नवी दिल्ली, 7 मार्च : 1 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय संसदेनं तोंडी 'तिहेरी तलाक' देणं, हा कायद्यानं गुन्हा ठरवला आहे. यानुसार, 'जी व्यक्ती आपल्या पत्नीला तिहेरी तलाक देईल, तिला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल आणि तो दंडासही पात्र ठरेल.' मात्र, तरीदेखील नागरिकांवर याचा काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही. देशभरात अधूनमधून तिहेरी तलाकची प्रकरणं समोर येतात.
राजधानी नवी दिल्लीतील भजनपुरा भागात असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेनं आपल्या पतीवर तिहेरी तलाक दिल्याचा आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, 7 जुलै 2022 रोजी तिच्या पतीनं तिला तीन वेळा 'तलाक-तलाक-तलाक' म्हणत घर सोडण्यास सांगितलं. महिलेच्या तक्रारीवरून भजनपुरा पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आफताब असं नाव असलेला हा आरोपी सध्या फरार झाला आहे. त्यामुळे पोलीस त्याच्या शोधात छापेमारी करत आहेत. 'आज तक'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ईशान्य दिल्ली जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) जॉय टिर्की यांनी सांगितलं की, पीडित महिला भजनपुरा भागातील रहिवासी आहे. महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे की, 32 वर्षांपूर्वी तिचं आफताबशी लग्न झालं होतं आणि आता तिला सहा मुलं आहेत. ज्यामध्ये चार मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. महिलेनं आरोप केला आहे की, तिच्या पतीनं तिला सोडून एका ट्रान्सजेंडरशी लग्न केलं आहे. मात्र, सामाजिक दबावामुळे त्यानं ट्रान्सजेंडरलाही सोडून आणखी एका महिलेशी लग्न केलं आहे. या लग्नापासून तिचा पती तिच्यावर घर सोडण्यासाठी दबाव आणत होता आणि घर न सोडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देत होता.
जॉय टिर्की यांनी सांगितलं की, पीडितेला समुपदेशनासाठी क्राईम अगेन्स्ट वुमन सेलकडे पाठवण्यात आलं आहे. तिच्या तक्रारीच्या आधारे भजनपुरा पोलीस ठाण्यात मुस्लिम महिलांच्या विवाह हक्क संरक्षण कायद्यातील कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
बॉयफ्रेंडसाठी पोटच्या मुलीला संपवले, अकोल्यातील प्रियकर-प्रेयसीचा पर्दाफाश
पीडित महिला काय म्हणाली?
पीडित महिलेनं सांगितलं की, तिचा नवरा तिचा छळ करतो आणि मुलांच्या संगोपनासाठी पैसेही देत नाही. या प्रकरणातील आरोपी पतीचं म्हणणे आहे की, पत्नीनं लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी प्रॉपर्टीसाठी हे सर्व करत आहे. घर आपल्या नावावर करण्यासाठी पत्नी त्याच्यावर दबाव टाकत आहे. तिहेरी तलाकचा आरोप फेटाळून लावताना आफताबनं सांगितलं की, त्यानं आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला नाही आणि कधीही तिला त्रास दिला नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा, जेणेकरून त्याला न्याय मिळेल, असं आरोपीचे म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Delhi News, Divorce, Marriage