चांगला माणूस आहे; पण प्रत्यक्षात तो माझीच गाडी विकून मिळालेले चार लाख रुपये माझ्यावर खर्च करत होता.`
आणखी एका पीडित महिलेनं सांगितलं, `ज्या महिलांकडे पैसे नाहीत, अशा महिलांना फ्रोलोव्ह त्याच्या जाळ्यात ओढत. तो त्यांना कर्ज घ्यायला भाग पाडायचा आणि पैसे मिळाल्यावर पळून जायचा.`
मेट्रो यूकेच्या वृत्तानुसार, 35 वर्षांच्या अलीनाला फ्रोलोव्हनं फसवलं आहे. त्यानं या महिलेला घर, गाडी सर्व संपत्ती विकायला भाग पाडलं. त्यानंतर पाच लाख रुपये कर्ज म्हणून दिले. त्यानंतर सर्व पैसे घेऊन पळ काढला. अलीनाने सांगितलं, की `त्याचा आत्मविश्वास हेच त्याचं रहस्य आहे. महिलांना नेमकं काय हवंय, त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे, हे त्याला पक्कं ठाऊक आहे. समजा एखादा लहान मुलगा असेल तर त्याच्याशी जवळीक कशी करायची हे तो शोधून काढतो. तो त्याची दुबळी बाजू शोधून त्याला टार्गेट करतो. तो खूप नम्र वाटतो. मी बिझनेसवुमन होऊ शकते, असा विश्वास त्याने माझ्या मनात निर्माण केला. यासाठी मला प्रिमियम क्लास कार घेणं आवश्यक असल्याचं त्यानं पटवून दिलं आणि माझी जुनी कार विकून टाकली. त्यानंतर मी माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार केला पाहिजे, तिच्यासाठी मोठं नवीन घर घेतलं पाहिजे असं त्यानं सांगितलं. यामुळे मी चार लाख रुपये गमावून बसले आणि रस्त्यावर आले.` या सर्व घटनाक्रमावर एखादा सिनेमा निघावा, अशी फ्रोलोव्हची इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.