मुंबई, 23 जून : गेल्या काही वर्षांत प्रेम संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप, विवाहबाह्य संबंध आदी कारणांवरून गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा गुन्ह्यांमागे बऱ्याचदा कारणं क्षुल्लक असतात. पण त्यात कोणाचा तरी बळी जातो. हरियाणातील गुरुग्राममध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली. या घटनेत जखमी अवस्थेतील युवकाचा रुग्णालयात दाखल करताच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एसएसबीमध्ये शिपाई असलेल्या एका तरुणीला अटक केली असून, तिची चौकशी सुरू आहे. हरियाणा येथील गुरुग्राममधील डीएलएफ फेज 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 35 वर्षांच्या युवकाला छातीत चाकू घुसल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या युवकाला त्याची लिव्ह इन पार्टनर तरुणी रुग्णालयात घेऊन आली होती. पोलिसांनी या तरुणीला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. छातीत चाकू लागल्याने संदीप गंभीर जखमी झाला, त्यानंतर उपचारांसाठी त्याला नारायणा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले. पण तिथंच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची खबर मिळताच डीएलएफ फेज 3 पोलीस स्टेशनचे कर्मचारी रुग्णालयात पोहोचले. या प्रकरणी डीएलएफचे एसीपी विकास कौशिक यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ``आम्ही संदीपची लिव्ह इन पार्टनर पूजा शर्माला ताब्यात घेतलं आहे. तिची सखोल चौकशी सुरू आहे. टरबूज कापत असताना चाकू लागल्याचे पूजा सांगत आहे. त्याचा छातीला खोल जखम झालेली आहे. आम्हाला पूजावर संशय आहे.`` दरम्यान, संदीप 25 वर्षाच्या पूजा नावाच्या तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या प्रकरणात पूजाला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान पूजाने पोलिसांना सांगितलं की, ``मी झडोडा कला दिल्लीची रहिवासी आहे. एसएसबीमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहे. गेल्या चार वर्षांपासून मी आणि संदीप डीएलएफ फेज 3 च्या एस ब्लॉक55/56 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहोत. संदीप गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. त्या दिवशी टरबूज कापत असताना संदीपच्या छातीला चाकू लागला. त्यामुळे त्याच्या छातीला गंभीर जखम झाली. मी त्याला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन आले. पण तिथे त्याचा मृत्यू झाला,`` असं पूजाने सांगितलं. ``आम्हाला गुरुवारी रात्री अडीच वाजता संदीपच्या मृत्यूची बातमी कळाली. त्यामुळे रात्रीच आम्ही सर्व लोक येथे दाखल झालो,`` असं संदीपच्या कुटुंबियांनी सांगितलं. या प्रकरणात पोलीस पूजाची कसून चौकशी करत आहेत. संदीपच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांना पूजावर संशय आहे. चौकशी पूर्ण होताच या प्रकरणातील सत्य समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.