मुंबई, 6 डिसेंबर : एखाद्या घरामध्ये लग्नसोहळा असला तर उत्साहाचं वातावरण असतं. त्यातही नवऱ्या मुलीच्या घरी लग्नाच्या तयारीची धावपळ सुरू असते. नवऱ्या मुलीचे आई-वडिल लग्नामध्ये एखादी गोष्ट कमी पडू नये, यासाठी प्रयत्नशील असतात. पण घरामध्ये लग्नाची तयारी सुरू असताना नवऱ्या मुलीची आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली तर? तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा धक्कादायक प्रकार उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. मंगलोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक महिला तिच्या मुलीच्या लग्नाला अवघे 10 दिवस शिल्लक असतानाच प्रियकरासह पळून गेली. या महिलेनं तिच्या मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले दागिनेही पळून जाताना सोबत नेलेत. या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मंगलोर येथील 38 वर्षांची रमा (नाव बदललं आहे) ही महिला तिच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीदरम्यान प्रियकर राहुल (नाव बदललं आहे) सोबत पळून गेली. पळून जाताना तिनं मुलीच्या लग्नासाठी घरात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिनेही सोबत नेले. रमा आणि राहुल हे दोघे एका कंपनीत एकत्र काम करत होते, अशी माहितीही समोर आली आहे.
काय आहे प्रकरण? या संपूर्ण प्रकरणाबाबत मंगलोर पोलीस स्टेशनचे अधिकारी राजीव रौथन यांनी सांगितलं की, ‘संबंधित तरुण आणि महिला शनिवारी (3 डिसेंबर 2022) रात्री पळून गेले आहेत. या महिलेच्या मुलीचं लग्न 14 डिसेंबर 2022 ला आहे. मुलीच्या लग्नासाठी केलेले दागिनेदेखील या महिलेनं पळून जाताना सोबत नेले आहेत.’ ही महिला आणि तरुण दोघेही कारखान्यात एकत्र काम करत असल्यानं दोघांचंही एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. दोघांचा शोध सुरू करण्यात आला असून, लवकरच दोघांनाही पकडण्यात येईल, असंही रौथन म्हणाले. लग्नाच्या सहा महिन्यातच तरुणी बॉयफ्रेंडसोबत फरार; म्हणाली, पुस्तक देऊन येते अन्… घरामध्ये सुरू होती तयारी दरम्यान, संबंधित महिलेच्या पतीचं वर्षभरापूर्वी निधन झालं आहे. या महिलेला 1 मुलगा 2 मुली आहेत. 14 डिसेंबरला तिच्या मोठ्या मुलीचं लग्न होणार आहे. त्यामुळे घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती. पाहुण्यांचे आगमनही सुरू झाले होते. बहुतेक नातेवाईकांना लग्नाची निमंत्रणंही पाठवण्यात आली होती. मात्र, शनिवारी (3 डिसेंबर) रात्री कुटुंबाला सोडून ही महिला अचानक गायब झाली. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी महिलेच्या प्रियकराची माहिती घेतली, तेव्हा तोही घरातून फरार असल्याचं समोर आलं. तसंच पोलिसांनी महिलेच्या घराची झडती घेतली असता, मुलीच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेले लाखो रुपयांचे दागिनेही गायब असल्याचं आढळून आलं. दुसरीकडे, मुलीच्या लग्नापूर्वीच तिची आई प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकाराची चर्चा संपूर्ण हरिद्वार जिल्ह्यात आहे.