रायपूर, 28 सप्टेंबर : तीन दिवसांपूर्वी एका डॉक्टरचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत लटकलेला आढळला. पोलिसांनी केलेल्या कसून तपासात आढळले की ही आत्महत्या नसून हत्या (Murder news) आहे. मृताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांना या घटनेचा उलगडा झाला. संबंधित डॉक्टरचा त्याचाच मित्राने गळा दाबून खून केल्याचे सांगण्यात येत आहे. या डॉक्टरचे त्याच्या मित्राच्या आईशी अनैतिक संबंध (illicit relationship mother) होते आणि त्यातून ही हत्या झाल्याचे आता स्पष्ट होत आहे.
ही घटना छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये घडली आहे. मृत डॉक्टर हा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. रायपूरच्या गुरूनानक चौकात हॉटेल संदीपच्या खोलीत मध्यप्रदेशच्या शहडोल येथील रहिवासी डॉ. जितेंद्र विश्वकर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. जितेंद्रने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसत असले तरी, हॉटेलमध्ये एकत्र राहणारा त्याचा मित्र अजय निषाद याने त्याचा गळा दाबून खून केला होता. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह फासावर लटकवला होता.
हे वाचा - अनोळखी पुरुषासोबत बोलल्याने सासरच्यांकडून तालिबानी शिक्षा; विवाहितेला झाडाला बांधलं अन्…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय जितेंद्रसोबत त्याच्या बहिणीच्या मार्कशीटचे नूतनीकरण करण्यासाठी रायपूरला आला होता. खुनाच्या घटनेपूर्वी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर अजयने जितेंद्रची हत्या केली. हॉटेलच्या व्यवस्थापकाने आणि तिथे राहणाऱ्या इतर लोकांनीही चौकशीदरम्यान दोघांमध्ये झालेल्या वादाबद्दल पोलिसांना माहिती दिली.
आईशी अनैतिक संबंध
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजय निषादच्या आईचे डॉ. जितेंद्र विश्वकर्मा यांच्याशी अनैतिक संबंध होते. यावरून त्यांच्यात नेहमी वादही होत असे. मात्र, जितेंद्र असे काहीही नसल्याचे सांगत असे. तपासादरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांना या गोष्टींची माहिती दिली आहे. जितेंद्रची हत्या केल्यानंतर अजयने हॉटेलच्या खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि तो निघून गेला. सध्या या प्रकरणात नवीन तथ्य समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी अजय निषाद विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. गंज पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Murder news