बंगळूरू, 30 मे : कर्नाटकाच्या बंगळुरूमध्ये ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या सायबर स्कॅमर्स व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून लोकांना टार्गेट करत आहेत. परंतु सायबर स्कॅमर्सचे जाळे आता केवळ मेसेजिंग अॅप्सपुरते मर्यादित राहिलेले नाही. अलीकडेच बेंगळुरूमधील एका महिलेने टिंडर या ऑनलाइन डेटिंग अॅपवर बनावट खात्याद्वारे 4.5 लाख रुपयांची फसवणूक झाली, असा आरोप केला करत तक्रार दाखल केली आहे. मात्र, पैशाच्या आमिषाने महिलेची फसवणूक करण्यासाठी घोटाळेबाजाने अवलंबलेली युक्ती धक्कादायक आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, बेंगळुरूमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 37 वर्षीय महिलेने तिच्या टिंडर मॅचवर 4.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर महिलेने पैसे परत मिळतील या आशेने पोलिसांकडे धाव घेतली.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, महिलेची भेट Tinder या डेटिंग अॅप्लिकेशनवर अद्विक चोप्रा नावाच्या व्यक्तीला झाली होती. त्याने तिला सांगितले की तो लंडन, यूके येथे डॉक्टर म्हणून काम करतो. त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर महिन्याभरातच ती टिंडरवर भेटलेल्या या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. अखेर चोप्राने महिलेला सांगितले की तो तिला भेटण्यासाठी बेंगळुरूला येत आहे. मात्र, 17 मे रोजी महिलेला अज्ञात क्रमांकावरून फोन आला. कॉलरने दावा केला की तो भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा अधिकारी आहे आणि चोप्रा यांना बेहिशेबी रोख रकमेसह पकडण्यात आले आहे. चोप्रा यांना बंगळुरूला पाठवण्यासाठी त्या व्यक्तीने महिलेला 68,500 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याला फी म्हणून 1.8 लाख रुपये आणि प्रोसेसिंग चार्ज म्हणून अतिरिक्त 2.06 लाख रुपये महिलेकडून ट्रान्सफर करवून घेतले. महिलेला असे वाटत होते की, टिंडरवर भेटलेला हा तिचा प्रियकर तिला भेटायला बंगळुरूला यावा, त्यामुळे तिने कॉल करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पैसे ट्रान्सफर केले. मात्र, समोरच्या व्यक्तीने आणखी 6 लाख रुपयांची मागणी केल्यावर महिलेला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले आणि तिने फोनवर चौकशी सुरू केली. महिलेने प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच अचानक त्याने कॉल डिस्कनेक्ट केला. यानंतर प्रियकराने ना फोन केला ना फोन घेतला. प्रियकराने त्याचे टिंडर प्रोफाईल देखील हटवले. त्यामुळे त्याने पैशांची फसवणूक करण्याचा चांगलाच कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. विमानतळ प्राधिकरणाचा तथाकथित अधिकारी देखील एक घोटाळा करणारा होता जो या सर्व प्रकारात तिच्या टिंडर प्रियकराला पाठिंबा देत होता. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एक पथक तयार केले आहे.