मनोज राठी, प्रतिनिधी खरड, 2 जुलै : मोहालीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एनडीए प्रवेश परीक्षेचे कोचिंग घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याने मोहालीतील खरार रोडवर असलेल्या एका खासगी नामांकित अकादमीच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याठिकाणी वसतिगृहात झाडूपासून ब्रेड बनवले जातात आणि येथील अन्नात किडे आढळतात, असा आरोप या विद्यार्थ्याने केला आहे. गुजरातमधील या अल्पवयीन विद्यार्थ्याने या घटनेचा व्हिडिओही बनवला आहे. या अकादमीमध्ये एनडीएची तयारी सुरू आहे. आरोप करणारा विद्यार्थी गुजरातचा रहिवासी असून त्याने 3 जून रोजीच अकादमीत प्रवेश घेतला होता. पण अकादमीच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास धक्के देऊन त्याला बळजबरीने याठिकाणाहून काढण्यात आले, असा गंभीर आरोप या विद्यार्थ्याने केला आहे.
वसतिगृहात अस्वच्छ भोजन दिले जात असल्याची तक्रार या विद्यार्थ्याने केली. तसेच त्याने याठिकाणी बनवला जात असलेल्या स्वयंपाकाचाही व्हिडिओ बनवला होता. मात्र, त्याच्यावर गैरवर्तनाचा आरोप करत अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अकादमीतून बाहेर काढले आणि चंदीगड सेक्टर-43 येथील बसस्थानकात सोडले, असे त्याने सांगितले.
मुलाच्या आईला या प्रकरणाची माहिती मिळताच तिने गुजरातहून विमानाने मोहाली गाठली. मुलाची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. बलौंगी पोलीस ठाणे प्रभारी जीएस ग्रेवाल यांनी सांगितले की, गुजरातमधील रहिवासी असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करत अकादमीच्या महिला कर्मचाऱ्यासह एकूण 5 जणांविरुद्ध जेजे अॅक्ट आणि फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्याने केलेल्या आरोपांवर अकादमीच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. तर येथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, विद्यार्थी मोबाइल वापरत होता. यामुळे मॅडमने त्याला थांबवले होते. विद्यार्थ्याने महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले आणि नंतर स्वतः गेटबाहेर पळून गेल्याचेही त्याने सांगितले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये स्वयंपाकासाठी झाडूचा वापर होत असल्याचे दिसत आहे. मुलाने अन्नाचा एक फोटो दाखवला आहे, ज्यात कीटक दिसत आहे. ही अकादमी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची आहे, असे सांगितले जात आहे.