मुंबई, 17 मार्च : लालबागमध्ये आईची हत्या करणाऱ्या रिंपलने पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक अशी माहिती दिली आहे. जवळपास तीन महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला असून २३ वर्षीय रिंपलला पोलिसांनी अटक केलीय. वीना जैन आणि त्यांची मुलगी रिंपल जिथे राहत होते तिथे शेजाऱ्यांना दुर्गंधी वास येत होता. त्यामागचे कारण समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
इब्राहिम कासीम चाळीत राहणाऱ्या रिंपल जैनने तिच्या आईची हत्या केल्यानतंर मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे रिंपलने घरात अनेक ठिकाणी ठेवले होते. शेजाऱ्यांसह नातेवाईक जेव्हा याबाबत तिला विचारणा करत असत तेव्हा रिंपल दिशाभूल करणारी उत्तरे द्यायची.
रिंपलच्या घरी नातेवाईक गेले तेव्हा त्यांना घरात तीव्र दुर्गंधी पसरल्याचं जाणवलं. यानंतर वीना जैन यांच्या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी रिंपलच्या घरातून मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले. तर काही तुकडे घराजवळ असणाऱ्या नाल्यातही आढळले आहेत. तिने बाथरूममधून मृतदेहाचे तुकडे बाहेर टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
आईचा कुजलेला मृतदेह, दुर्गंधी लपवण्यासाठी 200 परफ्युमच्या बाटल्या; लालबाग प्रकरणात नेमकं काय घडलं?
आईची हत्या केल्यानतंर दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे तुकडे रिंपलने बाथरूममधून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरात काही ठिकाणी डागही पडले. तसंच बाथरूम ब्लॉक झालं होतं. ते स्वच्छ करण्यासाठी रिंपलने प्रियकराला सक्शन कप आणण्यास सांगितलं होतं. रिंपलचा प्रियकर लालबाग परिसरातल एका हॉटेलमध्ये काम करतो.
घरी खोके आणि हातमोजेही सापडले आहेत. आता या प्रकरणामध्ये आणखी काही जण असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांकडून परिसरात काही जणांची चौकशीही केली जात आहे. तसंच दोन संशयितांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालला पथके रवाना झाली आहेत.
हत्या केल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी रिंपलचा प्रियकर तिच्या घरी गेला होता. तेव्हा त्याला दुर्गंधी वास आला. त्यावेळी रिंपलने बाथरूम तुंबल्यानं वास येतोय, तू सक्शन कप आणि दोन बाटल्या परफ्यूम, रूम फ्रेशनर आण असं त्याला सांगितलं. प्रियकराने तिला मदत केली. त्यानंतर रिंपलने परफ्यूम आणि रूम फ्रेशनर्सचा वापर दुर्गंधी लपवण्यासाठी सुरू केला. तिने मृतदेहाचे लहान तुकडे बाथरूममधून फ्लश करायला सुरुवात केल्याचा संशय पोलिसांना आहे. गेल्या तीन महिन्यात रिंपलने अंघोळही केली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai