विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 7 जून : मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व समता नगर पोलीस ठाण्यातून बेपत्ता झालेल्या दिनेश प्रजापती (38) याच्या हत्येचे गूढ समता नगर पोलिसांनी उकलले आहे. पत्नीशी संबंध असल्याच्या कारणातून मित्राने त्याची हत्या केली होती. कांदिवलीत मित्रानेच केला मित्राचा खून 1 जून रोजी काजू पाडा परिसरातून 38 वर्षीय दिनेश प्रजापती पोईसर बेपत्ता झाला होता. समता नगर पोलीस दिनेश प्रजापतीचा शोध घेत होते. दरम्यान, दिनेश प्रजापतीचा खून त्याचा मित्र सुरेश कुमावत (वय 26) याने केल्याची माहिती समता नगर पोलिसांना मिळाली. मीरा रोड घोडबंदर हायवेपासून जंगलात 4 फूट जमिनीत मृतदेह पुरला होता. पोलिसांनी सुरेश कुमावत याला बोरिवली येथून अटक केली आहे. मीरारोड घोडबंदरच्या जंगलातून चार फूट खोदून दिनेश प्रजापतीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त म्हणाले की, सुरेश कुमावत हा मृत दिनेश प्रजापतीचा मित्र असून दिनेशची पत्नी आणि सुरेश कुमावत यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यामुळे कुमावतने दिनेश प्रजापतीची हातोड्याने वार करून हत्या केली आणि दिनेश प्रजापतीचा मृतदेह घोडबंदरच्या जंगलात पुरला. वाचा - मुंबई बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर; तरुणीची रुममेट.. वसतिगृहात 19 वर्षीय तरुणीची हत्या मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती मिळाली होती की सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये एक मुलगी मृतावस्थेत आढळली असून तिच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लॉक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची समोर आले आहे. वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. संशयित सुरक्षारक्षक बेपत्ता झाला होता. या सुरक्षा रक्षकाने तरुणीच्या हत्येनंतर रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. मुलीच्या प्रायव्हेट पार्ट आणि मानेवर जखमा प्राथमिक तपासात मुलीच्या मानेवर व गुप्तांगावर जखमेच्या खुणा आढळल्याने या मुलीवर बलात्कार करून खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ओमप्रकाश कनोजियाविरुद्ध भादंवि कलम 302 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृत आरोपी विवाहित असून त्याला 12 वर्षांची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.