नवी दिल्ली 03 नोव्हेंबर: स्वत:ला स्टंट बॉय म्हणत YouTube स्टंट करणारा प्रसिद्ध युट्यूबर धोकेबाज निघाला. त्याने प्रेयसीच्या भावाची हत्या केल्याचं उघड झालं असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. निझामुल खान असं या स्टंटबाज युवकाचं नाव आहे. बाईकचे स्टंट करण्यासाठी तो प्रसिद्ध होता. प्रेमाला विरोध करत असल्याने त्याने प्रेयसीच्याच भावाचा काटा काढल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
निझामुलचं एका तरुणीवर प्रेम होतं. मात्र तिचा भाऊ कमल शर्मा याचा या प्रेमसंबंधांना विरोध होता. माझ्या बहिणीसोबतचे संबंध तोडून टाक असं कमलने निझामुलला अनेकदा सांगितलं होतं. मात्र तो ऐकत नसल्याने एकदा कलने त्याला धक्काबुक्कीही केली होती.
त्याचा निझामुलला राग होता. याच रागातून त्याने कमलचा काटा काढायचं ठरवलं. कमल हा कामावरून घरी परतत असताना त्याची 28 ऑक्टोबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांनी तपास करून निझामुलला बेड्या ठोकल्या आहेत. युट्यूबवर त्याचे 9 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याच्या तीन मित्रांनाही पोलिसांनी अटक केली असून हत्येसाठी वापरलेलं पिस्तुलही जप्त केलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अनेक तथाकथीत स्टार्स अनेक गुन्ह्यांमध्ये अडकले असल्याचं पुढे आलं आहे. सोशल मीडियावर त्याचे फॉलोअर्स असल्याने त्यांना वेगळच महत्त्व प्राप्त झालंय. त्यातच टिकटॉक सारख्या अनेक Appsवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने या स्टार्सवर संक्रांत आली होती.
जाहीरातींसाठी त्यांचा उपयोग करून घेतला जात असल्याने त्याची कमाईसुद्ध होत होती. मात्र अचानक मिळालेल्या प्रसिद्धीमुळे या स्टार्सच्या डोक्यात हवा गेल्याचंही अनेकदा पुढे आलं होतं.