मुंबई : अलीकडच्या काळात गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. प्रेमसंबंध, विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक वाद, प्रॉपर्टी, पैसे आदी कारणं गुन्ह्यांमागे असल्याचं दिसत आहे. ईशान्य दिल्लीत नुकतंच एक हत्येचं प्रकरण उघडकीस आले आहे. प्रॉपर्टीसाठी सासू आणि सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप सुनेवर केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनेला अटक केली आहे. ईशान्य दिल्लीतील गोकलपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका वृद्ध दांपत्याची हत्या झाली आहे. या दोघांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचे दिसून आलं आहे. घरात 100 यार्डांच्या तळमजल्यावर या दोघांचे मृतदेह आढळून आले. घराच्या पहिल्या मजल्यावर या दांपत्याचा मुलगा, त्याची पत्नी आणि सहा वर्षांचा लहान मुलगा राहत होते. यादरम्यान घरातील साडेचार लाख रुपये आणि दागिने गायब झाले आहेत.
सर्व बाबी लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेनंतर 12 तासांत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. या हत्येच्या आरोपाखाली मृत दांपत्याच्या सुनेला अटक करण्यात आली आहे. सुपारी देऊन सासू आणि सासऱ्याची हत्या केली, असा आरोप तिच्यावर आहे. दरम्यान, घर विकल्याने सून नाराज होती. तिला सर्व प्रॉपर्टीवर अधिकार हवा होता. घराचा निम्मा हिस्सा हातातून जात असल्याचे दिसताच तिनं हे पाऊल उचललं असावं, असं बोललं जात आहे. डीसीपी जॉय टर्की यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, ``राधेश्याम वर्मा (वय 72) आणि त्यांची पत्नी वीणा (वय 68) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. या दोघांच्या हत्येचा आरोप त्यांचा मुलगा रवीरतनची पत्नी मोनिका (वय 30) हिच्यावर आहे. पोलीस आरोपी मोनिकाची चौकशी करत असून हत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.`` पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ``राधेश्याम त्यांची पत्नी वीणा आणि कुटुंबियांसमवेत भागिरथी विहारमधील गल्ली क्रमांक 13/6 केजी ब्लॉक येथे राहत होते. राधेश्याम शासकीय विद्यालयातून उपमुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले होते. त्यांचा मुलगा रवीरतन (वय 38) हा पत्नी मोनिका आणि सहा वर्षाचा मुलगा जयेशसोबत पहिल्या मजल्यावर राहत होता. हे वृद्ध दांपत्य इमारतीच्या तळमजल्यावर राहत होते. रवी मुस्तफाबादमधील एका शाळेत गेस्ट टीचर म्हणून काम करतो. या कुटुंबाचे जौहरीपूर परिसरात गारमेंट्स आणि कॉस्मेटिक्सचं दुकान आहे. या वृद्ध दांपत्याला दुसरा मुलगा होता पण काही वर्षांपूर्वी एका घटनेत त्याचा मृत्यू झाला. हत्येच्या घटनेवेळी हे पाच लोक घरी होते. `` आपल्या मृत्यूची साक्ष देण्यासाठी ‘मृत महिला’ पोलिस स्टोशनमध्ये, नक्की के प्रकरण तरी काय? मृताच्या नातेवाईकाचा मुलगा गोलू याने सोमवारी सकाळी 7.19 वाजता पोलिसांना पीसीआर कॉल केला आणि माझ्या मावशी आणि काकांची गळा चिरून हत्या झाल्याचे सांगितले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, मारेकरी घराच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी गेटमधून आत शिरले आणि त्यांनी राधेश्याम, वीणा यांची हत्या केल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. हत्या करणाऱ्या आरोपींनी घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले साडेचार लाख रुपये आणि सर्व दागिने पळवून नेले. ``रविवारी रात्री साडेदहा वाजेदरम्यान आम्ही आई-वडिलांना शेवटचं पाहिलं. त्यानंतर आम्ही पहिल्या मजल्यावर झोपण्यासाठी गेलो तर आई-वडील खालच्या मजल्यावरच झोपले,`` असं मुलगा आणि सुनेनं सांगितलं. ते म्हणाले, ``सकाळी उठल्यावर घराचं मागचं गेट उघडं असल्याचं दिसलं. आई-वडिलांचे मृतदेह फोल्डिंग बेडवर पडलेले होते. रुममध्ये दोन फोल्डिंग बेड असताना दोन्ही मृतदेह मात्र एकाच बेडवर पडलेले होते. दोघांच्या गळ्याच्या डाव्या बाजूवर चाकूने वार करण्यात आले होते. `` या दुहेरी हत्याकांड प्रकरणाविषयी ईशान्य दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, ``सासू-सासऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आरोपी सून मोनिकाने रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन मारेकऱ्यांना घरात बोलावलं होतं. हे दोघं गच्चीवर लपले होते. घरातील पाच लाख रुपये आणि दागिने लुटणं हा त्यांचा हेतू नव्हता तर सासू सासू -सासऱ्यांना मारण्याचा होता.घरातील सर्वजण झोपी गेल्यावर दोन्ही मारेकऱ्यांनी गच्चीवरून खाली येत वृद्ध जोडप्याची हत्या केली. आरोपी महिलेनं रविवारी संध्याकाळी दोन्ही मारेकऱ्यांना फोन करून बोलून घेतलं होतं. यापैकी एकजण मोनिकाला पूर्वीपासून ओळखत होता. दुसरा मारेकरी त्याचा साथीदार होता. या प्रकरणाचा सर्व खुलासा मंगळवारपर्यंत होईल. सध्या महिलेला अटक करण्यात आली असून, हत्या करणारे दोन्ही फरार आहेत. पोलिसांना त्यांचा शोध लागला आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत.`` `` आतापर्यंतच्या चौकशीत आरोपी महिलेच्या पतीचा या प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलेलं नाही. पण सर्व बाजू लक्षात घेत या प्रकरणाचा तपास सुरू आहे, ``असं पोलिसांनी सांगितलं.