मुंबई, 8 डिसेंबर : सोशल मीडियाचे (Social Media) जितके फायदे आहेत तितकेच त्याचे तोटेदेखील आहेत. अनेकदा सोशल मीडियामुळे नुकसानही होतं. हल्ली सोशल मीडियावर फेक अकाउंट (Fake Facebook Account काढून बदनाम करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. महिलांबाबत तर हे बदनामीचे प्रकार अधिकच घडत आहेत. अशाच प्रकारची एक घटना हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यात समोर आली आहे. एका तरुणीच्या तक्रारीवरून ऊना पोलिसांनी एक गुन्हा (Una Police) दाखल केला आहे.
बंगाणा इथल्या एका कॉलेज तरूणीनं ही तक्रार केली आहे. एका तरुणानं बनावट फेसबुक आयडी तयार करून तिला त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच लग्न करायला नकार दिल्याने या तरुणाने सतत त्रास देऊन आपलं बनावट फेसबुक अकाउंट बनवल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. पोलिसांनी या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरुन तरुणावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आता याबद्दल चौकशी आणि तपास सुरु झाला आहे.
बंगाणाच्या एका गावात या तरुणाबरोबर तक्रारदार तरुणीची फेसबुकवरुन मैत्री झाली होती. हा तरुण अंमली पदार्थ (ड्रग्ज) घेत असल्याचं कळल्यावर तरुणीने त्याच्याबरोबरची मैत्री तोडली होती. त्याच्याशी बोलणंही बंद केलं. पण या तरुणाने ऐकलं नाही. त्याने या तरुणीच्या फेसबुक अकाउंटचा गैरवापर सुरु केला. इतकंच नाही तर तिच्या नावाने फेक फेसबुक आयडी बनवून तिचे फोटोही अपलोड केले असं या तक्रारदार तरुणीचं म्हणणं आहे.
हेही वाचा : कोर्टाच्या इमारतीतून महिलेला फेकलं, गंभीर जखमी; 12 जणांवर गुन्हा
अनेकदा सांगूनही हा तरूण ऐकायला तयार नव्हता. त्याने अशाचप्रकारे त्रास देणं सुरुच ठेवलं. जोपर्यंत माझ्याशी लग्न करत नाहीस तोपर्यंत मी फेक आयडी तयार करुन त्रास देतच राहणार, अशी धमकी या तरुणाने दिल्याचं तक्रारदार तरुणीचं म्हणणं आहे. या त्रासाला कंटाळून तरुणीने ऊना पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. सध्या तरी या तरुणावर विविध कलमं लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पुढची कारवाई सुरु आहे.
हेही वाचा : औरंगाबाद पुन्हा हादरलं! डॉक्टरच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला, सुरा पोटात खुपसला
फेसबुक हे सध्याचं सगळ्यात लोकप्रिय सोशल मीडिया माध्यम आहे. पण काहीजण आपली मूळ ओळख लपवून यावर फेक अकाउंट तयार करतात आणि त्याचा गैरवापरही करतात. अनेकदा या फेक अकाउंटवरून महिलांना, तरुणींना त्रास दिला जातो. त्यामुले फेसबुकवर येणाऱ्या फ्रेंड्स रिक्वेस्ट स्वीकारताना पूर्ण काळजी घेण्याचं आवाहन वारंवार सायबर पोलिसांच्या वतीने केलं जातं. फार ओळखीच्या नसलेल्या, माहिती नसलेल्यांच्या रिक्वेस्ट स्वीकारताना विचार करा. जेव्हा कोणी तुम्हाला फेक फेसबुक अकाउंट तयार करुन त्रास देत आहे किंवा तुमचा फेक अकाउंट बनवण्यात आलं आहे, असं लक्षात येईल तेव्हा ताबडतोब पोलिसांना कळवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.