नवी दिल्ली, 16 जून : लॉकडाऊनदरम्यान गुन्ह्याचे भयंकर प्रकार समोर आले असताना दिल्लीत असाच हत्येचा थरार समोर आला आहे. काही गुंडांनी भर दिवसा एकाची चाकू भोसकून हत्या केली आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना 11 जूनची आहे. दिल्लीत झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत भूषण असं हत्या झालेल्या 37 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. भर दिवसा भारत यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. भारत हे लग्नसोहळा आणि कार्यक्रमांमध्ये फोटोग्राफी करण्याचं काम करायचे. त्यांच्या परिसरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्कूटीवरून आलेल्या तीन तरुणांनी आवाज देत भारत यांना घराच्या बाहेर बोलावलं. आरोपी आणि भारत यांच्यामध्ये बाचाबाची सुरू होती. ज्याच्यानंतर आरोपींनी चाकूने सपासप वार करून त्यांचा जागीच ठार केलं. मिळालेल्या माहितीनुसार, हा हत्येचा थरार होत असताना ऊारत यांची 10 वर्षांची मुलगी छतावरून सर्व पाहत होती. आपल्या वडिलांवर हल्ला झाल्याचं पाहताच ती मोठ्याने ओरडली.
गोंधळ झाल्याचं ऐकताच शेजारी धावत आले तोच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भारत भूषण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. पैशांवरून हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तर सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, भारत यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी, मुगला आणि वृद्ध वडील यांचा मोठा आधार निसटला आहे. संपादन - रेणुका धायबर