बेंगळुरू, 19 डिसेंबर : शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम करतात. मात्र, याच शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारी एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील एका सरकारी शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली फेकले. यामुळे 10 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक मुथप्पा याला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या उत्तरेकडील हगली गावातील आदर्श प्राथमिक शाळेत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने चौथीच्या वर्गातील विद्यार्थी भरतला फावडे मारल्यानंतर त्याला बाल्कनीतून फेकून दिले. गडक जिल्ह्यातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवप्रकाश देवराजू म्हणाले, “या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, प्रथमदर्शनी हे त्यांच्या कौटुंबिक वादाशी संबंधित असू शकते.” अहवालानुसार, शिक्षक मुथप्पाने भरतची आई गीता भारकर याना मारहाण केली होती. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ज्या शाळेत घडली त्याच शाळेत गीता भारकरही शिकवतात. दुसरीकडे आरोपी शिक्षकाची या शाळेत कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. वाचा - आईनंतर सांभाळणाऱ्या मावशीचीच हत्या; गुगल मॅपच्या सहाय्याने मृतदेहाची विल्हेवाट दिल्लीतही अशीच घटना गेल्या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील एका सरकारी शाळेत अशीच घटना घडली होती. चित्रकला वर्ग सुरू असताना एका शिक्षिकेने रागाच्या भरात पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीवर कात्रीने हल्ला करून तिला शाळेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या वर्गाच्या बाल्कनीतून खाली फेकून दिले. पोलिसांनी सांगितले की, शिक्षिकेने विद्यार्थ्यांसह स्वत:ला वर्गात कोंडून घेतले होते. तिने विद्यार्थ्यांवर ‘हिंसकपणे’ पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्यानंतर विद्यार्थिनीला पकडून तिचे केस कापले आणि नंतर बाल्कनीतून फेकून दिले. अन्य एका शिक्षकाने आरोपी शिक्षिका गीता देशवाल यांना विद्यार्थ्याला फेकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला यश आले नाही.
जखमी विद्यार्थ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने सांगितले की, मुलीच्या जबड्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे, त्यामुळे ती काहीही खाऊ किंवा पिऊ शकत नाही. याशिवाय विद्यार्थिनीच्या डोक्याला आणि पायालाही जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली असून तिच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.