टोहाना, 29 मार्च : कालव्यामध्ये युवक-युवतीचा मृतदेह मिळाल्यामुळे टोहाना परिसरात खळबळ माजली आहे. पंजाबच्या भाखडा कालव्यातून येणाऱ्या फतेहाबाद कालव्यात प्रियकर-प्रेयसीचे हात बांधलेले मृतदेह सापडले आहेत. पंजाब पोलिसांना 112 क्रमांकावर कालव्यात मृतदेह असल्याचा फोन आला, त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोघांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. कालवा साफ करण्यासाठी रात्री पाणी बंद करण्यात आलं. पाणी सुकल्यामुळे मृतदेह फार लांब वाहून जाऊ शकले नाहीत. जवळपास असलेल्या नागरिकांनी युवक आणि युवतीचे मृतदेह हात बांधलेले पाहिले. मृतदेहामधल्या मुलाचं नाव अजय तर मुलीचं नाव गुरूमन आहे. मुलाचं वय 19 वर्ष असून मुलीचं वय 16 असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोघं गायब होते. तेव्हापासून दोघांच्या घरचे त्यांचा शोध घेत होते. मृत्यू झालेली मुलगी गुरूमनच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे, तर तिची आई आधीच तिला सोडून गेली आहे. गुरूमनला एक लहान बहीण असून या दोघांचा सांभाळ तिचे आजोबा करत आहेत. एकमेकांवर प्रेम असल्यामुळे दोघांनी जीवन संपवल्याचं सांगण्यात येत आहे. 112 क्रमांकावर आम्हाला फोन आला आणि फतेहाबाद कालव्यामध्ये युवक-युवतीचा मृतदेह असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर आमची टीम घटनास्थळी पोहोचली, अशी माहिती पोलीस स्टेशन शहर प्रभारी कुलदीप सिंग यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







