
झारखंड, 20 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी एका आरोपीने एकच कार ओएलएक्सवर अनेक वेळा विकल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणात आरोपीविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान झारखंडमधून अशीच विचित्र घटना समोर आली आहे. झारखंडमधील जामताडा जिल्ह्यात पोलिसांनी अशा चोराला पकडलं आहे, जो लोकांकडून त्यांची बाईक मागून चोरी करीत होता. पोलिसांनी या प्रकरणात चोराकडून अनेक मोटार सायकल जप्त केल्या आहेत. याशिवाय गॅरेजच्या मालकालाही ताब्यात घेतलं आहे. हा गॅरेज मालक चोरी केलेल्या बाईक लपवत होता.

जामताडा पोलिसांनी एक अशा चोराला पकडलं आहे, जो चोरी करण्यासाठी नाही रात्र पाहायचा नाही दिवस..चोरी करताना त्याला कुणाची भीतीही नव्हती. कारण बाईक मालक स्वत:ला त्याला गाडीची चावी देत होता आणि हा चोर बाईक गायब करीत होता. जोपर्यंत लोक या चोराचा हेतू समजू शकत होते, तोपर्यंत हा बाईक घेऊन फरार झालेला असायचा.

याबाबत माहिती देताना आयपीएस शुभांशू जैन यांनी सांगितलं की, जिल्ह्यात अनेक बाईक चोरल्याच्या घटना समोर येत होत्या, ज्यामध्ये हा चोर अनोख्या पद्धतीने चोरी करीत होता. हा चोर कोणत्याही मोठ्या दुकानात जात असे व तेथे सामान खरेदी करण्यासाठी मोठी यादी दुकानदाराकडे देत असे.

जेव्हा पैसे देण्याची वेळ यायची तेव्हा आपली पर्स घरी विसरल्याचं कारण सांगायचा. त्यानंतर तो दुकानदाराला आपल्या गप्पांमध्ये अडकवायचा. आणि घरातून पैसे आणण्यासाठी त्याच व्यक्तीकडून बाईक मागून घ्यायचा. विक्री होईल या हेतून दुकानदारदेखील आपल्या बाईकची चावी चोराकडेच सुपूर्द करीत असत. ज्यानंतर चोर ही बाईक अब्दुल वकीलच्या गॅरेजवर पोहोचवीत असत.

पोलिसांनी सांगितलं की, चोराला कोणी ओळखू नये यासाठी तो आपला चेहरा मास्कने लपवित असे. पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेल्या बाईक जप्त केल्या आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने चोरी केल्याचे कबुल केले आहे.




