दिनेश पटेल, प्रतिनिधी भदोही, 2 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहे. बलात्कार, आत्महत्या अनैतिक संबंधातून खून यांसारख्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला अश्लील व्हिडिओ मेसेज पाठवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीला त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने पत्नीच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अकाऊंटही बनवले होते, असे सांगितले जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, जनसुनावणीदरम्यान एका तरुणीने तक्रार केली होती की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट आयडी तयार करून तिला अश्लील व्हिडिओ पाठवले जात आहेत आणि पैशांची मागणी केली जात आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, तक्रारदार तरुणीचा पती तिला त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार करत असल्याचे समोर आले. वर्षभरापूर्वी दोन्ही तरुण-तरुणींचे लग्न झाले होते. मात्र, 6 महिन्यांनी त्यांच्यात वाद होऊन दोघेही वेगळे राहू लागले. आपल्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय तरुणाला होता. पत्नीच्या तक्रारीनंतर तरुणाने पत्नीला फसवण्यासाठी त्याच्या मोबाइल क्रमांकावरून दुसऱ्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करून त्याच्याच नंबरवर धमकीचा मेसेज पाठवला. तसेच चार लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पत्नीला जाळ्यात अडकवण्याच्या उद्देशाने आलेला हा मेसेज तरुणाने पोलिसांना दाखवला. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली असता या तरुणाने पत्नीला जाळ्यात अडकवण्यासाठी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करून हे मेसेज पाठवले असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

)







