भोपाळ 24 नोव्हेंबर : दलित (Dalit) नागरिकांना समाजातील इतर घटकांप्रमाणे अधिकार आणि हक्क मिळावेत यासाठी राज्यघटनेमध्ये विशेष तरतुदी व कायदे केलेले आहेत. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी झाली, तरी अद्याप देशातल्या दलित जनतेला कुठे ना कुठे अन्याय सहन करावा लागत आहे. दलितांवर होणाऱ्या अन्यायाची (Dalit injustice) अनेक उदाहरणं वारंवार आपल्या समोर आलेली आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या रीवा (Rewa) जिल्ह्यातल्या डोलमाऊ गावात (Dolmau Village) एका दलित मजुरावर जीवघेणा हल्ला (Fatal attack) झाला. हा मजूर आपल्या कष्टाची कमाई मागण्यासाठी गावातील उच्चभ्रू जातीतल्या व्यक्तीकडे गेला होता. त्या व्यक्तीनं पीडित मजुराच्या मजुरीचे पैसे देण्यास नकार देऊन त्याचा हातच तोडला. 'टाइम्स नाऊ'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
'आज तक'नं दिलेल्या वृत्तानुसार, रीवा जिल्ह्यातल्या सिरमोर पोलीस स्टेशनअंतर्गत (Sirmaur police station) येत असलेल्या डोलमाऊ गावात एका दलित मजुरावर (Dalit laborers) भीषण प्रसंग ओढवला. 45 वर्षीय पीडित मजुराचं नाव अशोक साकेत असून, ते रोजंदारीची कामं करतात. काही दिवसांपूर्वी अशोक साकेत यांनी डोलमाऊ गावातल्या गणेश मिश्रा यांच्याकडे काम केलं होतं. साकेतनं अनेकदा आपल्या कामाच्या मोबदल्याची मागणी केली. मात्र आरोपी मिश्रा यांनी त्याला पैसे देण्यास टाळाटाळ केली. ज्या दिवशी साकेत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, त्या दिवशीही ते पैसे मागण्यासाठीच गेले होते. त्यावेळी सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान आरोपी मिश्रा यांनी रागाच्या भरात साकेत यांच्यावर तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात साकेत यांचा हात तुटून पडला. या घटनेनंतर काही सहआरोपींनी तुटलेला हात लपवण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गावात जाऊन या आरोपींना अटक केली. पोलीस गावामध्ये दाखल होईपर्यंत मुख्य आरोपी फरार झाला होता; मात्र पोलिसांनी दोन सहआरोपींना मुख्य आरोपीला शोधून काढलं. शिवाय पोलिसांनी पीडित मजुराचा तुटलेला हात शोधून त्याला संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात (Sanjay Gandhi Memorial Hospital) उपचारांसाठी दाखल केलं. डॉक्टरांनी साकेत यांच्या हातावर शस्त्रक्रिया करून हात पुन्हा जोडला आहे; मात्र त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.
मुख्य आरोपी गणेश मिश्रा, त्याचा मित्र रत्नेश मिश्रा आणि कृष्णकुमार मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींवर आयपीसीचं कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि एससी/एससीटी कायद्याच्या कलम 3(2)1 नुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनवीत भसीन (SP Navneet Bhasin) यांनी दिली आहे. रीवामध्ये घडलेली ही अमानुष घटना पाहता, अजूनही देशातल्या दलितांना कशा प्रकारची हीन वागणूक मिळत आहे, हे स्पष्ट होतं. या घटनेनंतर असंतोष व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Dalit