भरुच, 11 नोव्हेंबर: 'मेलेल्या लोकांच्या टाळूवरील लोणी खाणं' ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल काही लोक माणसं मेली तरी त्यांचा फायदा घेणं बंद करत नाहीत. अशीच एक घटना घडली आहे गुजरातच्या भरुचमध्ये. मृतदेहाचे केस चोरी करुन ते केस विकणाऱ्या एका टोळीचा पोलीस आणि गावकऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेमुळे भरुचमध्ये खळबळ माजली आहे.
गुजरातमध्ये मेलेल्या महिलांचे केस काढून ते विकण्याचा गोरख धंदा ही टोळी करत होती. भरुच आणि आसपासच्या दफनभूमींकडे पाच जणांची टोळी लक्ष ठेऊन असायची. ज्या ठिकाणी महिलांना पुरलं जातं, त्या जागेवर जाऊन ही लोकं संपूर्ण कबर उकरुन काढायचे. महिलांचे मृतदेह पुरण्यात आल्यानंतर त्यांचे केस त्वचेपासून वेगळे व्हायला आठवडा किंवा 15 दिवस लागायचे. तेवढे दिवस ही टोळी फक्त लक्ष ठेवण्याचं काम करायची. आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी जाऊन मेलेल्या महिलांचे केस काढले जायचे.
बऱ्याच दिवसांपासून त्यांचा गोरख धंदा सुरू होता. त्यानंतर परिसरात राहणाऱ्या लोकांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या टोळीला अटक केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या 5 जणांपैकी 3 आरोपी अल्पवयीन आहेत. महिलांचे केस विकल्यानंतर त्यातून चांगला पैसा मिळतो. त्यामुळे आम्ही हे कृत्य करत होतो अशी कबुली या आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे. हे केस आरोपी कोणाकडे विकायचे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. महिलांच्या लांब काळ्याभोर केसांना प्रचंड मागणी आहे. महिलांच्या उत्तम दर्जाच्या केसांना 6 ते 7 हजार रुपये किलोग्रॅमपर्यंत भाव मिळतो. या केसांचा वापर विग बनवण्यासाठी केला जातो.